पुस्तक – नंदीघोष-यात्रा – श्रीकृष्ण कथा : वेध नवा (Nandighosh-Yatra Shrikrishnakatha Vedh Nava)
लेखक – सतीश मुटाटकर व यशवंत मराठे (Satish Mutatkar & Yeshwant Marathe )
मूळ पुस्तक – Travels with Nandighosh – Demystifying Krishna (ट्रॅव्हल्स विथ नंदीघोष – डी मिस्टीफायिंग कृष्णा)
मूळ पुस्तकाची भाषा – इंग्रजी (English)
अनुवाद – डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके (Dr. Shuchita Nandapurkar Phadke)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १७०
प्रकाशन – राजहंस प्रकाशन, ऑक्टोबर २०२४
ISBN – 978-81-19625-40-6
छापील किंमत – रु. २८०
रामायण, महाभारत, त्यातली पात्रं, त्यातले प्रसंग हे कितीही वेळा ऐकले, वाचले तरी पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात. त्यावर चिंतन करून प्रत्येक वेळी काहीतरी वेगळा पैलू गवसतो. दुसऱ्या कोणाचं त्यावर भाष्य वाचताना अजून तिसरा पैलू सापडतो. त्यामुळे असंख्य पुस्तकं, लेख, व्हिडीओ असून सुद्धा प्रतिभावान व्यक्तीला आपलं म्हणणं मांडावंसं वाटतंच. त्याच शैलीतलं हे पुस्तक आहे.
हे पुस्तक म्हणजे दोन मित्रांच्या गप्पा आहेत. हे दोघे मित्र एका “कॅम्पर वॅन” ने रोडट्रीप करायला निघाले आहेत. मुंबईहून श्रीरंगम पर्यंत. त्यांच्या गाडीला त्यांनी नाव दिलं आहे “नंदीघोष”. ह्या प्रवासात गप्पांमधून श्रीकृष्णाच्या जन्मापासून महाभारत युद्धापर्यंत महत्त्वाच्या घटनांवर ते बोलतात. त्यातला एक मित्र दुसऱ्याला ह्या घटनांचा अर्थ समजावून सांगतो. त्याची वैचारिक भूमिका साधारण अशी आहे की – श्रीकृष्णाला “देवाचा अवतार” म्हटलं की त्याची फक्त पूजाच केली जाते. त्याच्यासारखं कर्तृत्व माणसाला जमणार आहे का आपल्याला; असा विचार करून गुणानुकरण टाळलं जातं. त्यामुळे श्रीकृष्णाला अवतार न मानता एक महापुरुष, उपजत गुण असलेला पण त्याचा वापर करून ज्याने महान कर्तृत्व दाखवलं असा महापुरुष समजलं पाहिजे. म्हणजे त्यातून आपणही काही शिकू.
कृष्ण चरित्रात जे प्रसंग चमत्कार किंवा अद्भुत प्रकारचे आहेत त्यामागे खरी घटना काय घडली असेल त्याचा विचार निवेदक करतो. त्यामुळे पुराणकथांमधली कल्पनारंजकतेची पुटं काढून टाकली तर काय शक्यता उरतात हे आपण बघतो. उदा. श्रीकृष्णजन्माआधी झालेली आकाशवाणी, कंसाने वसुदेव-देवकीला दिलेला बंदिवास विचारात घेतला तर कदाचित ती आकाशवाणी नसेल. कोणा ज्योतिषाने सांगितलेलं भविष्य असेल. वसुदेव-देवकीला कंसाने बंदिवास दिला नसेल तर नजरकैदेत ठेवलं असेल. त्यावेळी वासुदेवाने त्याकाळात इतर लोकांशी संधान बांधून आपल्या बाजूला वळवलं असेल. नंदाला भेटून पुढचा डाव रचला असेल. असं निवेदक सविस्तर सांगतो. पुस्तकात असे बरेच प्रसंग आहेत जिथे निवेदकाचा तर्क आपल्याला पटतो किंवा अगदीच अग्राह्य तरी वाटत नाही.
ज्या प्रसंगांत काहीच तर्क लावता येत नाही असे प्रसंग हे पुराणलिहिणाऱ्यांनी घातलेला मसाला आहे असं म्हणून त्याची बोळवण केली आहे. ते काही अंशी पटतं.
पण एकदा कृष्णाला माणूस ठरवले की त्याने केलेल्या प्रत्येक कृत्याचे त्याच पद्धतीने विश्लेषण करावे लागते. इथे मात्र लेखकांचा बऱ्याच ठिकाणी गोंधळ उडालेला आहे. उदा. लहान वयात केलेली कृत्ये, जसे की वेगवेगळ्या राक्षसांचा वध, गोवर्धन उचलणे, कंस-चाणूर ह्यांना मल्ल युद्धात हरवणे हे सगळे कसे शक्य आहे असा प्रश्न पडतो. इथे निवेदक म्हणतो की उपजत हुशारी, अतितीव्र ग्रहणक्षमता असणारा हा बालक होता. गोकुळातून मथुरेत गेल्यावर “लगेच” कृष्णाने तिथली राजकीय परिस्थिती ताडली असेल, लोकांना आपल्या बाजूने वळवले असेल. द्वंद्वयुद्धात ज्येष्ठ मल्लांचा अतिआत्मविश्वास आणि तरुणांची चपळता यातला सामना असल्यामुळे ते जिंकले. कंसाला “लगेच” खाली खेचलं आणि चुटकीसरशी संपवलं. हे तर्क मात्र पटण्यासारखे नाहीत. चपळतेमुळे मुलं जिंकू शकतील पण मल्लांना, कंसाला ठार कसे मारू शकतील ?
