पुस्तक :- आवरण (AavaraN)

भाषा :- मराठी  (Marathi) 

मूळ भाषा :- कन्नड (Kannada) 

लेखक :- डॉ. एस. एल. भैरप्पा (Dr. S. L. Bhairappa )

मराठी अनुवाद :- उमा कुलकर्णी (Uma Kulakarni)



साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांची हिंदू-मुस्लीम संबंध विशेषतः मुस्लीम राजवटीत झालेल्या निंद्य-क्रूर घटनांचा मागोवा घेणारी ही कादंबरी आहे.


बाबरी मशीद पाडल्यावर देशात पुन्हा एकदा धार्मिक सलोखा वाढावा यासाठी प्रचारकी ढंगाची माहितीपट (डॉक्युमेंटरी) करायचं काम एका टीमला दिलं जातं. त्यातले लेखन-दिग्दर्शन करणारे नवरा बायको मुस्लीम जोडपं असतं. त्यातली बायको- रझिया ही लग्नाआधीची हिंदू -लक्ष्मी. कर्नाटकातल्या एका गंधिवादी कुटुंबात वाधलेली एक हिंदू मुलगी. ती बुद्धीवादी, उच्चशिक्षित असते. कॉलेजमध्ये तिच्या वर्गातल्या एका मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडते. घरच्यांचा विरोध झुगारून त्या मुलाशी लग्न करते. एक प्राध्यापक तिला पाठिंबा देतात.ते जन्माने हिंदू पण धर्म न मानणारे, स्वततःला समाजवादी, पुरोगामी म्हणणारे असतात. जीर्णवादी हिंदू धर्म सोडून ती कशी समानतेचा मुस्लिम धर्म स्वीकारते आहे हे पटवतात. लग्नामुळे घरच्यांशी संबंध तुटतात ते कायमचेच.


 लग्नानंतर तिला दोन्ही धर्मातले चांगले वाईट फरक जाणवू लागतात. बुरखा घालायची सक्ती, कुंकू लावयला विरोध, बाहेर पडायला विरोध, अशा सासरकडच्यांच्या आणि मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाला तोंड देत ती आपला कलेचा प्रवास सुरू ठेवते.


माहितीपटात मुस्लीम राजवट कशी चांगली होती, सर्वधर्मीय कसे सुखेनैव नांदत होते, हिंदूंमधल्या शैव-वैष्णव आणि इतर पंथांच्या वादातून त्यांनीच मुसलमानांकरवी दुसऱ्या पंथांची देवळं कशी फोडून घेतली असं खोटंनाटं पसरवण्याचा प्रय्त्न सुरू असतो. तिचं बुद्धीवादी मन त्याने अस्वस्थ होतं. अशात तिच्या वडीलांचं निधन होतं आणि तिला पुन्हा आपल्या गावी जायला मिळतं. तिला कळतं की आपल्या लग्नामुळे अस्वस्थ झालेले वडील आपल्या लग्नापासून आज पर्यंत इस्लामचा, इस्लामच्या इतिहासाचा, मुसलमान राजवटीचा प्रचंड अभ्यास करत होते. त्यांनी खूप ग्रंथसंपदा वाचली आहे, टिपणं काढली आहेत. यामुळे अवाक्‌ झालेली तीही हा सगळा अभ्यास स्वतः करायचं ठरवते. त्या अभ्यासातून तिला भारतीय इतिहासातील एका काळ्या पर्वाची सत्यता कळते. हा इतिहास ती एका कादंबरीच्या रूपाने आणायचं ती ठरवते. तिच्या कादंबरीतल्या प्रकरणांतून आपल्याला दिसतो काळाकुट्ट इतिहास – मुस्लीम आक्रमण आणि त्यात झालेले अत्याचार. असंख्य हिंदूचे जबरदस्तीने केलेल धर्मांतरण. लाखोंच्या कत्तली. लाखो हिंदू स्त्रीयांची विटंबना, गुलाम आणि वेश्या म्हणून जनानखान्यात भरती. कोवळ्या मुलांचे जबरदस्ती निर्बीजिकरण करून त्यांना हिजडे बनवून जनानखान्यावर झालेल्या नेमणूका. मुस्लिमेतरांवर लादलेला जिझीया कर. राज्य टिकवण्यासाठी सुलतानाला हिंदू राजकन्या देण्याच्या घटना तर कुठे शीलारक्षणासाठी केलेला जोहार. आणि सहस्त्रावधी देवळांचा विध्वंस. 


