पुस्तक – दीपज्योतिर्नमोस्तुते (Deepajyotirnamostute)
लेखिका – सुशीला महाजन (Sushila Mahajan )
भाषा – मराठी (Marathi )
पाने – २३०
ISBN – दिलेला नाही

डोंबिवलीच्या “डोंबिवली ग्रंथसंग्रहालया”त एक जुने पुस्तक हाती लागले. महत्त्वाच्या तरीही अल्पपरिचित व्यक्तीचे हे चरित्र आहे. ह्या चारित्राच्या नायिका आहेत “राष्ट्र सेविका समिती” च्या संस्थापिका “मावशी केळकर’ !

१९३० आसपासचा काळ. स्वातंत्र्यलढ्याचा, देशभक्ती आणि समजाभिमुखता यांनी भारलेला हा काळ होता. नाना विचारधारा आणि विविध कार्यपद्धती ह्यातून असंख्य संस्था, संघटना सुरू झाल्या होत्या. अश्या वातावरणात स्त्रियांनी सुद्धा समाजकार्यात भाग घेतला पाहिजे आणि स्वसंरक्षणार्थ सक्षम झालं पाहिजे ह्या भावनेतून केळकर मावशींनी राष्ट्र सेविका समिती ची स्थापना केली. त्याआधी काही वर्ष डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSSची) स्थापना केली होती, परंतु ही संस्था केवळ पुरुषांसाठी मर्यादित होती. त्यामुळे डॉक्टरांशी विचार विनिमय करून संघासारखीच पण संघापेक्षा पूर्ण वेगळी अशी “समिती” त्यांनी स्थापन केली. मुलींनी महिलांनी एकत्र यावं, “अबला” ना राहता स्वसंरक्षण करण्यासाठी लाठीकाठी शिकावी, काही बौद्धिक मार्गदर्शन घ्यावे अश्या सुरुवातीच्या कल्पनेतून वर्ध्यात सुरु झालेली समिती देशभर पसरली.

संघाइतकी ही संस्था प्रसिद्ध नसली तरी ८५ वर्षांपूर्वी ह्या संस्थेची स्थापना झाली आणि अजूनही ही संस्था चालू आहे हे विशेष. चूल आणि मूल ह्या परिघाबाहेर पडून नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आज सुद्धा शहरी-निमशहरी भागातच जास्त आहेत. इतरत्र कमी. मग ८५ वर्षांपूर्वी स्त्रियांना उपलब्ध अवकाश किती मर्यादीत होते. तरीही त्या अवकाशात जितके होईल तितके संगठन आणि समाजकार्य माववशींनी केलं. तेही स्वतः ६ मुलांची आई आणि तिशीतच वैधव्य नशीबात आलेलं असताना ! पुस्तकात दिलेल्या त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल थोडं वाचा म्हणजे ह्या नायिकेची आपल्याला अजून कल्पना येईल.

अनुक्रमणिका

पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती

स्त्रियांचे संगठन का असावे ह्याबद्दल मावशींच्या मनाची अवस्था आणि गांधीजींशी झालेली भेट


समितीचे सुरुवातीचे रूप आणि मावशींची त्याबद्दलचे मार्गदर्शन दाखवणारा हा एक प्रसंग


फाळणीच्या आधी समितीच्या शाखा सिंध प्रांतातही सुरु झाल्या होत्या. त्यातून महिलांना आत्मरक्षणाचे धडे दिले गेले होते.पाकिस्तानात गेलेल्या सिंधप्रांतातल्या भगिनींना भेट देण्यासाठी दंगलीच्या धामधुमीतही स्वतः मावशी १४ ऑगस्ट १९४७ ला कराचीत गेल्या होत्या. नंतर सुमारे सिंधमधून १०० युवतींची  सोया त्यांनी समितीमार्फत लावली. मागाहून त्यांचे कुटुंबीय भारतात आले. अन्यायग्रस्त आणि हिंसा ग्रस्त हिंदू बांधवांना आपलं म्हणून साथ देण्याचं मोठं काम त्यांनी केलं. हे रोमांचक प्रसंग पुस्तकात आहेत.

गांधी हत्येननंतर संघावरच्या बंदीमुळे समितीचं कामही स्थगित करावं लागलं. त्या दोन अडीच वर्षांत विस्कळीत झालेली संस्था पुन्हा उभारावी लागली. धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम थोर पुरुषांच्या/स्त्रियांच्या जयंत्या , मेळावे ह्यातून त्यांनी सेविका जोडल्या; गुण हेरून योग्य त्या जबाबदाऱ्या दिल्या; त्यासाठी सदैव फिरतीवर राहिल्या. ह्या जोडीला घरगुती आघाडीवरही जिवलगांचे मृत्यू; कौटुंबिक वाद, आर्थिक ताण हे होतंच.  हे नीट वाचाण्यासारखं आहे. ज्याला स्वतःची अशी संस्था म्हणा किंवा राजकीय पक्ष म्हणा सुरु करायचं असेल त्याला काय कष्ट घ्यावे लागतील हेच ह्यातून अधोरेखित होतं.

आणीबाणी हे सुद्धा संघ आणि समितीवर आलेलं असंच संकट. त्याबद्दलचा एक प्रसंग


मावशींच्या कार्याचा थोडक्यात परिचय तुम्हाला झाला असेल.  हे किंवा त्यांचं दुसरं चरित्र वाचायची इच्छा होत असेल; असं मला वाटतं.
ह्या पुस्तकाच्या लेखिकेने स्वतः समितीत मावशींबरोबर काम केलं आहे त्यांना जवळून पाहिलं आहे. त्या पूज्यतेच्या भावनेतूनच हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे मावशींच्या किंवा समितीच्या कामाची साधकबाधक चर्चा किंवा त्यावेळी त्यांच्या विरुद्ध असणारी मतमतांतरे ह्यात नाहीत. मावशींना कोणकोण सेविका कधी भेटल्या; त्यांना कुठली जबाबदारी देण्यात आली ह्याचे फार तपशील आणि खूप नावं पुस्तकात आहेत. समितीशी संबंधित लोकांसाठी हा मोठा दस्तऐवज आहे पण त्रयस्थ वाचकाला त्यापेक्षा व्यापक दृष्टिकोन जास्त भावाला असता. पुस्तकात अनेक उपक्रम, संस्था आणि प्रसंगांचा उल्लेख आहे आहेत समितीच्या तत्कालीन कामाचा प्रभाव समाजावर किती पडला होता हे स्पष्टपणे पुढे येत नाही; असं मला वाटलं.तरी समाजासाठी तन-मन-धन अर्पण करणाऱ्या ह्या दीपज्योतीला नमस्कार करण्यासाठी “दीपज्योतिर्नमोस्तुते” वाचा.पुस्तक खूप जुनं आहे त्यामुळे त्याची तांत्रिक माहितीसुद्धा इथे देतो.

 

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/