पुस्तक :- आहार सूत्र-भाग ३ (गाथा आहारशास्त्रातल्या शोधांची) (Aahar sutra : Part3)
लेखिका :- डॉ. मालती कारवारकर (Dr. Malati Karwarkar )
भाषा:- मराठी (Marathi)
पाने :- १३४
पुस्तकाचं आणि लेखिकेचं नाव वाचूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हे आहारशास्त्रावरचं पुस्तक आहे.
आहाराचा शरीरावर, मनावर काय आणि कसा परिणाम होतो; कुठलं अन्न खाण्याचा काय परिणाम होतो; कश्या पद्धतीने शिजवलेलं, वाढलेलं, खाल्लेलं अन्न याचा कसा परिणाम होतो या बाबत पाशात्त्यांनी वेगवेगळं संशोधन आणि सर्वेक्षण केलं आहे. अश्या विविध संशोधनांची माहिती शक्य तितकी तांत्रिकता टाळून सोप्या शब्दात देण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. अनुक्रमणिकेवर लक्ष टाकलं तर यात आलेल्या विषयाची कल्पना येईल.
पुस्तकात जीवनसत्त्वे आणि त्यांचे परिणाम, शरीरात स्त्रवणाऱ्या संप्रेरकांची (हार्मोन्सची) माहिती मिळते. आपलं शरीर किती जटिल यंत्र आहे; नाना प्रकारच्या रसायनांची निर्मिती करणारा जिवंत कारखाना आहे हे लक्षात आलं की अचंबित व्हायला होतं. अश्या या अफाट यंत्राची निगा राखायची तर तर आहार कधी, कुठे, कसा, किती घ्यायचा हे समजलंच पाहिजे.
पुस्तकात अमुक एक आहाराच्चा तक्ता, प्लॅन दिलेला नाही. त्यामुळे पुस्तक वाचुन तुम्हाला तुमचा आहार “रेडीमेड” मिळणार नाही. पण आपण करत असलेल्या चुका जाणवतील. ज्या गोष्टी योग्य करतोय त्या बद्दल पुस्तकात वाचून स्वतःचे कौतुक करण्याचे क्षण येतील. काही “टीप्स” मिळतील. सगळ्यात मह्त्त्वाचं म्हणजे आपल्या आहाराकडे डोळे उघडे ठेवून बघायला सुरूवात होईल. आरोग्याकडे एक पाऊल पुढे पडेल. हेच या पुस्तकाच्या वाचनाचं फलित.
“खाल तसे व्हाल”, “खाल तसे दिसाल”, “अन्न हे पूर्णब्रह्म” ही आपल्या नेहमीच्या बोलण्यातली वाक्यं. चौरस आहाराचं महत्त्व आपण शाळेत असल्यापासून शिकतो. माहीत असतं तरीही कळतं पण वळत नाही अशी अवस्था आपली असते. कदाचित “अजून” कळलं तर आपण “वळायला” लागू या उद्देशानेच हे पुस्तक वाचलं पाहिजे.
————————————————————
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
————————————————————
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
———————————————————————————-