पुस्तक – बलुचिस्तानचे मराठा : एक शोकांतिका (Baluchistanche Maratha : Ek Shokantika)
लेखक – नंदकुमार येवले (Nadkumar Yewale)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – ४०८
ISBN – 978-81-938239-8-7

सर्वप्रथम, हे पुस्तक मला वाचनासाठी स्वतःहून उपलब्ध करून दिल्याबद्दल “ग्रंथप्रेमी.कॉम” च्या द्वितीया सोनावणे यांचे आभार मानतो.

पाकिस्तानातच्या बलुचिस्तानात “बुग्ती मराठा” नावाचा समाज राहतो हे तुम्हाला माहिती आहे का ? तुम्ही म्हणाल, “मराठा” आणि तेही पाकिस्तानात ! पण हो. हे लोक पूर्वीचे महाराष्ट्रातले आहेत. साधारण अडीचशे वर्षांपासून ते पाकिस्तानात राहत आहेत. पण “राहत आहेत” हा सौम्य शब्द झाला. अडीचशे वर्षांपासून ते नरकयातना भोगत काळ कंठत आहेत असंच म्हणावं लागेल.

कोण आहेत हे लोक ? विपन्नावस्थेत का आहेत ? ह्याची उत्तरं आणि त्यांची हृदयद्रावक कहाणी मांडणारी ही कादंबरी – “बलुचिस्तानचे मराठे – एक शोकांतिका”

१७६१ साली झालेले पानिपतचे युद्ध हा मराठी इतिहासातला अविस्मरणीय प्रसंग. महाराष्ट्रातून लक्षावधी सैनिकांनी पानिपतपर्यंत जाऊन अहमदशहा अब्दालीला रोखलं होतं. ह्या युद्धात मराठयांना अपेक्षित विजय मिळाला नाही. धुमश्चक्री झाली. युद्ध अंतिम टप्प्यात असताना, पराभव समोर दिसू लागल्यावर रणांगणातून पळून जाण्यातच शहाणपणा होता. अब्दालीच्या सैन्याने चालवलेल्या शिरकणातून बरेच लोक वाचले पण चाळीस-पन्नास हजार मराठे मात्र अब्दालीच्या तावडीत सापडले. त्यात सरदार होते, पेशव्यांच्या फडावरचे लोक होते. त्याबरोबर शिपाई, सैन्यासाठी काम करणारे कारागीर, सुतार, लोहार, चांभार असे व्यवसायिक होते. पानिपतच्या लढ्याचं वेगळेपण म्हणजे सैन्याबरोबर कुटुंबकबिला देखील आला होता; उत्तर भारतातली तीर्थे बघण्यासाठी. त्यामुळे सापडलेल्या लोकांत बायका-पोरे सुद्धा होती. सगळे काही दिवसांत युद्धकैदी झाले. अब्दाली त्यांना आपल्या बरोबर घेऊन गेला. अफगाणिस्तानात परत जाताना बलुचिस्तानच्या सरदाराला त्याने ही माणसे दिली; युद्धात केलेल्या मदतीची भरपाई पैशांऐवजी, गुलाम देऊन! सर्वांचे जबरदस्ती इस्लाम मध्ये धर्मांतरण तर झालेच. पण जनावरांपेक्षाही हीन अशी गुलामी नशिबी आली. बलोच टोळ्यांमध्ये त्यांचं वाटप झालं. बलुचिस्तानात ते पोचले तो प्रदेश “डेरा बुग्ती” नावाने ओळखला जातो. म्हणून हे लोक “बुग्ती मराठा”.

देव-देश-धर्माच्या रक्षणासाठी घराबाहेर पडलेल्या लोकांना देव-देश-धर्म या तिन्हीलाही मुकावं लागलं. स्त्रियांची बेअब्रू झाली. शेतमजूर म्हणून ते लोक काम करू लागले. हे मूळचे शेतकरी लोक म्हणून त्यांनी चांगली शेती करून दाखवली. मालकाच्या मर्जीनुसार स्वतःचे पिढीजात व्यवसाय करून त्यांनी पोट भरायला सुरवात केली. त्यातले जे शिपाई आणि सरदार होते त्यांची फौज बलुची लोकांनी बनवली. आणि स्वतःच्या लढायांसाठी वापरली. आपल्या निढळाच्या घामाने आणि रक्ताने गुलामीतूनही स्वतःचं जीवन सावरायचा प्रयत्न हे लोक करत राहिले. पण बलुच्यांकडून अन्याय होणं, बळजबरीने पैसा आणि अब्रू लुटली जाणं हे पुन्हा पुन्हा घडत होतं.

