

पुस्तक – अनुभाषिते (Anubhashite)
लेखिका – मंजिरी धामणकर (Manjiri Dhamankar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १४८
प्रकाशन – अल्टिमेट असोसिएट्स. मी २०२५
छापील किंमत – रु. २५०/-
ISBN – 978-93-91763-61-9
भारताची प्राचीन भाषा संस्कृत अतिशय समृद्ध आहे. वेद-उपनिषदे, रामायण, महाभारत, आयुर्वेद, काव्य, अर्थशास्त्र, स्थापत्यशात्र अशा हजारो ग्रंथांनी आपले पारंपरिक ज्ञान जतन केले आहे. मोठमोठी काव्ये आणि ग्रंथ जसे प्रसिद्ध आहेत तसा अजून एक प्रकार लोकप्रिय आहे तो म्हणजे “सुभाषित”. एक मोठा आशय, संदेश, आयुष्याबद्दल मार्गदर्शन करणारा दोन किंवा चार ओळींच्या श्लोक म्हणजे सुभाषित असं ढोबळमानाने म्हणता येईल. वेगवेगळ्या उपमा देऊन मुद्दा स्पष्ट करणे, शब्द-अक्षरं ह्यांच्या पुनरुक्तीतून नादमाधुर्य साधणे, दोन ओळींची शेवटची अक्षरे समान ठेवणे (यमक जुळवणे) अशा नाना प्रकारांनी ही सुभाषिते आपल्यापर्यंत ज्ञान व भाषासौंदर्य पोचवतात. ज्यांनी शाळेत संस्कृतचा थोडा अभ्यास केला असेल त्यांना ही सुभाषिते थोडी आठवत असतील. अजूनही काही पाठ असतील. म्हणी, वाक्प्रचारांप्रमाणे सहज बोलता बोलता सुभाषितांचा वापरही कोणी करत असेल. काहीवेळा तर चारपाच शब्दांची एखादी संस्कृत ओळ आपण म्हणीसारखी वापरतो. पण ती ओळ एका श्लोकाचा – सुभाषिताचा – भाग आहे हे आपल्या लक्षात येत नाही. “अतिपरिचयादवज्ञा”, “बादरायण संबंध”, “वसुधैव कुटुंबकम्” हे ऐकल्यासारखं वाटतंय ना? हे शब्द सुभाषितांचे भाग आहेत. त्यामुळे सुभाषिते वाचणे व ती आचरणात आणणे हे प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. सुभाषितांच्या शब्दांचा, रचेनचा आस्वाद घेत ती वाचली तर गंमत अजूनच वेगळी. परीक्षेच्या दडपणाखाली पाठांतर केलं असेलही आणि आता विसरालाही असाल. पण आता निखळ आनंदासाठी सुभाषितं वाचून बघा, समजून बघा, पाठ करून बघा. त्यासाठी वाचा हे पुस्तक “अनुभाषिते”.
लेखिका मंजिरी धामणकर ह्यांनी आपल्यासाठी उत्तमोत्तम सुभाषिते निवडून त्यांचा मराठीत अर्थ दिला आहे. त्याचबरोबर मराठीतही श्लोक स्वरूपात त्याचं भाषांतर दिलं आहे. त्या सुभाषिताची गंमत, शब्दांचं वेगळेपण सांगितलं आहे. आणि हे सगळं निवेदन लेखिका आपल्याशी संवाद साधते आहे अशा पद्धतीने लिहिलं आहे. त्यामुळे तुम्हाला संस्कृत भाषा येत असो वा नसो, तुम्हाला ह्या पुस्तकाचा आनंद घेता येईल.
पुस्तकात २८ प्रकरणे आहेत. एकेक विषय घेऊन त्या त्या विषयांशी संबंधित सुभाषिते दिली आहेत. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी एक संदेश किती वेगवेगळ्याप्रकारे आपल्याला सांगितला आहे हे समजतं. तर काही वेळा काही शब्द, उपमा, साहित्यिक संकेत पुन्हापुन्हा येतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टी पूर्वी किती रूढ झाल्या होत्या हे ही जाणवतं. सुभाषितांचा संदेश गांभीर्याने घ्यायचा असला तरी ते सांगताना काही वेळा विनोदी शैली सुद्धा दिसते. त्यासाठी मूर्खांची लक्षणे बघण्यासारखी आहेत.
काही पाने उदाहरणादाखल…
अनुक्रमणिका


मित्र ह्या विषयी सुभाषित

कधी बोलावं आणि कधी बोलू नये हे “कोकिळेला” सांगणारी सुभाषितं.. “लेकी बोले सुने” लागे ह्या न्यायाने आपल्यालाच सांगतायत.

प्रहेलिका अर्थात कोडी सुद्धा आहेत.

पुढची लक्षणे आणि स्वतःचे वागणे ताडून बघूया. काही साम्य आढळलं तर “सावर रे !”

वरील उदाहरणे वाचून ही सुभाषितं किती अर्थगर्भ आहेत, लेखिकेने त्याचा अर्थ कसा थोडक्या आणि सोप्या शब्दांत सांगितला आहे हे लक्षात आलं असेलच. मराठीतले श्लोक सुद्धा मराठीतली सुभाषितेच झाली आहेत. त्यामुळे “अनुभाषिते” हे नाव सार्थ आहे.
भाषा हा माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे पुस्तक मला आवडलेच. लेखिका मंजिरीताई आणि मी एकाच “पुस्तकप्रेमी” नावाच्या व्हॉट्सअप आधारित साहित्यिक चळवळीचे सदस्य आहोत. आणि ह्या समूहाच्या संमेलनात पुस्तकाचे अनौपचारिक प्रकाशन काही सदस्यांच्या हस्ते झाले त्यातला मी एक होतो. त्यामुळे पुस्तक अधिकच जवळचे झाले.


पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले त्यालाही मी उपस्थित होतो.

तर असे हे पुस्तक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना वाचनीय आणि आचरणीय आहे. संग्राह्य आहे.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
