पुस्तक – सोन्याच्या धुराचे ठसके (sonyachya dhurache thasake)
लेखिका – डॉ. उज्ज्वला दळवी (Dr. Ujjwala Dalvi)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २७२
ISBN – दिलेला नाही
प्रकाशन – ग्रंथाली प्रकाशन. जानेवारी २०१०
लेखिका उज्ज्वला दळवी आणि त्यांचे पती हेली दळवी दोघेही डॉक्टर. १९८५ साली नोकरीसाठी म्हणून सौदी अरबेरीयाला गेले. “उम्म खद्रा” नावाच्या एका छोट्या खेड्यातल्या सरकारी रुग्णालयात कामावर रुजू झाले. हवामान, भाषा, धर्म, संस्कृती, सामाजिक स्वातंत्र्य ह्या सगळ्याच बाबतीत भारतापेक्षा फारच वेगळ्या असणाऱ्या ह्या देशात राहू लागले. त्या वास्तव्याच्या २५ वर्षांच्या अनुभवाचे हे वर्णन आहे.
पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती
डॉक्टर म्हणून काम करताना त्यांना वेगवेगळ्या कुटुंबातल्या लोकांशी भेटण्याबोलण्याची संधी मिळाली. त्यातून स्थानिकांशी ओळखी झाल्या. मैत्रीही झाली. स्थानिकांच्या वेगवेगळ्या वृत्ती बघायला मिळाल्या. कुणी स्थानिक त्यांच्याकडे – आपल्या देशात आपल्या सेवेसाठी आलेले परदेशी लोक – अश्या स्वरूपात बघत; तर कोणी स्थानिक – पाहुणे लोक म्हणून -आगतस्वागताने गुदमरून टाकत. तिथल्या कट्टर इस्लामी, असहिष्णू आणि बंदिस्त वातावरणात राहणं सोपं नव्हतं. महिलांनी पूर्णपणे अंगभर बुरख्यातच(अबाया) राहिलं पाहिजे ही सक्ती. ते जर नाही झालं; तर भर रस्त्यातही धार्मिक पोलीस – मुतव्वा – बायकांना फटके देतात हे पाहायला मिळालं. बायका म्हणजे मुलं जन्माला घालणारं यंत्र ही मानसिकता पुरुषांचीच नाही तर स्त्रियांची सुद्धा. म्हणून कितीही बाळंतपणं झाली तरी आता “दिवस जात नाहीत” अशी तक्रार डॉक्टरीणबाईंकडे करणाऱ्या बायका त्यांना भेटल्या. दिवसभर घरकाम आणि रांधा-वाढा-उष्टी काढा ह्यात पिचलेल्या गृहिणी दिसल्या. घरकामासाठी ठेवलेल्या परदेशी नोकर-नोकरणीला वेठबिगारासारखं वागवणारे मालक दिसले.
नियम भरपूर, शिस्त कडक, चुकल्यास शिक्षा जबर. पण ह्या सगळ्याचा जाच परदेशी लोकांना, गरीबाला किंवा स्थानिक असूनही शिया मुसलमांना. छोट्या छोट्या चुकीसाठी थेट कारावास. तुरुंगातून कधी सुटणार, अजून काय शिक्षा मिळेल ह्याची शाश्वती नाही. लेखिकेच्या पतीलाही खोट्या कारणासाठी एक रात्र तुरुंगात राहण्याचा अनुभव आला. पण जर तुम्ही सौदी स्थानिक असाल, जरा वशिला असेल तर तुम्हाला काही काळजी नाही. तुम्ही मोकाट ! त्यामुळेच स्थनिक तरुणांची, प्रौढांची बेदाराकर वृत्ती, परदेशी लोकांना तुच्छ नोकर म्हणून बघण्याची वृत्ती लेखिकेला बघायला मिळाली.
असं असूनही भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, इतर गरीब आफ्रिकन आणि आशियाई देश इथून लोक पैसे कमवण्याच्या उद्देशाने येताच राहतात. काटकसर करून, गरिबीत राहून पै-पै गोळा करून आपापल्या मायदेशी पाठवतात. “व्यक्ती तितक्या प्रकृती” ह्या न्यायाने सौदीतल्या वास्तव्याचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी लोक काय क्लृप्त्या वापरत; त्यामुळे अडचणीत सापडत ह्याचे अनुभव देखील पुस्तकात आहेत. दुर्दैवाने ज्यांना तिथे मरण आलं अशांच्या नातेवाईकांचे काय हाल झाले ते सांगितलं आहे. हे वाचून “सोन्याच्या धुराचे ठसके” हे पुस्तकाचं शीर्षक किती सार्थ आहे हे पटतं.
तेलाच्या पैशाने अरेबिया श्रीमंत झाला. त्या पैशातून जनतेवरही बरीच खैरात झाली. त्यामुळे शिक्षण, आरोग्यासारख्या सेवा फुकट मिळाल्या. गाड्या, घरं, इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे घेण्याचं सुख त्यांना मिळालं. लोकांनी आरामात राहावं पण राजकरणात जास्त लुडबुड करू नये; विनाकारण प्रश्न विचारू नयेत असा एकूण माहोल. त्यामुळे शिक्षण, दळणवळण, बाहेरच्या जगाशी संपर्क हे सगळं मर्यादेतच राहील ह्याची खात्री मात्र सत्ताधीशांनी केली आहे. धर्माचं आणि राजकीय नियंत्रणाचं जोखड लोकांवर त्यामुळेच घातलेलं आहे. ह्या बद्दलचं सामाजिक निरीक्षणही लेखिकेने आपल्या अनुभवातून मांडलं आहे.
