पुस्तक – बे दुणे पाच (Be dune pach)
लेखिका – सारिका कुलकर्णी (Sarika Kulkarni)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १४८
प्रकाशन – ग्रंथाली प्रकाशन. जुलै २०२४
ISBN – 978-93-5650-961-0
छापील किंमत – रु. २००/-

सारिका कुलकर्णी ह्या नवोदित लेखिका. त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या खुसखुशीत पोस्ट, काही मासिकांतल्या मजेशीर कथा, विनोदी लेख लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. गेल्या वर्षी “मार्मिक” ह्या प्रसिद्ध मासिकात “बे दुणे पाच” ह्या नावाचं हलकंफुलकं विनोदी लेखांचं सदर त्या लिहीत होत्या. त्याच लेखांचा हा लेखसंग्रह. एका मध्यमवर्गीय, मध्यमवयीन, नोकरी करणाऱ्या स्त्रीच्या भूमिकेतून रोजच्या जगण्यातल्या घटनांवरचे लेख आहेत. पण रोजच्या घटना म्हणजे फक्त कौटुंबिक नाती, सासू-सुनांची भांडणं, आई-मुलगा इतपत ते अजिबात मर्यादित नाहीत. तर आपल्या बिल्डिंग मध्ये, ऑफिसमध्ये , प्रवासात घडणारे प्रसंग, ऑनलाईन चर्चा, बदलती जीवनशैली, खाणेपिणे असे कितीतरी विषय आहेत. एकूण २८ लेख आहेत. अनुक्रमणिकेवर एक नजर टाका.

लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती

आता काही लेखांबद्दल सांगतो

ऑफरातफरी – वृत्तपत्र, वेबसाईट ह्यावर सतत जाहिराती येत असतात. सण-उत्सवाच्या निमित्ताने त्यात नवनवीन ऑफर येत असतात. खरेदीप्रेमी लोक ह्या ऑफरना भुलून नको ती खरेदी करून बसतात. त्याचा मजेशीर अनुभव

अभिमानाची बाधा – “भावना दुखावल्या”च्या बातम्या हल्ली वाढल्या आहेत कारण जात, धर्म, राजकीय पक्ष, गाव, नाव, कंपनी असा कसला ना कसला तरी अभिमान हल्ली लोकांना वाटत असतो. आणि त्याचं प्रदर्शन करण्याची खुमखुमी. त्यावर लेखिकेची ही तिरकस टिप्पणी

वर्क लाईक अ डॉग डे – पाश्चात्त्य देशांत म्हणे वर्षातला एक दिवस “वर्क लाईक अ डॉग डे” नावाने साजरा केला जातो. भरपूर काम करण्याचा दिवस. तिकडच्या भाषेत कुत्र्याचा संदर्भ खूप काम करणे ह्यासाठी देतात. आपल्याकडे मात्र “इमानी कुत्रा” किंवा “कुत्र्यासारखा मारला” असले वाक्प्रचार असतात. दोन संस्कृतीतल्या फरकाचा वापर करून छान शाब्दिक कोट्या साधल्या आहेत.

न्यू इयरस्य प्रथम मासे – “नवीन वर्षाचा संकल्प”हा नेहमीचा चेष्टेचा, विनोदाचा विषय. त्यावर हा अजून एक पण तरीही वेगळेपणाने लिहिलेला लेख.

दारावर कावळा घुमतोय गं – हा खूपच वेगळा लेख आहे. ह्यात चक्क एक कावळा आपल्याशी बोलतोय. आणि तो आपल्याला सांगतोय की माणसं कावळ्यांना कशी वाईट वागवतात. ह्याची तक्रार करतोय. उष्टंखरकटं खाणारा कावळा इतकंच नाही तर बडबड गीतांत, सिने गीतांत कावळा कसा दिसतो. म्हणींमध्ये कावळा कसा येतो हे सगळं त्यात आहे. हा लेख वाचताना “अरे हो, खरंच की” असं पुन्हा पुन्हा आपल्या डोक्यात येईल.

मीठा बोलना मना है – मराठी माणूस गोड बोलत नाही. आपल्या संस्कृतीतच जणू ते बसत नाही. त्याचे रंजक किस्से

तेरे झगडे में क्या जादू है – “भांडण ही एक कला आहे” असं गमतीदार गृहीतक धरून निवेदिका आपल्याला तिचे भांडणांचे अनुभव, भांडण बघण्यातली मजा , “चांगलं भांडण्यासाठी” काय गुण पाहिजेत हे सगळं समजावून सांगतेय.

आता तीन लेखांची उदाहरणे बघा म्हणजे लेखिकेच्या शैलीची कल्पना येईल

ऑफरातफरी


चौकसवृत्ती किंवा भोचकपणा ह्यावरचा लेख


दारावर कावळा घुमतोय गं

लेखिकेच्या निरीक्षण शक्तीला दाद द्यायला हवी. कारण मुख्य संकल्पनेशी संबंधित इतके वेगवेगळे किस्से त्या लिहितात. घरी घडणारे, ऑफिसात घडणारे किस्से त्यात असतात. आपलं प्रत्यक्ष वागणं वेगळं तर सोशल मीडियावरचं लोकांचं वागणं वेगळं व्हॉट्सअप समूहातलं वागणं. पुरुषांचं वेगळं तर बायकांचं वेगळं. मुलांचं वेगळं तर मोठ्या माणसांचं वेगळं. ते सगळे पैलू त्यात येतात. त्यामुळे लेख एकांगी होत नाहीत. शेवटच्या परिच्छेदात जरा गांभीर्याने केलेली टिप्पणी सुद्धा आहे. निवेदनाच्या ओघात आलेल्या एकोळी (वन लाइनर्स) interesting आहेत.
– (ऑफर बद्दल लिहिताना )आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा अजून जास्त मिळतंय ही भावनाच माणसाला ऊर्जा देऊन जाते
– एखाद्या गोष्टीचा अभिमान बाळगला की आपला संबंध असो वा नसो त्याबद्दल अधिकारवाणीने बोलायला आपण मोकळे होतो
– (व्हॅलेंटाईन डे बद्दल लिहिताना पूर्वी आणि आत्ताचा फरक) हल्ली गुलाब दे, चॉकलेट दे, भालू दे ह्या प्रक्रियेतून मुलांना जावं लागतं. मग मुली “माझ्या मनात असं काही नाही” इथून सुरुवात करतात. हे मात्र मी कॉलेजात असताना होतं तसंच आहे.
– (बस प्रवासाबद्दल ) बसमध्ये जागा मिळवण्यासाठी जिथे युद्धाला सुरुवात होते तो प्रवास आनंददायी असेलच कसा ?

तो प्रवास आनंददायी नसेल पण हे पुस्तक वाचन आनंददायी आहे. हलकंफुलकं पण तरीही पाणचट विनोदी नसलेलं पुस्तक तुम्हाला वाचायला आवडेल. पुस्तकाच्या पाठमजकुरात लिहिलं आहे की “विनोदी लिहिणाऱ्या लेखिकांची वानवा आहे” त्या पार्श्वभूमीवर सारिकाताईंचं लेखन आश्वासक ठरतं.

आमच्या “पुस्तकप्रेमी समूहा”च्या सदस्या असल्यामुळे ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित होतो. लेखिकेकडून स्वाक्षरीसह हे पुस्तक घेतलं आहे. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !


मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

इतर कथासंग्रहांची मी लिहिलेली परीक्षणे

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link