पुस्तक : व्हिटॅमिन्स (Vitamins)

लेखक : अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये (Achyut Godbole & Dr. Vaidehi Limaye)

भाषा : मराठी (Marathi)

पाने : ४४७

ISBN : 978-93-5220-193-8


व्हिटॅमिन अर्थात जीवन्सत्त्वे शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक असतात…सूर्यप्रकाशातून ड जीवनसत्त्व मिळते, लिंबूवर्गीय फळांतून क जीवनसत्त्व मिळते…जीवनसत्त्वांच्या अभवातून बेरीबेरी, रातांधळेपणा, मुडदूस इ. विकार होतात…हे अगदी सामान्य ज्ञान आहे, जे बहुतेक आपण सगळे शाळा कॉलेजमध्येच शिकलो असू. पण खरंच माणसाला ही अशी जीवनसत्त्व आहेत हे कसं कळलं? त्यांना ही नावं कशी पडली? अमुक एका पदार्थात अमुक जीवनसत्त्व मिळतं हे कोणी आणि कसं शोधलं? हे शोधणं इतकं सोपं होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या अभ्यासक्रमात नव्हती. त्यामुळे माझ्यासारखे जे वैद्यकीय क्षेत्रात नाहीत त्यांना हे सगळं माहीत नसेल.

पण गोडबोले-लिमये जोडीने आपल्यासाठी माहितीचा सागर ढवळून त्याचं सार साडेचारशे पानी पुस्तकात आपल्यासमोर मांडलं आहे. जीवन्सत्त्वांच्या शोधांची अद्भुतरम्य कहाणी आपल्या समोर उलगडली आहे.


अच्युत गोडबोले हे सुपरिचित आहेतच. तरीही दोन्ही लेखकांची पुस्तकात दिलेली ओळख परीक्षणाच्या शेवटी दिली आहे.


अनुक्रमणिका :


दोन शतकांपूर्वी लुई पाश्चर या शास्त्रज्ञाच्या जमान्यात रोगांचं कारण वेगवेगळे जिवाणू(बॅक्टेरिया) असतात हे पाश्चात्त्य जगाला कळलं होतं. त्यामुळे स्कर्व्ही , पेलाग्रा, बेरीबेरी इ. साथीच्या किंवा मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या रोगांचे कारणही काहितरी जीवाणूच असणार अशीच धारणा होती. पण ते जीवाणू शोधण्यात काही यश येत नव्हतं. अश्यावेळी बेरीबेरी, मुडदूस सारखे रोग गरीब समाजात, अस्वच्छ रहणाऱ्या लोकांत न दिसता सुखवस्तू कुटुंबात, शहरांत दिसत होते. आणि काही विशिष्ट पदार्थ खाल्ले की ते बरे होतात हे शास्त्रज्ञांना दिसत होतं. या निरीक्षणांतून असा युक्तीवाद पुढे आला की आहारातच असं काहीतरी महत्त्वाचं आहे की ज्यांचा अभाव या रोगांना कारणीभूत ठरतोय. हे मांडलं गेलं आणि एक नवं दालन उघडलं गेलं.


जगभरातले सामान्य लोक, डॉक्टर आणि पारंपारिक आहाराच्या कल्पना यांच्या देवाणघेवाणीतून, “काय खाल्लं” की रोग बरा होतो याचं ज्ञान मानवजातीला होत होतं. उदा. स्कर्व्ही सारखा रोग समुद्रसफरींवर जाणाऱ्या नाविकांना व्हायचा. कितीतरी वर्षं वेगवेगळे अन्नप्रकार आणि पारंपारिक औषधांचा वापर त्यावर केला जात होता. त्यातून लक्षात आलं की आंबट फळांचा वापर केला की स्कर्व्ही होत नाही. मग सफरींवर जाताना ही फळं न्यायला सुरुवात केली. स्कर्व्ही आटोक्यात येतोय असं वाटताना एकदा फळं नेऊन सुद्धा एकदा खूप स्कर्व्ही झाला. मग लक्षात आलं की लिंबांच्या ऐवजी “लाईम” प्रकारची जास्त आंबट फळं नेली होती आणि त्यांचा उपयोग होत नाही. म्हणजे फक्त आंबट फळं नाही तर विशिष्ट फळंच पाहिजेत, हे समजलं. पुढे फळं साठवायला त्रास होतो म्हणून त्याऐवजी फळांचा रस न्यायला सुरुवात केली. तर स्कर्व्हीने पुन्हा डोकं वर काढलं. लोक मेले. रस गरम केला की त्यातील क जीवनसत्त्व निघून जातं हे आपल्याला माहिती आहे. पण हे माहिती होण्यासाठी कितीतरी लोकांना प्राण गमवावे लागले. देशोदेशी येणाऱ्या अनुभवांतून संपूर्ण मनवजातीच्या ज्ञानात कणाकणाने भर पडत होती. हे सगळं वाचणं रोमांचकारी आहे.


