पुस्तक :- Five quarters of the oranges (फाईव्ह क्वार्टर्स ऑफ ऑरेंजेस)

लेखक :- Joanne Harris (जोअ‍ॅने हॅरीस )

भाषा :- इंग्रजी (English) 

फ्रान्समधल्या एका खेड्यात एक प्रौढ विधवा बाई एक जुनाट घर आणि फळबाग विकत घेऊन राहायला येते. ते घर आणि बाग तिचंच लहानपणीचं घर असतं. पण हे घर, हे गाव याचा आपला संबंध आहे हे ती कायम लपवत राहते. आपली जुनी ओळख पटू नये, आपण कुठल्या कुटुंबातले आहोत हे लोकांना समजू नये यासाठी ती सदैव सावध असते. कारण तिला लपवायचा असतो तिला एक कटू भूतकाळ.

ती बाईच आपल्यालाशी बोलते या पुस्तकातून. घरात तिला तिच्या आईची एक डायरी मिळते ज्यात काही फोटो, बऱ्याचशा पाककृती, काही घटनांची माहिती तर काही अगम्य/सांकेतिक शब्दात वर्णनं. काही संदर्भ तिलाही लागत नाहीत. पण या गावात राहिल्या आल्यावर तिच्या आयुष्यात अशा घटना घडायला लागतात की तिची खरी ओळख लोकांसमोर येण्याची शक्यता वाटू लागते. वेळोवेळी तिला जुन्या गोष्टी आठवतात, जुने संदर्भ आठवतात. आणि ती ते आपल्याला सांगते…फ्लॅशबॅक मध्ये नेत.

कादंबरी भर हा आजचा प्रसंग आणि जुन्या आठवणी यांचा खेळ चालू राहतो.

तो जुना काळ असतो दुसऱ्या महायुद्धाच्या वेळच्या फ्रान्स मधला. नाझी फौजांनी फ्रान्स व्यापला होता. अशाच जर्मनव्याप्त फ्रान्समधल्या एका खेड्यात एक बाई आपल्या तीन मुलांसह राहत्ये. नवरा युद्धात मारला गेलाय. बाई बरीच मानसिक अस्थिर, अनेकदा रागाचा-विचित्र वागण्याचा विस्फोट करणारी. मुलं वाढत्या वयात येणारी – आईचा तापट स्वभाव, युद्धजन्य दुर्भिक्ष्य आणि नैराश्य यामुळे घुसमटणारी. त्या लहान मुलांमधली एक मुलगी म्हणजे ही लेखिका.

जर्मन सैनिक आणि पोलिसांची दंडेलशाही आणि जबरदस्तीने वस्तू बळकावणे स्थानिकांना त्रासदायक ठरत असतेच पण जर्मनांशी संधान बांधून चोरवाटांनी हवं ते मिळवून घेण्याचीही युक्ती अनेकांना सापडते. याच प्रलोभनाला बळी पडतात ती मुलं आणि हे कुटुंब.

पौगंडावस्थेतली प्रलोभनं, आईच्या शिस्तीच्या अतिरेकापायी तिच्याविषयी वाटणारा विकृत संताप, जर्मन सैनिकांमधल्या एकाचं मैत्रीपूर्ण वागणं व त्यातून जुळलेले संबंध, गावकऱ्याचे छुपे उद्योग आणि त्यातून घडलेल्या अघटित गोष्टी.

पुस्तक वाचताना शेवटच्या पानापर्यंत आपल्याला ते दिवस भेटत राहतात, ते रहस्य हळूहळू उलगडत राहतं; अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत.

ही रहस्यकथा आहे. रहस्य काय असेल या उत्कंठेने मी वाचत होतो. पण बरीचशी वर्णनं प्रसंग विनाकारण घातले आहेत, याचा मूळ गोष्टीशी काही संबंध नसणार असं वाटत राहतं. “अगं बाई मुद्याचं बोल, विनाकारण लांबण लावू नको” असं मनाशी म्हणत कितीतरी तरी पानं मी भराभर उडवली. शेवटी ते रहस्यही फार भारी निघालं नाही. 

उलट ती घटना काय होती हे अगदी पहिल्या पानात सांगून ते कसं घडलं हे सरळ सांगितलं असतं तर त्यातले प्रसंग, मानवी भावभावना या कडे वाचकाने अधिक समरस होऊन वाचलं असतं असं वाटतं. मग ते तपशील कंटाळवाणे वाटले नसते.

थोडक्यात हे पुस्तक वाचून युद्धमान फ्रान्स मध्ये खेड्यात वातावरण कसं असेल आणि आईवडिलांच्या स्वभावाचा मुलांवर परिणाम होऊन विकृतीला खतपाणी मिळू शकतं, लहानलहान मुलं सुद्धा किती “उद्योगी” असू शकतात एवढं जाणवतं. बाकी फार काही हाती लागत नाही. त्यामुळे पुस्तक वाचलंच पाहिजे असं नाही.

————————————————————

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

————————————————————

———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

———————————————————————————-