पुस्तक : तत्रैव (tatraiv)

लेखक : राजन खान (Rajan Khan)

भाषा : मराठी (Marathi)

पाने: २५५

ISBN :दिलेला नाही

रजान खान यांच्या दीर्घकथा संग्रहात चार कथा आहेत.

“एका अटीचा संसार” ही एका वृद्ध जोडप्याची गोष्ट आहे. मूलबाळ नाही आणि संसाराचा काही त्रासही नाही अशा स्थितीत एक वृद्ध जोडपं आपले दिवस ढकलतं आहे. एके दिवशी पावसाळ्यात त्यांच्या घरासमोर एक कुत्र्याचं लहानगं पिल्लू केविलवाण्या परिस्थितीत घरासमोर सापडतं. पावसापाण्यात ते वाचेल का नाही या काळजीपोटी त्याला घरात घेतात. राहू दे घरात थोडे दिवस असं म्हणत सांभाळ करतात. पण या पिल्लामुळे त्यांच्या रोजच्या निरस दिनक्रमात बदल होतो. एकमेकांशी बोलणं सुरू होतं. मुलं न होऊन देण्याचा बायकोचा निर्णय आणि त्याला कारण असणारं नवऱ्याचा तिला नोकरी करू न देण्याचा निर्णय हे विषय पुन्हा पुन्हा बोलण्यात येतात. पण पुन्हा पुन्हा बोलण्यातून स्वतःच्या तेव्हाच्या वागण्याबद्दल इतक्या वर्षांनंतर बघताना आता स्वतःची आणि जोडीदाराचीही नव्यानेच ओळख होते. आपण दुसऱ्याला आणि स्वतःलाही पूर्णपणे ओळखलं आहे असं म्हणू शकत नाही याची जाणीव होते.

दुसर्‍या गोष्टीतही नवरा बायकोचाच संवाद आहे. एक लेखक एक कथा लिहिताना अडलाय, कितीतरी दिवस त्याला पुढे लिहायला जमत नाहिये. अशवेळी त्या काथेतली पात्र असणारे नवरा बायको सजीव झाल्यासारखी बोलू लागतात अशी कल्पना केलीय. ते एकमेकांशी चर्चा करू लागतात . लेखक का लिहित नसेल. सुखाच्या संसाराचं चित्रण केल्यावार त्याला कथेत नाट्यमय वळण द्यायचंय. म्हणजे त्याला काय सुचवायचं असेल ? त्याला बायकोचा संशय आला असेल का? असेल तर का आला असेल ? संशय का येतो ? संशय आल्यावर माणसं सहज विचारून का टाकत नाहीत ? अशा समस्यांमध्ये सगळ्याचीच फरपट कशी होते अशी सगळी चर्चा ते करतात.

तिसऱ्या गोष्टीत एक लेखक आपल्याशी संवाद साधतोय आणि त्याला रहस्यकथा लेखन का जमत नाही ते सांगतो. त्याला एक रहस्यकथा लिहाविशी वाटतेय त्याच्या लहानपणी घडलेल्या आठवणींवर आधारित. आणि म्हणून तो लहानपणी काय झालं हे आपल्याला सांगतोय. खेडेगावातल्या लहान मुला-मुलींचे खेळ, भांडण, रुसवे-फुगवे आणि शेवटी एक अनाकलनीय घटना. आणि त्या मागचं रहस्य काय ? नकळत लेखक रहस्यकथा लिहितो पण ही रहस्यकथा तो का प्रसिद्ध करू शकत नाही हे आपल्यालाही पटतं. 

चौथी एक नेहमीसारखी म्हणजे त्रयस्थ निवेदन शैलीतली गोष्ट आहे. एका बंधकाम मजूरांच्या वस्तीत नव्याने तीन चार मजूर कुटुंब राहायला येतात. पोटपाण्यासाठी मोलमजुरी करतात. त्यांच्या बायका घरगुती कामं करतात. आणि घरगुती कामं करता करता प्रसंग असे घडतात की त्यांची पावलं वाममार्गाकडे वळतात. परिस्थितीमुळे, चार पैसे मिळतील या लालसेपोटी जे लपूनछपून सुरू होतं ते हळूहळू वाढत जातं. एकीला दोन, दोघीला निघी असं करत करत प्रकरण वाढत जातं आणि तसल्या वस्तीचाच जन्म होतो. आणि या बायकांना नादी लावणारीच्या आयुष्यातही काही वेगळंच घडतं.

“तत्रैव” म्हणजे “तत्र” + “एव” अर्थात “तिथेच”.  या नावाचा या गोष्टींशी संबंध नीट जाणवला नाही. कदाचित मलपृष्ठावरच्या मजकुरातील, “..तेच तेच घडतं” या संकल्पनेप्रमाणे आपण “तिथेच” असतो असं काहीसं म्हणायचं असेल. मग खरं “..तेच तेच” साठी “तदेव” नाव ठेवायला हवं होतं. असो.

दोन गोष्टींचे विषय खूप नाविन्यपूर्ण आहेत असे नाहीत. पहिल्या तीन कथांची शैली वेगळी आहे. पण त्या खूपच लांबल्या आहेत असं वाटतं. तेच तेच संवाद, मुद्दे पुन्हा पुन्हा येतायत असं वाटतं. तिसऱ्या कथेतही मुख्य रहस्यकथा शेवटची काही पानेच आहे. आधी “बालपणीचा काळ सुखाचा” प्रकारचं वर्णन आहे. ज्यातून मूळ कथाबीजाला काही फार मदत होत नाही. तीनही कथांवर संपादकीय कात्री अजून चालायला हवी होती असं वाटतं. चौथी कथा मात्र मोठी असूनही प्रत्येक प्रसंग गोष्टीला पुढे नेतो, अधिक परिणामकारक करतो. आपल्याला ती गोष्ट खिळवून ठेवते. 

वेगळ्या शैलीतल्या तीन कथा आणि शेवटची परिणामकारक कथा म्हणून हा कथा संग्रह वाचायला हरकत नाही.

———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————-

———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

———————————————————————————-