पुस्तक – चंद्रमुखी (Chandramukhi)
लेखक – विश्वास पाटील (Vishwas Patil)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – ३१५
प्रकाशन – राजहंस प्रकाशन, ऑगस्ट २००४
ISBN – 81-7434290-7
छापील किंमत – रु. २००/-काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपट म्हणजे तमाशाप्रधान कथानक असणारे असायचे. हल्लीच्या काळात ते प्रमाण कमी झालं आहे. तरी तमाशाशी संबंधित “नटरंग” आणि “चंद्रमुखी” हे चित्रपट गाजले. त्यातील “चंद्रमुखी” चित्रपट ज्या कादंबरीवर आधारित आहे ते हे पुस्तक. दौलतराव देशमाने हा तरुण आणि कर्तबगार राजकारणी आणि चंद्रमुखी ह्या तमाशा कलावंतिणीच्या प्रेमाची ही गोष्ट आहे.

लेखकाची पुस्तकात दिलेली ओळख

  

गरिबीतून वाढलेल्या पण बुद्धीने हुशार दौलत देशमाने ह्याच्याकडे एका प्रस्थापित राजकारण्याची नजर जाते. त्याच्या गुणांची पारख करून ते त्याला शिक्षणात मदत करून पुढे राजकारणात आणतात. आपला जावईसुद्धा करून घेतात. आता “दौलतराव” हुशार, कर्तबगार, लोकप्रिय असा खासदार आहे. पंतप्रधान “मॅडम”चा अतिशय विश्वासू सहकारी आहे. त्याचा साडू – नानासाहेब – त्याला एकदा तमाशा बघायला घेऊन जातो. खाजगी बैठकीत थोड्याच लोकांसमोर चंद्रमुखी लावणी सादर करते. आणि दौलतला ती पाहिल्या झटक्यात आवडते. मनात घर करते. मुंबईला परत आला तरी ती मनातून जात नाही. आणि मग सुरु होतो दौलत आणि चंद्राचा प्रेमसहवास.

विवाहित, दोन मुलांचा बाप असलेला दौलत एका “तमाशा वालीच्या” प्रेमात पडलाय ही घटना त्याच्या कौटुंबिक आयुष्यात वादळ निर्माण करतेच; आणि राजकीय जीवनातही. आपल्या बायकोला फसवणारा, आणि तमासगीर कलावतीचं शोषण करणारा अशी त्याची प्रतिमा निर्माण करून त्याच्या राजकीय कारकीर्दीला धुळीस मिसळण्याचा डाव विरोधक टाकतात.

हे डाव कोण टाकतं ? सगळ्या आतल्या खबरा कोण देतं? दौलत हे लपवणार का स्वीकारणार ? ह्या डावाचं पुढे काय होतं ? तो पराभूत होतो का ? चंद्राला सोडतो का स्वीकारतो ? का चंद्राच त्याला सोडते ? हे सगळं समजून घेण्यासाठी कादंबरी वाचा.

दौलतचं आयुष्य हा मुख्य धागा असला तरी पुस्तकात एक समांतर धागा आहे तो म्हणजे ‘तमाशा कलावंतांचं आयुष्य’. चंद्रमुखी, तिची आई हिराबाई, तमाशा बारीची मालकीण लालन, नाच्या – बत्तासेराव, गायनमास्तर अशी पात्र येतात. त्यांच्या संवादातून तमाशा कलावंताचं आयुष्य, त्यातल्या अडचणी, अगतिकता, लैंगिक शोषण ह्या सगळ्याचं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. छानचौकीच्या दुनियेत पैसे उडवून अय्याशी करणारे राजकारणी-बिल्डर-अधिकारी दिसतात तसेच अय्याशीच्या अतिरेकापायी भिकेला लागलेले नगही दिसतात. “शृंगारिक”लावणी गाणारी, त्यावर नाचणारी ही कलाकार असते. ती शृंगाराचा आभास निर्माण करणारी कलाकार आहे; शृंगाराची भोगवस्तू नाही अशी मर्यादा जपणाऱ्या स्वाभिमानी कलाकार दिसतात. तर “बारी”त नाचून “ओली बैठक”करून पैसा उधळणारा “मालक” कधी गावेल हे बघणाऱ्या धंदेवाईक नाच्या पण दिसतात. कलाविश्वाचा हा झगमगाट आणि त्या मागचा काळाकुट्ट अंधार कादंबरीला एक सामाजिक कादंबरी सुद्धा करतो.

काही प्रसंग वाचा
चंद्रमुखीची आई हिराबाई जुन्नरकर आणि तरुण चंद्रमुखीचा एक तमाशा प्रसंग


खूप दिवसांनी दौलत चंद्राला भेटायला येतो तेव्हा रुसलेली, लटके रागावलेली चंद्रा ह्यांचा प्रेमसंवाद


दौलतचा नाद सोड, तो मोठा माणूस त्याला आणखी कोणीतरी नटवी भेटेल, शेवटी तो पुरुषच… त्याच्या नदी लागण्यापेक्षा आपण स्वतःचा फड उभा करू असं चंद्राला तिची आई परोपरीने सांगत असते तो प्रसंग.


