पुस्तक – निपुणशोध (Nipunshodh)
लेखक – सुमेध वडावाला (रिसबूड) (Sumedh Wadawala Risbud)
गिरीश टिळक (Girish Tilak) ह्यांच्या अनुभवांचे शब्दांकन
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २३१
ISBN – 978-81-943051-5-6

एखाद्या कंपनीला किंवा संस्थेला त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे योग्य व्यक्ती हुडकून देण्याचं काम त्या कंपनीचे “एच.आर.” डिपार्टमेंट हे काम करत असतेच. पण जेव्हा उच्च पदासाठी उमेदवाराचा शोध घ्यायचा असतो किंवा दुर्मिळ अश्या एखाद्या तज्ज्ञाची गरज असते तेव्हा ह्या निवडीसाठीही तज्ज्ञ व्यक्तीची/रिक्रुटमेंट कंपनीची मदत घेतली जाते. तिला म्हणतात “हेडहंटर”. गिरीश टिळक हे प्रथितयश “हेडहंटर” आहेत. त्यांचं ह्याच नावाचं एक पुस्तक पूर्वी प्रसिद्ध (दोन्ही अर्थाने) झालं आहे. हेडहंटिंग अर्थात ह्या पुस्तकाच्या नावाप्रमाणे “निपुणशोधा”चे अनुभव त्यांनी ह्या पुस्तकात सांगितले आहेत. त्यांचं शब्दांकन सुमेध वडावाला रिसबूड ह्यांनी केलं आहे.

एखाद्या कंपनीकडून निपुणशोधाचे काम मिळणे, ते मिळाल्यावर आवश्यकते प्रमाणे उमेदवार शोधणे, त्यांच्यातील योग्य उमेदवारांची निवड करून ती माहिती कंपनीला पाठवणे, त्यातून कंपनीच्या आवडीच्या उमेदवारांच्या मुलाखती ठरवणे आणि त्यातील योग्य उमेदवाराला “ऑफर”मिळवून देऊन कंपनीत सामील होईपर्यंत सहभागी होणे; हे ह्या निपुणशोधाचे टप्पे. ह्या प्रत्येक टप्प्यावर आलेल्या बऱ्या वाईट अनुभवांपैकी काही अनुभव पुस्तकात वाचायला मिळतील.

निपुणशोधाचं कंत्राट कंपन्या देतीलच पण असे कंत्राट मिळण्याची शक्यता दिसली की स्वतःहून जाऊन कंपनीशी संपर्क साधणे आणि चाचपणी करण्याचा प्रसंग

जेव्हा हेडहंटरलाच इंटरव्ह्यूला तोंड द्यावं लागतं तेव्हा

घाऊक पातळीवर तंत्रज्ञांची निवड करण्यासाठी फक्त मुलाखतच नाही तर लेखी परीक्षा, मानसिक कल चाचणी हे सगळे सोपस्कार सुद्धा “हेडहंटिंग” कंपनीला करावे लागतात तो अनुभव

शोधाचे टप्पे काय आहेत हे आपल्या लगेच लक्षात येतं. त्यात काही ना काही अडचणी येणारच हेही आपण गृहीत धरतोच . त्यामुळेच अनुभवांतलं वैशिष्ट्य / वेगळेपण लक्षात येण्यासाठी लेखकाला बरीच नेपथ्यरचना करावी लागते. खूप माहिती, पूर्वपीठिका समजावून समजावी लागते. त्यात बरीच पाने खर्च होतात. त्यामानाने आलेल्या अनुभवात, प्रत्येक वेळी फारच वेगळं घडलं असं होत नाही. म्हणजे असं; की योग्य उमेदवार शोधण्यात खूप वेळ जाणे; ठरवलेला उमेदवाराने आयत्यावेळी कंपनीत भरती न होणे हे अनुभव तर सगळ्या “एच.आर.”ला नियमित येतंच असतात. “निपुणशोध” काही त्याहून वेगळा नाही. मात्र पारखून घेतलेला उमेदवार; ज्याच्यावर मोठ्या प्लॅंट ची जबाबदारी सोपवायची तोच अनैतिक निघावा किंवा त्यानेच फसवणूक करावी हे अनुभव मात्र नेहमीच्या “एच. आर.” भरतीपेक्षा जास्त त्रासदायक आहेत. कारण त्याचा कंपनीवर होणार परिणामही तितकाच मोठा आहे. प्रतिस्पर्धी कंपनीची माहिती काढण्यासाठी प्रतिस्पर्धी कंपनीतल्या लोकांशी निवडीच्या बहाण्याने चर्चा करण्याचा प्रसंग सुद्धा पुस्तकात आहे. उमेदवाराची फसवणूक उघडकीला आणण्याचा प्रसंग नाट्यमय आहे.

ह्या क्षेत्रातली संभाषणे बहुदा इंग्रजीतूनच होतात. त्या संभाषणातलं वजन, गांभीर्य किंवा कधी उडालेले खटके जसेच्या तसे देण्यासाठी पूर्ण इंग्रजी वाक्य देवनागरी लिपीत दिलेली आहेत. त्यामुळे हे पुस्तक जरा द्विभाषिक होतं. गिरीश टिळक ह्यांची कंपनी “रिझ्युमे” आहे हे पुस्तकात कळतं. पण ही कंपनी नक्की किती मोठी असेल, त्यात किती लोक काम करत असतील ह्याचा अंदाज येत नाही. काही ठिकाणी टिळक ह्यांच्या सहकाऱ्यांचा उल्लेख येतो पण बहुतेक वेळा सगळी धावपळ, प्रवास टिळकांना एकट्यालाच करावा लागतो की काय असं वाटतं.

कुठलंही पुस्तक १००% लक्षात राहत नाही. त्यामळे पुस्तक वाचून झाल्यावर सार म्हणून किती लक्षात राहिलं, काय नवीन समजलं , काय शिकायला मिळालं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. ह्या कसोटीवर मला ह्यातून खूप काही हाती लागल्यासारखं वाटलं नाही. पण वाचायला आवडत होतं. प्रसंगांची पार्श्वभूमी सांगणारा भाग कमी करून अनुभव वाढवले असते तर अजून रंजक झालं असतं.

वरच्या स्तरातल्या लोकांच्या निवडी कशा होत असतील हे जाणून घेण्यासाठी पुस्तक छान आहे. जे ह्या क्षेत्रात काम करत आहेत किंवा पदार्पण करू इच्छित आहेत त्यांना ह्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं आहे. “हेडहंटिंग” सारख्या अनवट क्षेत्रातले अनुभव मराठीत आणून टिळक-रिसबूड जोडीने मराठी भाषा समृद्ध करण्याचं काम केलं आहे त्याला मात्र दाद दिली पाहिजे. म्हणूनच पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गिरीश टिळक ह्यांचं नाव का नाही हा प्रश्न मला पडला. पाठमजकूर (ब्लर्ब) मध्येही ते नाव ठळक नाही. पुस्तक सुमेधजींनी लिहिलं असलं तरी ते प्रथमपुरुषी – गिरीश टिळक संवाद साधतायत – अश्या स्वरूपात आहे. सुमेधजींनी अनुभवाचं शब्दांकन केलं असावं. अश्यावेळी लेखक म्हणून दोघांची नावं स्प्ष्टपणे समोर यायला हवी होती.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

c

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दोनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/