*चितळे डेअरी प्लॅन्ट भिलवडीला भेट एक अविस्मरणीय अनुभव*
चितळ्यांची बाकरवडी, चितळे दूध, त्यांची मिठाई व दुग्धजन्य पदार्थ यांना मराठी माणसाच्या पोटात प्रेमाचं स्थान आहे. तसंच त्यांनी केलेला उद्योगविस्तार, सचोटी, गुणवत्ता यामुळे “चितळे” या नावाचं मराठी माणसाच्या मनातही स्थान आहे.
त्यांच्या दुकानात दिसणाऱ्या चित्रफिती, युट्युबवर त्यांचे व्हिडिओ तसेच इतर ठिकाणी वाचलेली माहिती यातून त्यांच्या उद्योगाबद्दल व तांत्रिकप्रगतीबद्दल थोडीशी माहिती होती. पण ते प्रत्यक्षात कधी बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं. ध्यानीमनी नसताना अचानक तो योग आला. पुस्तक वाचन-परीक्षणाच्या उपक्रमामुळे ओळख झालेले एक स्नेही चितळ्यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांनी आम्हा काही मित्रमंडळींची चितळे प्लॅन्टला भिलवडी येथे भेट देण्याची व्यवस्था केली. प्लांट जवळून बघता आला.
दुधाच्या पिशव्या भरल्या जाणे, त्याचे क्रेट्स भरणे ते स्वयंचलित पद्धतीने स्वच्छ होणे हे बघितलं. पनीर, चीज, तूप, बटर यांची निर्मिती कशी होते त्याची प्रक्रिया समजून घेता आली आणि ती डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडतानाही बघितली. दुग्धजन्य पदार्थांचे पॅकेजिंग त्याचबरोबर त्यांचे ऍग्रो प्रॉडक्ट(जॅम, सॉस, चटण्या इत्यादींचा) प्रकल्प बघता आला. आमरसाची हजारो पिंपे निर्जंतुक आणि हवाबंद करून निर्यातीसाठी तयार होती. इतका टनावारी कच्चामाल येतो आणि टनावारी पक्का माल तिथून बाहेर पडतो हे सगळं अद्भुत होतं. प्रचंड मोठ्या स्वयंचलित यंत्रणा, मोठ्या पाईपच्याद्वारे कच्च्या-पक्क्या मालाची होणारी नेआण, प्लास्टिकच्या शीट पासून डबा बनणे, त्यात पदार्थ भरला जाणे , झाकण लागणे, वरती लेबल लागणे… सगळं ऑटोमॅटिक. डिस्कवरी चॅनल किंवा नॅशनल जिओग्राफी वरच्या “इन साईड फॅक्टरी”,” हाऊ इट्स मेड” पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये ज्या पद्धतीची रचना बघितली होती तशी यंत्रणा; तेही भारतात आणि तेही आपण जे पदार्थ खातो त्या चितळ्यांच्या प्लांटमध्ये!! अविस्मरणीय !!! मजा काही औरच होती.
याहून विशेष म्हणजे चितळे हे जनुकशास्त्राद्वारे चांगल्या प्रतीच्या गाईंची पैदास कशी होईल यासाठी संशोधन करत आहेत. दुधाच्या व्यवसायात गाईला झालेलं पिल्लू गाय(मादी) असेल तरच फायदा. बैल झाला तर फायदा नाही. तिची दूध देण्याची क्षमता, रोगप्रतिकारक क्षमता चांगली असेल तर आणखीन चांगलं. त्यामुळे गायीची गर्भधारणा हल्ली कृत्रिम पद्धतीने केली जाते. त्या गर्भधारणेसाठी वापरले जाणार वीर्य असं असतं की ज्यात स्त्री जनुकेच जास्त असतात ज्यातून गाईला मादी पिल्लू होण्याची शक्यता जास्त असते. उत्तम जनुकीय क्षमता असणाऱ्या बैलाचं वीर्य गोळा करून त्यावर प्रक्रिया आणि लेझर चाळण्या लावून फक्त हवा तेवढाच भाग घेतला जातो. प्लास्टिकच्या काड्यामध्ये भरला जातो. काड्या नंतर कृत्रिम गर्भधारणेसाठी वापरल्या जातात. अजूनही बरंच संशोधन चालू आहे. प्रयोगशाळेतला झगा, टोपी, चपला घालून पूर्णपणे निर्जंतुक होऊन आम्ही ती प्रयोगशाळा बघितली.
ह्यासाठी मोठ-मोठाले परदेशी आणि देशी सांड तिथे आहेत. सहा साडे सहाफुट उंच आणि दहा बारा फूट लांब. धडकी भरवणारेच.
चितळ्यांच्या या उत्पादनाचा वापर फक्त सांगली-कोल्हापूर वा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि परदेशातही होतो आहे ही सर्व माहिती नवी होती. आणि परदेशी कंपन्यांना टक्कर देणार अत्याधुनिक आणि कटिंग एज तंत्रज्ञान इथे विकसित होत आहे यातून चितळे समूहाबद्दलचा आदर अजून दुणावला.
ह्या प्रक्रियेवर एक डॉक्युमेंटरी आधीपासून युट्युब वर आहे हे नंतर शोध घेतल्यावर मला कळलं त्याची लिंक ह्या पोस्टच्या शेवटी देतो.
मी सध्या ज्या VMware कंपनीत काम करतो त्यांचे सुद्धा चितळे हे मोठे ग्राहक आहेत. कंपनीची वेगवेगळी प्रोडक्ट्स ते datacenter मध्ये वापरत आहेत. VMwareच्या वेबसाईटवर त्यांच्या बद्दलची बातमी पार्श्वभूमीला ठेवून श्री. विश्वास चितळे त्यांच्याबरोबर फोटो काढण्यात एक वेगळाच आनंद मिळाला. त्याच्या लिंक्स शेवटी दिल्या आहेत.
तांत्रिक प्रगती बरोबरच चितळ्यांचे सामाजिक जाणीव ही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या पेक्षा बरीच पुढची आहे. परिसरातल्या पशुपालक महिलांचे आरोग्य सुधारावे, पशुंचे आरोग्य सुधारावे जेणेकरून त्यांची उत्पादकता वाढेल, त्यांना चार पैसे जास्त मिळतील आणि एकूणच सामाजिक स्तर उंचावेल यासाठी महिला आरोग्य शिक्षणाचे वर्ग सुद्धा चितळे राबवत आहेत. वेळोवेळी येणाऱ्या नैसर्गिक संकटांमध्ये सुद्धा चितळे आपल्या शेतकरी आणि गोपाळांपाठी भक्कमपणे उभे राहिले आहेत.
चितळे समूहाबद्दलचा आदर,अभिमान आणि जिव्हाळा या भेटीने द्विगुणित झाला आहे. भारतातले जे उच्चशिक्षित विद्यार्थी जेनेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, डेअरी इ. क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना आपली बुद्धिमत्ता अतिप्रगत तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी इथे वापरता येईल असा विश्वास वाटला. अशा बुद्धिमंतांनी चितळ्यांची संपर्क साधून एकत्र काम करण्याच्या शक्यता नक्की पडताळून पाहाव्यात.