खनिज तेलाचा उद्योग वाढला तसा त्यावर तेलावर प्रक्रिया करणारे मोठमोठाले कारखाने उभे राहिले. मालाची ने-आण करण्यासाठी बंदरे विकसित झाली. जुन्या गावांचं रूप पालटून शहरीकरण झालं. मोठ्या संख्येने परदेशी तंत्रज्ञ तिथे कामावर आले. त्यातून देशोदेशीच्या लोकांच्या आपल्या वसाहती तयार झाल्या. पण ज्याप्रमाणे लेखिकेला पूर्वी स्थानिकांमध्ये मिसळता आलं तसं ह्या नव्या परदेशी लोकांचं झालं नाही. शहरांत राहणारे अरबी तरुण सुद्धा परदेशी शिकून इकडे काम करू लागले. त्यांच्यातही पाश्चात्त्य जीवनशैली रुजू लागली आहे. सौदी अरेबियातली शहरं तरी बदलतायत. काही चांगल्या कारणाने तर काही वाईट कारणांनी. सौदी च्या ह्या स्थित्यंतराचा वेध सुद्धा लेखिकेने घेतला आहे.
ही काही पाने वाचून बघा (फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)
अनुक्रमामणिका
कसं होतं “उम्म खद्रा” गाव …
सौदी अगत्य,खाद्यप्रकारातलं वैविध्य आणि उष्टंमाष्टं खाण्यातलं वैचित्र्य
तिकडे इतके कडक कायदे का बरं असावेत आणि आज ते कायदे इथल्या कामकरी लोकांना कसे त्रासदायक होतायत त्याबद्दल
पैसा आला तरी रक्तातलं वाळवंटी भटकेपण, उन्मुक्तपणा, अरेरावी गेली नाही.
सौदी अरेबियाचा थोडा इतिहास, जरासा भूगोल आपल्याला पुस्तकातून कळतो. समाजव्यवस्थेचं चित्र बऱ्यापैकी डोळ्यासमोर उभं राहतं. त्यामुळे पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचनीय आहेच. हे पुस्तक दुप्पट वाचनीय बनवलं आहे ते लेखिकेच्या लेखन शैलीने. मराठीतले वाक्प्रचार, म्हणी, विविधार्थी शब्द आणि शब्दांचे खेळ ह्यातून पुस्तकाचं प्रत्येक वाक्य रंजक बनवलं आहे. लेखिका अनुभव सांगते आहे पण सांगता सांगता शब्दांशी खेळते आहे. जणू काही अरबस्तानात राहताना मराठी लिहिण्याबोलण्याची झालेली कसर भरून काढते आहे !! आपण उत्सुकतेने आणि मजा घेत घेत पुढे वाचत राहतो. किती पानं झाली हे बघावंसं वाटत नाही. माझा पूर्वीचा अनुभव असा आहे की; परदेशाचे अनुभव वाचताना त्यात उल्लेख असलेल्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ नेटवर लगेच शोधावेसे वाटतात. पण हे पुस्तक वाचताना स्थलवर्णन इतकं छान आहे की डोळ्यासामोर कल्पनाचित्र उभी राहिली. पुस्तक सोडून नेट वर शोधायची इच्छा झाली नाही. तरी, पुस्तकातच त्यांचे जुने फोटो टाकता आले असते तर मजा आली असती.
दळवी दांपत्याचा हात धरून ९०च्या दशकातल्या सौदीचा फेरफटका मारायला उंटावर बसायला तयार रहा. ह्या पुस्तकाचा पुढचा भाग लेखिका लवकरच लिहितील, अशी इच्छा आहे. तो फेरफटका मारण्यासाठी वाचक आलिशान गाडीत बसायला तयारच असतील.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
इतर देशांबद्दलची माहिती, परदेशांतले अनुभव, प्रवासवर्णन इ. बद्दलच्या इतर काही पुस्तकांची परीक्षणे
- एन्ड ऑफ द वर्ल्ड भटकंती (End of the world Bhatakanti) – जयप्रकाश प्रधान (Jayprakash Pradhan)
- काबूल-कंदाहारकडील कथा (kAbul-kandAhArakadil katha)-प्रतिभा रानडे (pratibhaa raanaDe)
- कैफा हालक ओमान (kaiphaa halak Oman ) – सुप्रिया विनोद (Aupriya Vinod)
- गेशा ऑफ गिओन(Geisha of Gion) – मिनेको इवासाकी(Mineko Iwasaki) (अनुवाद : अनुराधा पुनर्वसु)
- चीन वेगळ्या झरोक्यातून (Chin vegalya zarokyatun) – डॉ. अंजली सोमण (Dr. Anjali Soman)
- पाचूचे बेट (Pachuche Bet) – हर्मन मेलव्हिल (Herman Melville) – अनुवाद – भानू शिरधनकर (Bhanu Shirdhankar)
- फिरंगढंग (phirangdhang)-डॉ. शरद वर्दे (Dr. Sharad Varde)
- बोटीवरून (botivarun)-नितीन लाळे (Nitin Lale)
- राशा (Rasha)-शरद वर्दे (Sharad Varde)
- वाट तिबेटची (Vat Tibetachi) – मीना प्रभु (Meena Prabhu)
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दोनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–