त्यामुळे जिथे तर्कशुद्ध मांडणी करता येते तिथे कृष्णाला कर्तृत्त्ववान माणूस म्हणायचं आणि नाही तिथे अतिमानवी शक्ती-बुद्धी-चातुर्य असणारा अचाट माणूस होता आहे हे मान्य करायचं. ही विसंगती देखील बऱ्याच ठिकाणी आहे.
रासलीले बद्दल लिहिताना, “रासलीला हे सामान्य नृत्य समजलं जाऊ नये, ते वैश्विक उत्पत्ती-लय ह्यांचं नृत्य आहे” अशी चमत्कारिक मल्लिनाथी केली आहे. द्रौपदीला पाच नवरे का करावे लागले तर भावंडांत भांडणं होऊ नये म्हणून, हे पटू शकतं. पण त्यापुढे जाऊन त्याला समर्थन काय? तर हिमाचल प्रदेशांतल्या किन्नोर भागात अशी प्रथा आहे. पांडव लहान असताना पांडू-कुंती-माद्री तिथेच जंगलात राहत होते. त्यांना ते माहीत होतं. आदिवासींची प्रथा माहीत असणं वेगळं आणि कुरुकुलातील क्षत्रियांनी ती पाळणं वेगळं ना ? त्यामुळे ते ओढून ताणून आणलेले तर्क वाटतात.
पुस्तकाची निवेदन शैली चांगली आहे. कुठल्याही प्रसंगात फार रेंगाळले नाहीयेत. किंवा मुद्दा पटवून द्यायचा अट्टाहासही केलेला नाही. त्यामुळे मुद्दा पटला न पटला तरी आपण पुढे वाचत राहतो. कंटाळा येत नाही.
पण नंदीघोष हे नाव, दोन जण प्रवासात आहेत ह्या नेपथ्याचा काहीच उपयोग केलेला नाही. त्याऐवजी दोन मित्र घरी गप्पा मारत बसलेत असं दाखवलं असतं तरी चाललं असतं.
चार पानं उदाहरणादाखल
लेखकांचा पुस्तकात दिलेला परिचय
कृष्णाने मथुरा सोडून नवीन शहर द्वारका वसवायचा निर्णय घेतला त्याबद्दल
कृष्णाने उत्तरेच्या गर्भातल्या बाळाला जीवनदान दिलं त्या प्रसंगाची चर्चा
पुस्तकाचा अनुवाद अतिशय ओघवता झाला आहे. त्यामुळे वाचनाची मजा टिकून राहिली आहे. हे पुस्तक वाचत असताना अनुदिका शुचिता नांदापूरकर-फडके ह्यांना भेटण्याचा योग आला होता. त्याचा हा फोटो.
पुस्तकाच्या सुरुवातीला श्याम बेनेगल आणि मलपृष्ठावर डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ सुचेता परांजपे, डॉ. मोहन आगाशे ह्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. ते वाचून पुस्तकाबद्दल अपेक्षा फारच वाढल्या होत्या. पण त्या अपेक्षांची पूर्ती पुस्तकातून होत नाही. पुस्तक वाचताना प्रा. राम शेवाळकरांच्या श्रीकृष्ण, योगेश्वर कृष्ण, रामायणातील राजकारण इ व्याख्यानानांची आठवण आणि पुस्तकाशी तुलना आपसूक होत होती. भारतीय पुराणकथांचा तर्कशुद्ध अभ्यास, त्यात मिसळलेलं कल्पनाभराऱ्यांचं हीण काढून उपयुक्त भाग समाजापुढे ठेवणं आवश्यकच आहे. त्यादृष्टीने केलेला अजून एक प्रयत्न म्हणून पुस्तकाकडे बघायला हरकत नाही.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर पैराणिक विषयांवरील पुस्तकांची मी लिहिलेली परीक्षणे
- अद्वैताचं उपनिषद (Advaitach Upnishad) – शुभांगी भडभडे (Shubhangi Bhadbhade)
- आचार्य द्रोण (Acharya Dron) – अनंत तिबिले (Anant Tibile)
- गौतम बुद्धांचे चरित्र (Gautam Buddhanche Charitra) – कृष्णराव अर्जुन केळूसकर (Krushnarao Arjun Keluskar)
- ययाति (Yayati) – वि.स. खांडेकर (V.S. Khandekar)
- उत्तरकांड (Uttarkand) – डॉ. एस. एल. भैरप्पा (Dr. S. L. Bahirappa) अनुवादक – उमा कुलकर्णी (Uma Kulkarni)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe