पुस्तक : अद्वैताचं उपनिषद (Advaiyacha Upanishad)

लेखिका : शुभांगी भडभडे (Shubhangi Bhadbhade)

भाषा : मराठी (Marathi)

पाने : ४७६

ISBN : दिलेला नाही

श्रीमद्‌ आदिशंकराचार्यांच्या जीवनावरची ही कादंबरी आहे. शंकरांचार्यांच्या लहानपणापासून त्यांच्या समाधीपर्यंतच्या पूर्ण जीवनपटाचे यात वर्णन आहे. जन्मापासून अतिशय प्रज्ञावान असणाऱ्या शंकराचार्यांनी तिसऱ्या वर्षांपर्यांतच अनेक ग्रंथ मुखोद्गत केले होते. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर पाचव्या वर्षीच त्यांची मुंज होऊन ते त्यांच्या गावाजवळच्या गुरूंकडे शिक्षणासाठी गेले. त्यांनंतर नर्मदेकाठी गोविंदाचार्यांकडे शिकायला गेले. पुढे त्यांच्या गुरू गौडपादाचार्यांकडे शिकण्यासाठी हिमालयात गेले. ज्ञानसंपन्न बालशंकर या भ्रमणातून अनुभवसंपन्नसुद्धा होत होता. देशस्थिती बघत होता. बौद्ध आणि जैनधर्माचे वाढलेले प्रस्थ, हिंदू धर्मात अनेक पंथांचा सुळसुळाट आणि परस्परद्वेष, कर्मकांडात गुरफटलेले विद्वान, नरबळीसारख्या अघोरी प्रथांना मिळालेले स्थान यामुळे ते अस्वस्थ होत होते. या सगळ्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी पुन्हा पुन्हा भारतभर फिरले. वेगवेगळ्या पंथांच्या शिष्यांशी अध्यात्मिक शास्त्रचर्चा केली. सर्व पंथांमध्ये आराध्यदेवता वेगळ्या असल्या तरी शेवटी सगळे एकाच ईशतत्त्वाला भजतात हे त्यांना पटवून त्यांच्यात सामंजस्य निर्माण केलं. एकीकडे लोकांमध्ये असा प्रचार तर विद्वानांबरोबर चर्चा करून ते कर्मकांड, द्वैत यापेक्षा अद्वैत मताची यथार्थता पटवून देत होते. म्हणजे तार्किक पातळीवर अद्वैत, निराकाराची उपासना प्रतिपादताना सर्वसामान्यांना या अवघड वाटेवर न ढकलता सोप्या भक्तीमार्गाचे मनापासून स्वागत राहिले. कर्मकांड टाळून शुद्ध भक्तीसाठी असंख्य स्तोत्रं रचली. त्यांचं हे कार्य चिरस्थायी रहावं यासाठी त्यांनी भारताच्या चारही दिशांना मठ स्थापन केले. त्यांची योग्य व्यवस्था लावून दिली.

शंकराचार्यांनी ३२ वर्षांच्या अल्प आयुष्यात इतकं प्रचंड काम केलं, इतक्या व्यक्तींशी वाद-संवाद साधले, स्तोत्रं रचली की ते सगळ्या घटना कादंबरीत मांडणं मोठं आव्हान आहे. लेखिकेने ते छान पेलले आहे. पौराणिक कादंबऱ्यांत वापरली जाणारी प्रौढ संस्कृतप्रचुर मराठी भाषा आहे. वेगवेगळे शास्त्रार्थ कसे झाले असतील, काय प्रश्न विचारले गेले असतील याचं मनोज्ञ चित्रण आहे. हे चरित्र नसून कादंबरी आहे त्यामुळे कादंबरीचे नायक शंकराचार्यांच्या भावभावनाही यथार्थ वर्णन केल्या आहेत. बाल शंकर; आपला अकाली मृत्यू होणार आहे हे जाणवल्यावरचा शंकर; गुरूप्राप्ती होऊन आचार्य झाल्यावरचे शंकर;  मठाधिपती म्हणून शिष्यांची नेमणूक केल्यावर आता त्यांची भेट होणार नाही म्हणून व्याकुळ होणारे आचार्य; आपल्या आईला आपण पुत्रसुख देऊ शकलो नाही हा सल सहन करत कर्तव्य-भावना यांचा तोल सांभाळणारे पुत्र, कार्यपूर्ती झाल्यावर समाधीकडे प्रस्थान करणारे जगद्गुरू असे भावनांचे नाना रंग लेखिकेने भरले आहेत.काही उतारे वाचलेत की पुस्तकाचे रूप समजून घेता येईल.

बाल शंकरच्या आयुष्यातील एक प्रसंग :

बौद्धधर्माच्या प्रचारामुळे बरेच ठिकाणी हिंदूमंदिरातील मूर्तीपूजा बंद पडली होती, मूर्ती नाहिशा झाल्या होत्या. अश्या मंदिरात शंकराचार्यांनी मूर्तिस्थापना करून हिंदूधर्मियांना आत्मविश्वास दिला अशी वर्णने कादंबरीत आहेत. त्यातला एक प्रसंग

शास्त्र-वेद-विज्ञानाच्या चर्चांतून त्यांनी नाना पंथीयांना एकत्र आणले. ही रक्तविहीन क्रांती होती ज्यातून देश एकत्र आला. असाच एक प्रसंग

पीठस्थापनेचा हा प्रसंग

वर म्हटलं त्याप्रमाणे शंकराचार्यांच्या मनोवृत्तीचाही वेध घेण्याचा प्रयत्न अनेक प्रसंगांत केला आहे. शंकराचार्यांच्या मनाची कातर अवस्था दाखवणारे हे स्वगत

त्यांनी वेगवेगळी स्तोत्रे प्रसंगोपत रचली. प्रसंगाच्या ओघात त्याचाही उल्लेख आहे. शास्त्रार्थ करून अद्वैत मत सिद्ध करण्याचे प्रसंग कादंबरीत पुन्हापुन्हा येतात त्यामुळे काहीवेळा ते कंटाळावाणं होतं. कारण प्रत्यक्ष चर्चा खूप गहन असणार ते सगळं तसं पुस्तकात मांडणं शक्य नाही आणि पुस्तकाचा तो मुख्य विषयसुद्धा नाही. पण त्यामुळे त्याचप्रकारचे प्रसंग पुन्हापुन्हा वाचल्यासारखे वाटतात.

बौद्ध आणि जैनमताचा प्रचार झाला होता होता हा उल्लेख वारंवार येतो. पण त्यामुळे नक्की समाजाचं काय वाईट झालं होतं हे शेवटपर्यंत कळत नाही. एका शास्त्रार्थात हा प्रश्न विचारला गेल्याचं दाखवलं आहे. पण आचार्यांच्या तोंडून त्याचं स्पष्ट उत्तर नाही.

शंकराचार्यांच्या आयुष्यात घडलेले चमत्कार सुद्धा पुस्तकात आहेत पण ते योगायोग असावेत किंवा काही कल्पना असाव्यात अश्या रूपात मांडून अंधश्रद्धा पसरवल्या जाणार नाहीत आणि आचार्यांचं मानवत्त्व पुसलं जाणार नाही याची काळजी घेतली आहे.

पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती

वाचकाला थेट आदिशंकराचार्यांच्या काळात नेऊन त्यांच्या महान कार्याचं महत्त्व मनावर बिंबवणारी ही कादंबरी रसिक वाचकाला वाचायला आवडेल.

———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )

———————————————————————————-

———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————-