हिंदू धर्म पाळायला परवानगी नाही; सगळे मुसलमान झाले तरी “बुग्ती मराठ्या”ला हिणवताना तुम्ही “काफीर” म्हणून मशिदीतही प्रवेश नाही. गुलामी म्हणून पुरेसा पैसा नाही. आपल्या मातृभूमीत परत जायची शक्यता शून्य. हे स्वीकारलेली ही मंडळी गरिबीतही जमेल तितके आपले संस्कार, खाद्यपदार्थ, गाणी जपण्याचा प्रयत्न करतात. आपण “मराठा” आहोत हा इतिहासाचा एक नाजूकसा धागाच जणू ह्या वावटळीत त्यांना आधार देत होता. त्यांच्या संघर्षाची, सुख-दुःखाची कहाणी अतिशय परिणामकारकपणे मांडली आहे लेखक नंदकुमार येवले ह्यांनी.

१७६१ पासून सुरुवात करून साधारण २००० सालापर्यंत हा समाज कुठल्या कुठल्या प्रसंगांना तोंड देत गेला असेल ह्याचं मनोज्ञ वर्णन त्यांनी केलं आहे. त्या वर्णनाशी आपण समरस होतो. डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत.

उदा. अगदी सुरुवातीला अब्दालीच्या हातात लोक सापडले तेव्हा.


मराठयांनी स्वतःच्या कष्टाने बलुचिस्तानात शेती पिकवली.


जुन्या परंपरा जपण्याचा प्रयत्न.


बलुचिस्तान हा खरं तर स्वतंत्र भाग. पाकिस्ताननिर्मितीच्या वेळी त्याच्या स्वायत्ततेचं आश्वासन देऊन जिन्हानी त्याला पाकिस्तानात समाविष्ट केलं. पण पुढे बलोच लोकांना दुय्यम लेखून पंजाबी आणि सिंधी मुसलमान त्यांच्यावर वर्चस्व गाजवू लागले. त्यातून बलोच लोकांनी लढे उभारले तर कधी सशस्त्र लढाया केल्या. “बुग्ती मराठा” लढवय्ये म्हणून आपल्या मालकांच्या बाजूने लढणं त्यांना भाग होतं. एकीकडे अन्याय होतोय तरी त्याचीच बाजूने घेऊन लढायचं आणि त्याचं फळ म्हणून पुन्हा पाक सैन्याकडून अत्याचार. अशा दुहेरी कात्रीत सापडलेला “मराठा”.

कादंबरीतलं एक “मराठा” पात्र – गाझीन – कष्टांतून उच्च शिक्षण घेऊन सरकारी नोकरीत मोठ्या हुद्दयावर जाते. वरच्या जातीतली एक मुलगी – आलिजा- त्याच्या प्रेमात पडते. तिच्या घरच्यांचा विरोध आणि जातीवरून त्याला अपमानास्पद वागणूकच मिळते तो प्रसंग.

कादंबरीचं स्वरूप तुमच्या लक्षात आलं असेल. आता थोडं लेखनशैलीबद्दल … कादंबरीचा पहिला भाग ज्यात पानिपत नंतर घडलेले प्रसंग आहेत तो भाग गुंतवून ठेवणारा आहे. पण कादंबरीत जसजसा काळ पुढे सरकतो तसतशी कादंबरी एकसुरी व्हायला लागते. सर्वसाधारणपणे गरीबाला जे त्रास आयुष्यभर भोगावे लागतात किंवा जातीय उतरंडीत खालच्या वर्गाला जी मानहानी अनुभवायला लागते तेच प्रसंग लेखकाने “मराठा” समाजातल्या व्यक्तींबद्दल दाखवले आहेत. त्यामुळे त्यातला वेगळेपणा वाटत नाही. कादंबरी ताणल्यासारखी वाटते.

