पुस्तक : Devlok ( देवलोक )
लेखन : Devdutt Pattanaik (देवदत्त पट्टनाईक)
भाषा : English इंग्रजी
पाने : १८२
ISBN : 978-0-143-42742-1
वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत हे ग्रंथ हजारो वर्षांपासून भारतीय समाजमनाला आकार देणारे, मार्गदर्शन करणारे ग्रंथ आहेत. पण गंमत म्हणजे हे सर्व ग्रंथ मूळ संस्कृतमधून वाचलेले फारच कमी लोक आहेत. या ग्रंथांची शिकवण, त्यातलं तत्वज्ञान त्यांची आपल्यापर्यंत अप्रत्यक्षपणे पोचत असते गोष्टींमधून. आईवडिलांनी, आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी, पुस्तकं, देवळातली कथाकीर्तने, टीव्हीवरच्या पौराणिक मालिका, पौराणिक चित्रपट यांमधून. हे पुस्तक याच प्रकारातलं इंग्रजी पुस्तक आहे.
अनुक्रमणिका:
पुस्तकाचं स्वरूप प्रश्न-उत्तरं असं आहे. पुराणातल्या कथा, त्यात येणारे देवांचे उल्लेख, त्यांच्या रूपाचं वर्णन, अवतार कार्य या बद्दलचे प्रश्न आणि त्यांची एक दोन परिच्छेदांत उत्तरं असं स्वरूप आहे.त्यामुळे या पुस्तकात आपण लहानपणापासून ऐकत आलेल्या बऱ्याच कथा पुन्हा दिसतील; थोड्या न ऐकलेल्या कथा वाचायला मिळतील.
उदा.
पौराणिक कथा या खूप मनोरंजक असतात, चमत्कारिकही असतात. पण प्रत्येक कथेमध्ये काहितरी संदेश दडलेला असतो. पूर्वी कथेचं तात्पर्य शेवटी लिहायचो तसं. या पुस्तकांत काही कथांचं तात्पर्यही सांगितलं आहे.
हिंदू देवदेवतांची रूपही खूप वेगवेगळी, वाहनं वेगवेगळी. हातांची-डोक्यांची संख्या, वाहने, शस्त्र अस्त्रे, आवडते रंग, आवडते भोजन इ. सगळ्यात खूप वेगळेपणा आणि बऱ्याच वेळा विरोधाभासही आढळतो. पण या देवतांची रूपं ही प्रतिकं आहेत हे पण आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं. गणपतीचे मोठे कान म्हणजे भरपूर ऐका, लहान डोळे म्हणजे सूक्ष्म निरीक्षण, मोठं डोकं म्हणजे बुद्धिमत्ता इ. या पुस्तकात अश्या बऱ्याच प्रतिकांमागचे अर्थ सांगितले आहेत.
वेदांची रचना सुमारे ४ हजार वर्षांपूर्वी झाली, पुराणांची रचना २ हजार वर्षांपूर्वी तर भागवत आणि इतर संत साहित्य गेल्या हजार वर्षांतली आहे. देव या संकल्पनेत फरक पडत गेला आहे आहे. वेदांमध्ये सूर्य, अग्नी, इंद्र अशा निसर्गशक्तींची देवतास्वरूपात आराधना आहे. पुराणकाळात ब्रह्म, विष्णू, महेश, देवी ई. चे उल्लेख आहेत. तर त्या नंतरच्या काळात गणपती, राम, कृष्ण इ. आधुनिक देवदेवतांची संकल्पना पुढे आली. शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य या पंथांचे प्रमुख देव भिन्न तशीच त्यांची कथासूत्रही भिन्न. असे लेखक सांगतो.
हे पुस्तक वाचताना माहितीच्या गोष्टीच पुन्हा वाचतोय असं बऱ्याच वेळा झालं. प्रतिकांचे अर्थ सांगतानाही एकसुरीपणा आहे असं वाटलं. ही प्रतिकं “ओपन टू इंटरप्रिटेशन” असल्याने लेखकाचं म्हणणं पटेलच असं नाही. काहिवेळा त्यांचा अर्थ ओढूनताणून काढल्यासारखा वाटलं. पौराणिक कथा एक परिच्छेदात उरकल्यामुळे गोष्टी वाचल्याचा गोडवा आला नाही आणि तेच तेच तात्पर्य पुन्हा सांगितल्यासारखं वाटलं आणि कंटाळवाणं झालं. शेवटी शेवटी तर मी पानं उलटून केवळ चाळलं.
जे हिंदू नाहीत किंवा हिंदू असूनही ज्यांच्या घरात या कथांचे संस्कार होत नाहीत अशांना या पुस्तकातून हिंदू धर्मातील देव-प्रतिकं यांची तोंडओळख होईल. ज्यांना फारच थोड्या पौराणिक गोष्टी माहिती आहेत त्यांना काही नव्या गोष्टी कळतील. ज्यांना गोष्टी, देवता माहिती आहेत पण त्यांचे अर्थ समजले नाहीत त्यांना काही अर्थ नव्याने कळतील. हिंदू धर्मातील देवसंकल्पना कशी बदलत गेली हा विचारही काहींना नवा वाटेल.
पुस्तकात संस्कृत शब्द येणं हे स्वाभाविकच. पण हे शब्द इंग्रजीत लिहितना साध्याच नेहमीच्या रोमन लिपीत लिहिले आहेत. संस्कृत शब्दांचा अचूक शब्द ओळखता यावा यासाठी लिहिताना जी वेगवेगळी चिन्हे वापरतात ती न वापरल्याने अनोळखी शब्दांचे योग्य उच्चार समजत नाहीत. अभारतीय माणसाने पुस्तक वाचले तर भलतेच उच्चार समजून बसेल तो.
लेखकाची ओळख, या विषयातला त्याचा अभ्यास काय, अधिकार किती याबद्दल पुस्तकात माहिती नाही. पुस्तक वेदांसारख्या गहन गंभीर विषयावर असलं तरी पुस्तकात कुठेही जुन्या पुस्तकांचा संदर्भ, लेखकाच्या किंवा दुसऱ्या कुणाच्या संशोधनाचा हवाला, लेखकाच्या स्वतःच्या विचारांचं खंडन-मंडन; वैज्ञानिक आधार आवश्यक पण असा गंभीर मामलाही नाही. पुस्तकात “काहीच्या काही” विधानं ही आहेत. उदा. इंग्रजांनी गीतेचं भाषांतर केल्यावर गीतेचं महत्त्व वाढलं; पेशव्यांच्या काळापासून गणपती मूर्ती पूजनाची पद्धत रूढ झाली त्याआधी गणपती फक्त मत्रांमधील शब्द होता. (वाचताना मनात आलं मग १२ व्या शतकात गीतेवरचं भाष्य असणारी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी काय गंमत म्हणून लिहिली आणि “ओम नमोजी आद्या .. “म्हणत गणपतीचे वर्णन केले ते काय ? पण गंमत म्हणून)
म्हणुन हे पुस्तक तुमचं ज्ञान वाढवणार नाही पण माहिती वाढवेल. ज्यांना महिती कमी आहे अशांना वाचायला आवडेल.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-