रझियाच्या कादंबरीचं मुख्य पात्र आहे एक रजपूत राजकुमार जो एका युद्धात मुसलमानांकडून पकडला जातो. त्याच्या डोळ्यादेखत राजाचं विष्णूमंदीर पाडलं जातं. त्याला नबरदस्तीने खोजा(हिजडा) बनवलं जातं. मुसलमान बनवलं जातं. आधी मुस्लीम सुलतानाच्या वासना विकृतीचा बळी तो पडतो आणि जनानखान्यात नोकरीला नेमला जातो. पुढे त्याच्या डोळ्यादेखत घडतो औरंगजेबाच्या आदेशाने  काशीच्या विश्वनाथ मंदिराचा विध्वंस. त्याच्या डोळ्यांनी बघिततलेला वृत्तांत तो सांगतो. पुजारी आधल्या रात्रीच शंकरांची पिंड विहिरीत विसर्जित करतात. दुसऱ्या दिवशी तोफा डागून मदीराच्या भिंती पाडल्या जातात. मुख्य रचना तशीच ठेवून तिचं मशिदीत रूपांतर होतं. पुढे मथुरा आणि सर्वत्र मंदिरंचा नाश करण्याचा सपाटा सुरू होतो.


कादंबरी एकिकडे लिहीत असताना रझियाच्या आयुष्यातही वेगवेगळ्या घटना घडतात. आपल्या आजी-आजोबांपाशी जास्त वाढलेला तिचा मुलगा कट्टर मुसलमान होतो. नवरा तलाक देऊन दुसरी बायको करतो. ती ज्या बुद्धीजीवी वर्गातल्या परीषदांमध्ये जाते तिथे कुणिही मुलसमान कालखंडाची सत्य परिस्थिती मांडत नाही. सगळं कसं अलबेल होतं, इंग्रजांनी दुही माजवली हेच जनतेला कसं पटवलं पाहिजे याचा खल करतात. तिला लग्नासाठी पाठिंबा देणारे प्राध्यापक शास्त्री सुद्धा कसे सत्याशी अप्रामणिक आणि स्वार्थी बुद्धीवादी आहेत हे प्रत्ययाला येतं.


तिला धर्माविषयी विषेशतः मुस्लीम धर्माविषयी प्रश्नचिन्ह उभी रहतात. आपलाच धर्म सर्वश्रेष्ट असा अहंकार का ? तो दुसऱ्यावर लादायची जबरदस्ती का ? त्याला इस्लामच्या इतिहासातच कसा आधार आहे. आणि हा विध्वंस आम्ही केला इथल्या लोकांना आमच्या धर्मात कसं ओढलं, मंदिरं कशी पाडली हे सर्व मुस्लिम राजेच आपल्या चरित्रात, बखरीत अगदी अभिमनाने सांगतात तर ते नाकारण्याचा दुटप्पी पणा हे तथाकथित पुरोगामी का करतात. या चुका मान्य करून इतिहासातून धडा घेऊन त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी का प्रयत्न होत नाहीत. खोटेपणाच्या पायावर उभं केलेलं असं सामंजस्य किती टिकणार.


असं हे पुस्तक खऱ्या गोष्टी निर्भीडपणे आणि तरीही कलात्मकतेने मांडतं. विध्वंस आपल्या डोळ्यासमोर उभं करतं कुठलीही बटबटीत, जहाल भाषा न वापरता. धर्मश्रद्धांवर प्रश्न उपस्थित करतं उपहास-चेष्टा न करता. धर्मश्रद्धा आणि त्यांची सुरुवात झाली तेव्हाच्या समाजाची नैतिकतआ याची तात्त्विक चर्चा करतं. 


ही कादंबरी असली तरी कल्पित नाही. कादंबरीच्या शेवटी दहा पानी संदर्भग्रंथांची सूची दिली आहे. त्यात मोगलकाळातील पुस्तकं आहेत; इंग्रजांची आहेत; इस्लामवर अभ्यासपूर्ण पुस्तकं आहेत. हे पुस्तक भाषांतर आहे असं कुठेच जाणवत नाही इतका सहजपणा भाषांतरात आहे. 


खरंच प्रत्येक हिंदूने हे वाचलंच पाहिजे पण मुसलमानानेही हे वाचलंच पाहिजे. खरा इतिहास समजून घेतलाच पाहिजे. तेव्हा काय झालं ? का झालं ? ते पुन्हा होऊ शकेल का ? ते पुन्हा होऊ द्यायचं आहे का? नसेल तर काय करायला पाहिजे ? आपल्या धर्मश्रद्धांचा फेर-विचार मुस्लिम धर्मियांनी केला पाहिजे. मायेचं आवरण भेदून निखालस सत्य ओळखलं पाहिजे. 


इतकं परखड लिहिणारं पुस्तक आपल्या तथाकथित “सेक्युलर” देशात प्रसिद्ध कसं होऊ शकलं, त्यावर बंदी कशी आली नाही हेच विशेष. उलट दोन वर्षांत वीस आवृत्त्यांचा पल्ला मूळ कन्नड कादंबरी ने गाठला आहे


या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतरही “Aavarana The Veil” या नावाने  उपलब्ध आहे 

http://www.amazon.in/Aavarana-Veil-S-L-Bhyrappa/dp/8129124882



————————————————————

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )

————————————————————







———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

———————————————————————————-