पुस्तक – द्विदल (Dwidal)
लेखक – डॉ. बाळ फोंडके (Dr. Bal Phondake)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १३८
ISBN -978-93-861-175519 / 978-93-861-175526(E book)
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. प्रथमावृत्ती ऑक्टो २०१६
छापील किंमत – १७०/- रु.

प्रसिद्ध वैज्ञानिक आणि विज्ञानकथालेखक बाळ फोंडके ह्यांचे हे पुस्तक आहे. पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती.

ह्या पुस्तकात दोन दीर्घ कथा आहेत. “नार्सिसस” आणि “कोव्हॅलंट बॉंड”ह्या नावाच्या. पोलीस तपासाच्या उंत्कंठावर्धक कथा आहेत. पोलीस तपासात आधुनिक विज्ञानाची जोड घेऊन गुन्ह्याचा शोध घेतला जातो त्यामुळे विज्ञानकथा देखील आहेत.

“नार्सिसस” ही कथा प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिन्स ह्यांच्या सारख्या व्यक्तिमत्त्वावर बेतलेली आहे.

डॉ.बोस हे एक ज्येष्ठ शास्त्रज्ञ. दुर्धर आजारामुळे शरीर विकलांग झालं आहे. चालण्याफिरण्यासाठीच नव्हे तर बोलण्यासाठीसुद्धा यंत्राची मदत घ्यावी लागते आहे अशी अवस्था. पण मेंदू, बुद्धी, समरणशक्ती अगदी तेजतर्रार ! बोस एक सिद्धांत मांडत असतात की माणूस म्हणजे त्याचा मेंदू. इतर शरीर हे केवळ साहाय्य्यभूत; मुख्य नव्हे. ह्याच सिद्धांतावर व्याख्यान देण्यासाठी बोस अमेरिकेतून भारतात येतात. त्यांच्या पत्नीसह. एके रात्री त्यांच्यावर हॉटेल मध्ये हल्ला झाल्याची तक्रार त्यांची पत्नी नोंदवते. आणि पोलीस तपास सुरु होतो.
एका वृद्ध विकलांग शास्त्रज्ञावर हल्ला का बरं केला गेला असेल; ह्याचा तपास असिस्टंट कमिशनर अमृतराव आणि गुन्हेशोधतज्ञ कौशिक करतात. नेहमीच्या तपासाला विज्ञानाची जोड देखील मिळते. संशयाची सुई ह्याच्याकडून त्याच्याकडे असं करत करत योग्य हल्लेखोरापर्यंत कशी पोचते हे वाचण्यासारखं आहे.
त्या कथेतील पाने


“कोव्हॅलंट बॉंड” ह्या कथेत दोन बायका एकाच मुलीबद्दल “मी तिची आई” असा दावा करतात. नेहमीच्या कागदपत्रांच्या छाननीतून कधी मुलगी आहे हे जाणवतं तर कधी दुसरीची. मग विचार येतो डीएनए टेस्ट करायचा. त्या चाचणीच्या निकालातून घोळ वाढतो पण चित्र काहीतरी वेगळंच आहे हे कळतं. आणि जेव्हा सगळा उलगडा होतो तेव्हा येतं की आधुनिक विज्ञानामुळे जीवन सुखकर झालं आहे, पोलीस तपास सोपा आहे तसेच दुसरीकडे ह्या विज्ञानातून नवे नैतिक प्रश्न सुद्धा आपल्यासमोर उभे केले आहेत. पूर्ण तपासामध्ये दोन्ही महिलांची पारडी वरखाली होत राहतात; तपासात सतत नवे पैलू; वैज्ञानिक अंगे येतात हे अतिशय रंजक आहे.


ह्या शोधकथांचा शेवट पूर्णपणे सयुक्तिक आहे. वाचकाला काहीतरी धक्का द्यायचा म्हणून तपासात किंवा शेवटी काहीही “ट्विस्ट” दाखवायचा प्रकार केलेला नाही. विज्ञान सुद्धा अतिरंजित किंवा अद्भुत नाही तर आज जे शोध उपलब्ध आहेत किंवा शक्य वाटतायत त्यांचाच आधार घेतला आहे. त्यामुळे त्यातूनही गोष्टींचा खरेपणा मनाला भिडतो. वैज्ञानिक परिभाषा बेतानेच वापरल्यामुळे लेखन बोजड झालेले नाही उलट भाषा, वाक्यरचना, संवाद अगदी चपखल आहेत. त्यामुळे वाचायला घेतलं की आपण रंगून जातो.
साहित्यप्रेमी,विज्ञानप्रेमी, लहान मोठे सर्वांना आवडेल असे हे पुस्तक आहे.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दोनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/