पुस्तक :-  Beach Baylon (बीच बॅबीलॉन)

लेखक :- Imogen Edwards-Jonnesअथांग पसरलेल्या महासागरातल्या एखाद्या निसर्गरम्य बेटावर सर्व सुखसोयींनीयुक्त पंचतारांकित हॉटेलात सुट्टी घालवणं हे अनेक अतिश्रीमंत अब्जाधिशांसाठी नेहमीची बाब. पण गरीब, मध्यमवर्गीयांसाठी मात्र ते केवळ स्वप्नवतच. अशाच स्वप्ननगरीची सैर “बीच बॅबीलोन” या पुस्तकातून लेखक आपल्याला घडवून आणतो. एक आठवडाभर राहून आणतो. 


या पुस्तकाचा नायक आणि निवेदक त्या हॉटेलचा मुख्य मॅनेजर आहे. आणि एक आठवडा आपण त्याच्या बरोबर वावरतो त्याचं काम बघत बघत. 


महासागरातल्या एका दूर कोपऱ्यातल्या बेटावर तारांकित हॉटेल चालवायचं म्हणजे सगळा माल आयात होणार; जिथे मालाची खासियत तिथून ! मग चीझ फ्रन्स मधून, मासे श्रीलंकेतून, भाज्या ऑस्ट्रेलियातून असा प्रकार. काम करणारी माणसंही त्या त्या क्षेत्रातले तज्ञ आणि जगभरातून आलेले- “सुशी” करणारा जपानी, मसाज करणाऱ्या थाई ई. 


या बेटावर अतिश्रीमंत येतात – आपल्या आपल्या चैनीच्या कल्पना घेऊन. कोणाला फक्त आराम करायचा असतो, तर कोणाला खूप स्वीमिंग, कोणला उंची मद्याचा, जेवणाचा अस्वाद घ्यायचा असतो तर कोणाला फिटनेसचं कौतुक. समुद्रातली सैर, वाळूवर पडून राहून ऊन खाऊन टॅन होणं, मेनिक्युअर-पॅडीक्युअर-मसाज-स्पा यांचा आनंद घेणं, महागड्या वस्तू-दागिने खरेदी करणं हे ही कार्यक्रम असतात. कोणी कुटुंबाबरोबर येतं तर कुणी कुटुंबापासून दूर मजा येतानाच वेश्या घेऊन येतं. 

कधी कोणाला एकच विशिष्ट ब्रॅंडची दारू हवी, तर कोणला लग्नाच्या वाढदिवसासाठी विशिष्ट जातीची गुलाबाची फुलंच. मग ती जगातून कुठुनही आणू देत. हजारो डॉलर्स लागू देत. पण हवं ते हवं.

प्रत्येकजण उद्योग, राजकारण, सिनेमा यातली बडी असामी. आणि हवा तितका पैसा – हजारो डॉलर्स फेकायची प्रत्येकाची तयारी. त्यामुळे कोणाला नाही म्हणायची प्राज्ञा हॉटेल व्यवस्थापनाची नाही.

त्यामुळेच अशा लहरी व्यक्तींची मर्जी सांभळताताना कसे नाकी नऊ येतात हेच लेखक आपल्याला दाखवतो. उदा. बरेचसे युरोपियन लोक ऊन खाऊन टॅन होण्यासाठी आलेले असतात. अशावेळी वातावरण ढगाळ झालं तर जणूकाही तो हॉटेलवाल्यांचाच दोष अशा पद्धतीने तक्रार करून हे पाहुणे मॅनेजरला भंडावून सोडतात. 


पंचतारांकित हॉटेल कसं चालतं, त्याच्या झगमगीमागे काय अडचणींचा सामना करावा लागतो याचा एखादा माहितीपट आपण “डिस्कवरी”, “नॅशनल जिओग्राफिक” वर आपण बघत आहोत असं वाटतं.

“जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे” या उक्तीचा प्रत्यय पुस्तक वाचताना नक्की होतो. 


लेखकाची शैली चांगली आहे, भाषही साधी सरळ समजायला सोपी आहे. कधी कधी एकामागून एक समस्यांबद्दलच वाचावं लागतं त्यामुळे एकसुरी पणा येतो. तरीही थोडी विश्रांती घेतली की पुन्हा वाचायला मजा येते.


मग काय म्हणताय?? एकदा बेटावर राहून येणार ?


————————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )

————————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

———————————————————————————-