कादंबरीची मुख्य रूपरेषा तुम्हाला कळली. आता वळूया जरा त्याच्या मांडणीकडे. विश्वास पाटलांच्या “पांगिरा”, “झाडाझडती”, “महानायक” ह्या मी वाचलेल्या कादंबऱ्या जशा मनाची पकड घेतात, व्यक्तिरेखा मनात ठसतात; संवाद अगदी तसेच घडले असतील असे वाटतात तसे ह्या कादंबरीत होत नाही. कादंबरीची कथा रोचक आहे पण त्यातले प्रसंग, संवाद आणि व्यक्तिचित्रणे प्रभावी नाहीत.

ही कादंबरी नक्की कुठल्या काळात – ९० चे दशक, ८० चे दशक का कधी – हे कळत नाही. एखाद्या व्यक्तीचे तमाशा कलाकारांशी संबंध आहेत हे त्याच्या बायकोला आक्षेपार्ह वाटेल. पण त्यामुळे एक राजकारणी म्हणून प्रतिमाभंजन होईल, इतके बाळबोध आणि सोज्वळ राजकारण भारतात कधी होते ? तो मुख्य मुद्दाच तकलादू वाटतो.

दौलत परदेशात राहून आलेला आहे, तिथल्या मोकळ्या वातावरणात सुंदर बायांकडे बघून पघळला नाही; पण चंद्रमुखीकडे बघून पाघळतो. असं का होतं? केवळ सौंदर्यापेक्षा आणि काही वेगळं कारण असेल असं चित्र सुरुवातीला लेखकाने उभं केलं आहे. पण पुढे मात्र त्याचा पत्ता लागत नाही. सत्शील आणि कर्तबगार दौलत हे प्रेमप्रकरण वेगळ्या प्रकारे हाताळेल असा भास सुरुवातीला होतो. पण नंतर तो ट्रॅक सोडून दौलत पुढे पुढे लफडं लपवणारा पुरुष झाला आहे. बरं, लेखकाला त्या पात्राची ही स्खलशीलता लेखकाला दाखवायची असेल तर दौलतच्या मनात अशी काय उलथापालथ झाली हे काही स्पष्ट होत नाही. चंद्राच्या भावना जितक्या तीव्रतेने आल्या आहेत तितक्या दौलतच्या आल्या नाहीयेत. तमाशा आणि राजकरणी ह्याच्या गुंतागुंतीच्या कहाणीत केवळ तमाशाचा भाग समरसून लिहिला आहे. राजकारण आणि दौलत ह्या व्यक्तिरेखा तितक्या समरसून लिहिलेली नाही. त्यातून कादंबरीचा तोल बिघडला आहे.

अनेक अनाकलनीय प्रसंग किंवा वर्तणुकी आहेत. दौलतचे सासरे, बायको पण काहीतरी विचित्रच दाखवले आहेत. एका वाक्यात चिडतात, दुसऱ्या वाक्यात दौलतचं वागणं स्वीकारतात. नक्की त्यांचा विरोध आहे का? असेल तर कशाला? चंद्राच्या पूर्वायुष्यात तिच्यावर अत्याचार करणारा कोण आहे हे समजल्यावर तिचा “प्रियकर” दौलत काहीच बोलत नाही. चंद्राच्या आईला एक राजकीय डावपेच म्हणून “महाराष्ट्र गौरव” सारखा पुरस्कार जाहीर होतो पण पुढच्या प्रसंगात तिला जणू ते तिला कळलेलंच नाही असे प्रसंग घडतात. “बत्तासेराव” सारखा एक तमाशातला नाच्या एका मंत्र्याचा “पी.ए” होतो. काही दिवसांनी पुन्हा तमाशात जातो. चंद्रा दिल्लीत येते; एका मंत्र्याला हॉटेलात मारते पण कोणालाही कळत नाही. असे कितीतरी सुटे सुटे धागे आहेत. ज्यातून विरस होतो. लेखकाने कच्चा खर्डाच प्रकाशित केला की काय असं मला बऱ्याच वेळा वाटलं.

प्रसंगांच्या ओघात बऱ्याच लावण्या येतात. माझा काही लावण्यांचा अभ्यास नाही; पण तरी शेवटी ती एक कविता आहे, एक गाणं आहे. एका विशिष्ट वृत्त/छंद ह्यांच्या मध्ये बांधलेली असली पाहिजे ना. तश्या ह्या वाटत नाहीत. मुक्तछंदातल्या कविता वाटतात.  उदा.


पण असो ! तो माझा फार माहितीचा विषय नाही त्यामुळे मी फार काही लिहित नाही.

एकूणच ह्या कादंबरीने अपेक्षाभंग केला. तमाशावाल्यांचं आयुष्य समजून घ्यायचं असेल तर भरभर वाचायला हरकत नाही. पण पाठमजकूर(ब्लर्ब)मध्ये लिहिल्याप्रमाणे “लाल दिवा आणि घुंगराच्या गुंतावळीची रशीली कहाणी” ह्या अपेक्षेने वाचू नका.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

 

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link
https://www.youtube.com/playlist?list=PLf3c_TTh2J13NocrX99itIt4f_74LuGXe