पण अन्नात “काहितरी” आहे इथपासून ते “नक्की काय आहे” हा प्रवास खूप खडतर, काही दशकांचा आणि दोन-तीन पिढ्यांच्या संशोधनाचा परिपाक होता. उंदरांवर(गिनिपिग), कोंबड्यांवर, कुत्र्यांवर आणि शेवटी माणसांवर प्रयोग करून हे शोधायचं होतं. प्रयोगात थोडा जरी फरक पडला तरी निष्कर्ष चुकीचे निघायचे आणि संशोधन भरकटायचं. उंदरांना पाळा, त्यांचे गट करा, प्रत्येक गटाला वेगळा आहार द्या जेणेकरून आहारातला बदल आणि उंदरांतला बदल बघता येईल. मग त्यांची विष्ठा तपासा, डोळे तपास, शवविच्छेदन करा असा किचकट कार्यक्रम होता तो. “अ” जीवनसत्त्वाबद्दलचा हा प्रयोग बघा.

(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)



या शस्त्रज्ञांनी फक्त मुक्या प्राण्यांवरच प्रयोग केले असं नाही. तर कैद्यांवर, गुलामांवर प्रयोग केले. प्रसंगी स्वतःलाही रोग घडवून आणला आणि प्रयोग केले. उदा. बी-१२ जीवन्सत्त्वावर प्रयोग करताना एका डॉक्टरने काय केलं पहा.

अशी बरीच विलक्षण उदहरणं पुस्तकात आहेत.


पुस्तकात गरज असेल तिथे थोडं खोलात जाऊन विज्ञानही समजावून सांगितलं आहे. ज्यामुळे त्या त्या जीवनसत्त्वाचा परिणाम असाच का होतो हे सुद्धा आपल्याला कळतं. उदा. ब जीवनसत्त्व कसं कम करतं याबद्दल.



वरच्या पानांवरून लक्षात आलं असेलच की विषय किचकट तांत्रिक असला तरी पुस्तकाची भाषा तशी नाही. आपल्याला आवडेल अशीच आहे. त्यामुळे असं पुस्तक अभ्यासक्रमात असतं तर मजा आली असती असं वाटतं. पण तेव्हाच पुस्तकभर अनेक शास्त्रज्ञांची, संस्थांची, ठिकाणांची, रसायनांची नावं येतात आणि ती मात्र लक्षात रहत नाहीत हे जाणवल्यावर परीक्षेत नावं, सनावळ्या विचारल्यवर काय अवस्था झाली असती याचीही भीती वाटते. कही वेळा तेच तेच प्रायोग, तीच तिच निरीक्षणं यांची पुनरावृत्ती होते. कारण वर्षानुवर्षे शास्त्रज्ञ तिथल्या तिथे घुटमळत होते. तो भाग थोडा वरवर वाचला तर कंटाळा टाळून वाचन चालू ठेवता येतं. पुस्तकाच्या शेवटी संदर्भ ग्रंथ, लेख, जर्नल यांची सूची आहे. ही मोठ्ठी जंत्री बघून लेखकद्वयींच्या मेहनतीला मी सादर प्रणाम केला.


या पुस्तकाच्या वाचनातून वैज्ञनिक इतिहास कळतोच. पण आपल्या अन्नाकडे डोळसपणे बघायची निकड निर्माण होते. कृत्रिम अन्न किंवा पूरकदार्थांची (सप्लिमेंट्स) कितीही जाहिरात केली तरी नैसर्गिक पूर्णान्नातले काहिना काही घटक त्यात यायचे राहणारच, हे जाणवेल. प्रक्रिया केलेलं अन्न (प्रोसेस्ड फूड) खायला छान लागतं पण त्यात आवश्यक अन्नघटक निघून गेलेले असतात हे आपल्याला माहिती आहे तरी त्याची पुन्हा एकदा आठवण हे पुस्तक करून देईल. आज आपण जो आहारशास्त्राबद्दलचा टप्पा गाठला आहे त्यासाठी ज्ञात-अज्ञात शस्त्रज्ञांचे आपण किती ऋणी असलं पाहिजे हे जाणवेल.


आजही देशोदेशी रोग-विकार आहेत, संशोधन चालूच आहे. आजचे काही समज उद्या चुकीचे ठरतील, काहींची पुष्टी होईल, काही गोष्टी नव्याने कळतील. कुणी सांगावं सूर्यप्रकाशामुळे शरीरात ड जीवनसत्त्व तयार होतं तसं चंद्रप्रकाशामुळे “च” जीवनसत्त्व तयार होतं आणि ते मेंदूच्या निकोप वाढीसाठी आवश्यक आहे असा शोध लागेल. अजून ५० वर्षांनी जेव्हा इतिहासात आजच्या दिवसांबद्दल लिहिलं जाईल तेव्हा ते वाचक म्हणतील, “बापरे, कसे दिवस होते तेव्हा. जगभर लोक कसं काय असं वेड्यासारखे वागायचे, चंद्रप्रकाश न घेता घरी चक्क झोपायचे”. ज्ञान-अज्ञानाच्या या झोक्यांचा अनुभव घ्यायला हे पुस्तक वाचाच.



———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )

———————————————————————————-





———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————


लेखकांची पुस्तकात दिलेली ओळख: