पुस्तक : गोदान (Godan)
मूळ भाषा : हिंदी (HindI)
पुस्तकाची भाषा : मराठी (Marathi)
मूळ लेखक : मुन्शी प्रेमचंद (Munshi Premchand)
पाने : ३२४
भाषांतरकार : दिलेले नाही
ISBN : दिलेला नाही
“गोदान” ही हिंदीतील थोर साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांची प्रसिद्ध कादंबरी आहे. इंग्रजांच्या काळातल्या लखनऊ जवळच्या खेड्यात घडणारी ही कादंबरी आहे. त्यावेळच्या शेककऱ्यांचे साधारण स्वरूप असं की जी काही थोडीशी जमीन आहे ती कसायची, तुटपुंज्या उत्पन्नात घर चालवायचे, ते चालत रहावे यासाठी कर्जे घ्यायची आणि आयुष्यभरासाठी व्याजाच्या ओझ्याखाली स्वतःला गाडून घ्यायचं. कधी उत्पन्न चांगले आले नाही म्हणून परतफेड थकायची तर कधी गावातल्या सावकार-पटवारी-महाजन-कारकून मंडळींकडून फसवणूक झाल्यामुळे पैसे देऊनही कर्ज शिल्लकच. त्यामुळे एकदा का कर्जाचा फास मानेला बसला की बसलाच. असाच शेतकरी होरी आणि त्याची बायको धनिया ही या कथेची मुख्य पात्रे. त्यांचा परिस्थितीशी करूण संघर्ष हा या कादंबरीचा गाभा आहे.
ही कादंबरी आपल्या डोळ्यासमोर त्यावेळची गावव्यवस्था उभी करते. गावात जातीभेद आहे, उच्च-नीच मानणे आहे. पण जातीय विद्वेश नाहिये कारण प्रत्येक जण आपल्या जातीच्या धर्माशी(कर्तव्याशी) प्रामाणिक रहायचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी धडपडतो आहे. धर्म, नैतिकता आणि व्यवहार याचा सोयीस्कर अर्थ लावून, रायसाहेब जमीनदार हे जमीनदारी सांभाळणं आपला धर्म समजतात – ज्यात कास्तकारांकडून जबरदस्ती करांची वसूली करणंही आलं आणि अगदीच कोणी शेती करू शकत नाही अशी अवस्था आली तर त्याला अजून कर्ज देऊन पुन्हा उभा करणंही आलं. गावातल्या एका ब्राह्मण व्यक्तीने चांभार समाजातली बाई ठेवली आहे. सगळ्यांना ते माहिती आहे. पण तो तिच्या हातचं पाणी पीत नाही, अन्न खात नाही, त्याचा धर्म पाळतोय म्हणून अजून तो बाटलेला धरत नाहीत. ती बाईही आपल्या जातबिरादरीचा विरोध झुगारून, तो पुरुष लग्न करणार नाही हे माहीत असूनही त्याला पतिस्वरूप मानते, अपमानित जिणं जगते, हा तिचा धर्म आहे. गावातला पटवारी लाव्यालाव्या करणं हा स्वतःचा धर्म समजतो आहे. कितीही गरिबी असली तरी माणुसकीचा धर्म पाळणं, गावातल्या महाजनांवर विश्वास ठेवून पैसे परत करणं आणि जातबांधव किंवा सख्खे बांधव कसेही वागले तरी सगळ्यांचे अपराध पोटात घालून शेवटी आपल्याला एकत्र रहायचं आहे, भांडलोतंडलो तरी शेवटी जातबांधवच उपयोगी पडतील या भावनेने अडलेल्या आधार देणं हा होरीचा धर्म आहे. त्याची बाय्को धनिया ही नवऱ्याचा भोळेपणा माहीत असल्याने लबाडांना अरे ला का रे करून वठणीवर आणते, प्रसंगी नवऱ्याचे चारचौघंसमोर वाभाडे काढते पण शेवटी राग गिळून नवऱ्याच्या निःस्वार्थ करूणेत साथ देत राहते; कारण तो तिचा पत्नीधर्म आणि तिचाही मानवधर्म आहे. गावातल्या मुली, बायका यांना चुचकारून, पैशाचं आमिश दाखवून आपली वासना तृप्ती करणं हा काही तरूणांचा स्वभाव आहे तर अशा तरूणांना नादी लावून स्वतःच स्वार्थ साधून घेणं हा काही बायकांचा स्वभाव आहे. अशा चित्रविचित्र उभ्याआडव्या ताण्याबाण्यांनी या गावाची वीण घट्ट रचली आहे. आणि या पार्श्वभूमीवर होरीच्या आयुष्याची भयाणगाथा सांगितली आहे.
आपल्या मुलाने बाहेर काहितरी भानगड केलीये, ती मुलगी दाराशी आली आहे आणि मुलगा पळून गेला हे समजल्यावर चिडलेले होरी-धनिया आधी त्या मुलीला हाकलवून देण्याची भाषा करतात. पण मग त्यांच्यातला माणूस जागा होतो तो प्रसंग वाचा.
(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)
या कथानकाला समांतर कथा शहरात घडते आहे. ज्यात जमीनदार, डॉक्टर, वकील, साखर कारखाना मालक अशा त्यावेळच्या नवशिक्षित, नवश्रीमंत, सुखवस्तू लोकांचा समावेश आहेत. ब्रिटिश राजवट, इंग्रजी शिक्षणपद्धत, समाजसुधारणांचे वारे यामुळे त्यांचे “धर्म”ही डळमळीत आहेत. त्यांच्यामध्ये घडणारे प्रसंग फार खास नाहीत. पण त्या प्रसंगांत त्यांची मैत्री, हेवे-दावे, समाजात रुजणारी नवी मूल्ये – समाजवाद, स्वातंत्र्य, शेतकऱ्यांचे हक्क, स्वार्थ-त्याग, प्रे-वासना, महिलांचे स्थान याबद्दल उलटसुलट मतप्रवाहांची आपसूक चर्चा घडते.
जमीनदाराविरुद्ध तक्रार एका लोकपक्ष मांडणऱ्या वृत्तपत्राकडे येते. पण त्याचा संपादक हा त्या जमीनदाराचा मित्र असतो. त्यामुळे मैत्रीधर्म का पत्रकारधर्म या तिढ्यात आदकलेल्या संपादकाला जमीनदार स्वतःचे तत्वज्ञान ऐकवतो तो प्रसंग.
होरीचा मुलगा हट्टाने शहरात जातो. मोलमजूरी, करतो. थोडे पैसे गाठीशी बंधतो. शहरातल्या सुधारणेच्या हवेमुळे हक्कांची जाणीव होते, आपल्याला लुबाडलं जातंय याचं भान त्याला येतं. त्यातून तो गावात येऊन वडिलांचे डोळे उघडण्याचा, महाजनांना इंगा दाखवायचा प्रयत्न करतो. पण बापाच्या व गावाच्या स्थितीशीलतेमुळे त्याचे काही चालत नाही.
खेडे अजूनही जुन्याच जमान्यात आहे शहरात मात्र ताज्या विचारांचे वारे कसे घुसू लागले होते याचे प्रतिबिंबच यातून दिसते. त्यामुळे ही फक्त होरीची, शेतकऱ्यांची, गावाची, शहराची कादंबरी न होता; त्या काळाची होते. कादंबरीत प्रसंगांमागून प्रसंग घडत राहतात आणि कथा आपल्याला खिळवून ठेवते. खूप नाट्यमयता, रहस्य, विनोद नसूनही आपण त्या पात्रांच्या त्या विश्वात रंगून जातो. दुर्दैवाने शेतकऱ्यांची परिस्थिती अजूनही बदललेली नाही ही जाणीव सतत मनाला होत राहते. सध्याचा दुसरा प्रश्न म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेचा. महिलांवरच्या अत्याचारांच्या कहाण्या हल्ली जास्त ऐकू येतात त्याचं कारण शहरातलं मोकळं वातावरण , स्त्रीयांचे कपडे, अश्लीलतेचा प्रसार इ. सांगितलं जातं. पण त्यावेळीही, खेड्यातही अगदी पारंपारिक वातावरणातही हे प्रकार सर्रास होत होते हे विदारक सत्य अंगावर येतं. निसर्गसंपन्न, स्वयंपूर्ण पुवीचं खेडं आशी रोमँटिक कल्पना माझ्यासारख्या शहरी मनात असते. त्या प्रतिमेवरचं धुकं थोडं हटवण्याचं कामही ही कादंबरी करते. गरीबांची दैन्यावस्था दाखवते तशीच जमीनदार रायसाहेबांची ’बडा घर पोकळ वासा’ अवस्थाही दाखवते. म्हणुनच ही कादंबरी फक्त एक गोष्ट नाही तर प्रत्यक्ष जगण्याचा शोभादर्शक(कॅलिडोस्कोप).
कादंबरी सुंदरच आहे पण मी वाचलेलं भाषांतर अतिशय गचाळ होतं. भाषांतरकाराचं नाव दिलेलं नाही. पण ज्याला बरेच वर्ष महाराष्ट्रात राहून नीट मराठी बोलता येत्ये अशा एखाद्या हिंदी भाषिकाने हे केलेलं असावं. कारण व्याकरणच्या चुका, हिंदी शब्द जसेच्या तसे वापरणे, शब्दशः भाषांतर करणे असे सगळे दोष यात दिसतात. मुद्रितशोधनाचेही कष्ट घेतलेले नाहीत. इतक्या छपाईच्या चुका पानापानावर आहेत. त्यदृष्टीने दुसरे कुठले मराठी भाषांतर मिळते आहे का पहा किंवा मूळ हिंदीच वाचा.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————