झी मराठी या लोकप्रिय मराठी दूरदर्शन वाहिनीने “झी मराठी दिशा” हे नवीन साप्ताहिक नुकतेच सुरु केले. साप्तहिकाच्या अनावरणाच्या बतमीपासून हे सप्ताहिक कसे आहे हे बघायची इच्छा होती. काल अंक विकत घेतला. छान वाटला. म्हणून माझी परीक्षणे वाचणाऱ्यांनाही या साप्ताहिकाची ओळख करून द्यावी असं वाटलं.



विजय कुवळेकर याचे संपादक आहेत. हे साप्ताहिक टॅब्लॉईड आकारातलं आहे. मिडडे, महानगर, मुंबई मिरर ही वृत्तपत्रं असतात तसं. मासिक (magazine या अर्थी) असलं तरी त्याला मुखपृष्ठ-मलपृष्ठ नाही. थेट पहिल्या पानापासून मजकूर आहे. आणि मजकूर आहे हेही विशेष हल्ली कुठल्याही पेपरच्या पहिल्या पानावर बहुतेक गृहप्रकल्पांचीच जाहिरात असते.


४४ पानांच्या या अंकाची किंमत १०रु. आहे. आणि त्यात बरेच वाचनीय लेख आहेत. त्यातील काही लेख आणि लेखकांची नावे उदाहरणादाखल.


या अंकातील लक्षवेधी लेख:

  • राम सेतू सत्य की मिथ्या – बाळ फोंडके
  • वसईतला मराठी नाताळ – स्टॅन्ली गोन्साल्विस
  • एकाकी (इंदिरा गांधींच्या व्यक्तीमत्त्वाचा वेध घेणारा लेख)-नरेंद्र चपळगावकर
  • फोन मेमरी रिकामी करायचीय – प्रशांत जाधव
  • आजगावकर नावाचे साने गुरुजी – डॉ. सागर देशपांडे
  • लाल मातीत फुलले वसुंधरेचे विज्ञान – समीर कर्वे – मराठी विज्ञान परीषदेच्या कुडाळ इथल्या अधिवेशनाविषयी
  • गुंतवणुकीतील पथ्ये – नयना एन. एन.



साप्ताहिकात काही आठवडी किंवा पाक्षिक सदरंही आहेत. जिथे सदर आहे असा उल्लेख आहे किंवा हा एकवेळचा लेख नसून सदर आहे असं मला वाटलं ती सदरे अशी :

  1. चौकातील चर्चा – “बहिर्जी बातमीदार- चालू घडामोडींवर विनोदी खुसखुशीत भाष्य
  2. माईंड इट – रजनी म्हणे – नर्मविनोदी धारावहिक कादंबरी
  3. दिग्गज – दीपा देशमुख, अच्युत गोडबोले – त्या त्या महिन्यात जन्म/मृत्यु झलेल्या असामन्य व्यक्तींची अल्पचरीत्रे
  4. ललित – सुरेश खरे
  5. मधुरव – मधुरा वेलणकर – अभिनेत्री मधुरा वेलणकरच्या मनमोकळ्या शैलीतील सदर
  6. आत्मविकास – स्वामी मकरंदनाथ – पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या शिष्य परंपरेतील लेखकाचे खास तरूणांसाठीचे सदर. या वेळचा विषय “व्यवहार सांभाळून परमार्थ”
  7. सूर नवा – कमलेश भडकमकर – नवोदित, होतकरू गायक गायिकांचा परिचय
  8. गोष्ट गाण्याची – प्रभा जोशी – लोकप्रिय अजरामर गाण्यांमागच्या गोष्टी
  9. आजचा सिनेमा – जयंती वाघधरे – चित्रपट समीक्षा
  10. गावोगावचे शायर – प्रदीप निफाडकर- ठिकठिकाणच्या बेहतरीन शायरांना पेश करणारे सदर
  11. अर्थविचार – – हे गुंतवणूक, कर इ.ना दिलेले पान आहे.
  12. मोठ्यांचे बालपण- – प्रथितयश व्यक्तींच्या बालपणात डोकावणारे सदर
  13. इतर ग्रहगोलांवरचे जग – डॉ. प्रकाश तुपे – खगोलशास्त्रावरचे सदर
  14. आरोग्यसंपदा – वैद्य अश्वीन सावंत – आयुर्वेदिक सल्ले
  15. स्पर्धा परीक्षा – रोहिणी शहा – स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मूलभूत संकल्पना समजावून देणारे सदर
  16. ऑटिझमच्या बेटावर – आशा कबरे मटाले – ऑटिझम विषयीचे सदर
  17. बाळबोध – सुनृता सहस्रबुद्धे – लहान मुलांच्या मोठं होण्याची प्रक्रिया समजावून सांगणारे सदर
  18. कविता – वाचकांनी स्वरचित कविता पाठवायच्या आहेत


लहान मुलांसाठीची सदरे:

  1. गोष्ट .. अर्धी तुमची अर्धी आमची – – नामवंत साहित्यिक अर्धी गोष्ट लिहितील. मुलांनी ती पूर्ण करून पाठवायची. मूळ लेखक परीक्षण करून विजेते ठरवतील. विजेत्यांना पारितोषिक आहे.
  2. चित्र रंगवून पाठवायची स्पर्धा.
  3. बालकिशोर – लहान मुलांसाठी छोट्या गोष्टी, सामान्य ज्ञान

इतर: व्यंगचित्रे (हास्यदिशा – श्रीनिवास प्रभुदेसाई ), शब्दकोडे, राशीभविष्य, बॉलिवूड बातम्या गप्पा, क्रीडाविषयक (बातम्या,विश्लेषण,लेख), वाचकांचा प्रतिसाद इ. आहेच.


सुटसुटीत छपाई, रंगित-कलात्मक मांडणी असली तरी झगमगित/गुळगुळीत कागदाचा वापर केलेला नाही हे पण मला आवडलं. नाहितर ट्युबलाईटच्या उजेडात वाचताना त्रास होतो. रोजच्या वर्तमानपत्रातली नकारात्मकता टाळून चांगलं वाचायला मिळतंय हाही चांगला भाग आहे. झी मराठीचं प्रकाशन असलं तरी वाहिनीवरच्या मालिकांची जाहिरात किंवा त्यांचा उदोउदो कुठेच दिसला नाही.


एकूणच ४४ पानी साप्ताहिकात लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत, गंभीर विषयांपासून हलक्याफुलक्या लेखांपर्यंत, ज्ञान, विज्ञान, साहित्य, संगीत, अर्थकारण, समाजकारण, शेरोशायरी, स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन, आरोग्य अशा आपल्या जगण्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक पैलूबद्दल काही ना काही आहेच. लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, चित्रलेखा यांसारख्या प्रसिद्ध मासिकांच्या यादीत “झी मराठी दिशा” स्थान मिळवेल हे निश्चित. ज्यांना मासिकवाचन आवडते त्यांना आवडेलच पण ज्यांना पुस्तकं वाचायला कंटाळा येतो, खूप वाचायला कंटाळा येतो त्यांना हे वाचन सोपं, सुटसुटीत आणि तरीही ज्ञानवर्धक वाटेल. 


———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )

———————————————————————————-

———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

———————————————————————————-

तांत्रिक/औपचारिक माहिती