बलुचिस्तानात वेगवेळ्या जाती आहेत. त्यांचे सरदार आणि जातपंचायती (जिर्गा आहेत). मराठा लोक पण त्यात वाटले गेले होते. आणि त्यानुसार त्यांचे सुद्धा प्रकार आहेत. हे आपल्याला सुरुवातीच्या भागातच कळतं पण. हाच मजकूर पुस्तकात पुन्हा पुन्हा दिला आहे. हे टाळायला हवं होत.

कादंबरीत काळ पुढे जातो पण नक्की काळ किती पुढे सरकला आहे ह्याचा अंदाज येत नाही. अचानक एखाद्या प्रसिद्ध घटनेचा संदर्भ येतो आणि कळतं की आता ५० वर्षानंतरचं चित्र आपण बघतोय. पण पात्रांची नावं तीच तीच येतात. आधीच्या प्रसंगातला तिशीतलं पात्र आता ८०व्या वर्षी सुद्धा असं कसं असेल. असा वाचताना गोंधळ उडतो.  मध्येच प्रसंग सोडून एखाद्या निबंधासारखी माहिती देणं सुरु होतं किंवा आजचे संदर्भ येतात. कादंबरीचा ओघ बिघडतो.

मराठा जेमतेम २२हजार होते. पण त्यांनी कष्ट करून मालकांच्या शेतीत, उद्योग-व्यवसायात खूप मोठी प्रगती केली; मरहट्टे लढाऊ म्हंणून प्रसिद्ध होते असं चित्र एकीकडे दाखवलं आहे. तर दुसरीकडे हे लोक कोण? हे सुद्धा लोकांना माहिती नाही असं चित्र रंगवायचा प्रयत्न आहे. पानिपत नंतर २०० वर्षं शेतमजुरी करणारा हा समाज; पण जेव्हा लढाईची वेळ येते तेव्हा “गनिमी काव्यात पारंगत” समाज असं वर्णन पुस्तकात येतं. युद्ध न करता नवीन पिढी जन्मजात पारंगत कशी होईल ? त्यामुळे वर्णनात खूप विरोधाभास आहे.

मूळ पात्रांच्या तोंडी भाषा पुश्तू, बलुची, फारसी असणार. पण वाचकांना कळणार नाही म्हणून मराठी पुस्तकात संवाद मराठीत असायला हरकत नव्हती. मात्र ह्या पुस्तकात वेगळेपणा दाखवण्यासाठी हिंदी वापरली आहे. पण ती ना धड उर्दू ना धड हिंदी(संस्कृतप्रचुर) अशी आहे. ते थोडं हास्यस्पद होतं.

पुस्तकाच्या मलपृष्ठावर “ज्यूंप्रमाणे ह्या समाजाला सुद्धा भारतात परत आणलं पाहिजे” अशी लेखकाची इच्छा आहे. ती रास्तच आहे. पण तशी इच्छा आता ह्या समाजाला उरली आहे का; हे कळायला मार्ग नाही. पुस्तकात तरी; कोणी भारतात पळून जायचा प्रयत्न केल्याचा प्रसंग नाही.

पुस्तकाच्या शेवटी संदर्भग्रंथांची यादी दिली आहे पण ती बहुतांश भारतात घडलेल्या इतिहासाबद्दल किंवा नेहमीच्या विषयांबद्दलची (फाळणी, पेशवाई) वाटतात. खुद्द “बुग्ती मराठा”बद्दलची माहिती त्यांनी कशी मिळवली; कादंबरीत लिहिलेल्या प्रसंग सत्यघटनाप्रेरित किती हे पुस्तकात कळत नाही. त्याचा ऊहापोह मनोगतात केला असता तर मजकुराला अजून वजन आलं असतं.

चारशे पानांमधला मुख्य मजकूर घेऊन पुस्तकाची संक्षिप्त आणि सुधारित आवृत्ती काढली तर लोकांमध्ये ती जास्त वाचली जाईल असं मला वाटतं. मात्र तोपर्यंत वाचकांनी थांबायची गरज नाही. एका महत्त्त्वाच्या विषयाला हात घालणारी; आपल्याच भाऊबंदांशी आपली ओळख करून देणारी; त्यांच्या हाका ऐकण्यासाठी आपले कान उघडण्याचे आवाहन करणारी ही कादंबरी वाचलीच पाहिजे.

हे पुस्तक पुढील लिंकवर ऑनलाईन विकत घेता येईल
https://granthpremi.com/product/baluchistanche-maratha-ek-shokantika/

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/