पुस्तक(Title):-Chowringhi चौरिंघी
मूळ भाषा (Original language) – बंगाली (Bengali)
भाषा(Language) :- इंग्रजी (English)
लेखक(Author) :- Sankar (शंकर)
Translator :- Arunava Sinha (अरुणव सिन्हा)
चौरींघी हा कलकत्त्यातला मध्यवर्ती विभाग आहे. ज्याच्या जवळ कर्झन पार्क ही मोठी बाग असून असून आसपास मोठमोठ्या व्यक्तींचे पुतळे आहेत. पण हे पुस्तक चौरींघी बद्दल नसून “शहाजहान” नावाच्या हॉटेलबद्दल आहे. तिथे आलेले पाहुणे त्यांच्या तऱ्हा, त्यांचे चाल-चलन-चारित्र्य या बद्दल आहे. त्यामुळे खरं तर पुस्तकाचं नाव “शहाजहान” असायला हवं होतं .
हॉटेल मध्ये कॅबरे बघायला येणारे लोक सुसंस्कृत समाजातले, बाहेर उजळ माथ्याने वावरणारे होते. पण कॅबरे मध्ये मात्र त्यांचं वासनांध रूप कसं दिसतं हे आपल्या समोर येतं.
पूर्वी कॅबरे नर्तिकांचं आयुष्य कसं होतं, नवी मुलगी हॉटेलला दाखल होणार याची जाहिरात नवीन माल बाजारात आल्यासारखी कशी व्ह्यायची; हॉटेलातच कुलुपबंद खोलीत कसं राहावं लागायचं याचंही वर्णन वाचायला मिळतं. कॅबरे नर्तिका आणि त्यांच्याबरोबर काम करणारे बुटके विदूषक यांचं भावविश्व आपल्याला हेलावून सोडते.
एका मोठ्या उद्योगपतीने हॉटेलातला मोठा सूट कायमचा रिझर्व केलेला असतो. तिथे त्याचे पाहुणे – परकीय उद्योजक, सरकारी अधिकारी, कामगार नेते इ. राहायला येत असतात. या सगळ्यांची “काळजी”घेणारी एक “होस्टेस” असते – कराबी गुहा. तिचं खरंच सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व पाहून दुसऱ्या एका उद्योगपतीचा – सौ. प्रकाशीचा– तरूण मुलगा तिच्या प्रेमात पडतो. प्रकाशींच्या अनैतिक संबंधांची माहिती कराबीला असते आणि कराबी सारख्या बाईने आपल्या मुलाशी संबंध ठेवावेत याचा प्रकाशींना आलेला राग याचं नाट्य देखील आपल्यासमोर उलगडते.
आपल्या नवऱ्याशी भांडून वरचेवर हॉटेलात राहायला येणऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीची मजेशीर ओळख आपल्याला होते.
हॉटेलात वेगवेगळी कामे करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि वल्ली – चादरी,पाडदे इ. सांभाळणारा नित्याहरी, बारमध्ये काम करणारा बटलर, बारमध्ये वाजवणारा पण संगीतात खूप जास्त जाण असणरा गोवेकर व्ह्यायोलिन वादक इ.
एकुणात हे पुस्तक वाचायला घेतल्यापासून मनोरंजक आहे. पुढे काय होणर याची खूप उत्सुकता लागून राहते असं नाही पण तासन् तास वाचत राहिलं तरी कंटाळवाणं होत नाही. वेगवेगळ्या स्वभावाची, व्यक्तिमत्त्वाची माणसं आपल्या भेटत राहतात, गप्पा मारतात. छान वेळ जातो.
या कादंबरीवर बंगाली मध्ये चित्रपटही बरेच वर्षांपूर्वी येऊन गेला आहे.
————————————————————
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
————————————————————
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
———————————————————————————-