पुस्तक – हॅशटॅग दिवाळी अंक २०२५ (Hashtag Diwali issue 2025)
संकल्पना व प्रकाशक – पुंडलिक पै. पै फ्रेंड्स लायब्ररी, डोंबिवली (Pundalik Pai. Friend’s Library Dombivli)
संपादक – डॉ. योगेश जोशी (Dr. Yogesh Joshi)
अतिथी संपादक – डॉ. विठ्ठल कामत (Dr. Viththal Kamat)
निर्मिती सहाय्य – डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन (Dr. Shrikant Shinde Foundation)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २०२
छापील किंमत – रु. ३००/-
ISBN – दिलेला नाही
“पै फ्रेंड्स लायब्ररी” हे डोंबिवलीतील लोकप्रिय वाचनालय आहे. नेहमीच्या पुस्तकांबरोबरच दिवाळीच्या दिवसांत दिवाळी अंक सुद्धा तिथे वाचायला उपलब्ध असतात. तेही मोठ्या प्रमाणात. पण फक्त पुस्तके वाचायला उपलब्ध करून देऊन न थांबता वेगवेगळे साहित्यिक उपक्रम करून वाचनसंस्कृती वाढवणारे हे वाचनालय आहे. “बुक स्ट्रीट”, “पुस्तक आदान प्रदान”, पुस्तक प्रदर्शने, पुस्तक प्रकाशने, मुलाखती, सादरीकरणे, मुलांसाठी गोष्ट वाचन असे नवनवीन आणि रंजक उपक्रम. (https://www.facebook.com/friendslibrary वर तुम्हाला फोटो बघता येतील). दिवाळी अंकांच्या कालावधीची सुरुवात पण धूमधडाक्यात “दिवाळी अंक पूजनाने होते”. हे सगळे उपक्रम ” फ्रेंड्स लायब्ररी”चे पुंडलिक पै अर्थात “पै काका” राबवत असतात. गेल्यावर्षीपासून ह्या उपक्रमांत भर पडून स्वतःचा आता दिवाळी अंक काढायलाही सुरुवात केली आहे. पै काकांनी मला हा अंक वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

विठ्ठल कामत हे ह्या वर्षीचे अतिथी संपादक आहेत. ह्या वर्षीच्या अंकाचा विषय आहे “प्रवास”. पण हा प्रवास म्हणजे “प्रवासवर्णन”, “स्थळ वर्णन” इतकाच मर्यादित नसून; तो व्यक्ती, संस्था, उपक्रम, तत्वज्ञान, उद्योगक्षेत्र ह्यांची उभारणी, विकास कसा झाला ह्याचा मागोवा; ह्या अर्थी आहे. त्यामुळे दिवाळी अंक माहितीपूर्ण आणि वैचारिक लेखांची मेजवानी झाला आहे.

चाळीस लेख आणि दोनशेहून अधिक पाने असल्यामुळे प्रत्येक लेखाची माहिती देणं जरा कठीण आहे. पण काही लेखांची माहिती देतो म्हणजे वैविध्याची आणि मजकुराच्या दर्जाची कल्पना येईल.
पहिला लेख “व्रतस्थ व पर्यावरणस्नेही व्यवसायिकाची यशोगाथा”. हा लेख विठ्ठल कामतांची मुलाखत आणि माहिती असा मिश्र आहे. पंचतारांकित हॉटेलची साखळी उभी करणारे विठ्ठल कामत हे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी उद्योगाची सुरुवात का केली, लहानपण कसं होतं, उद्योग विस्तारातले मोठे टप्पे कुठले ह्याबद्दल थोडक्यात पण महत्त्वाची माहिती मिळते. अशाच प्रकारे अजून काही उद्योगांवर लेख आहेत. उदा. घरात कपडे वाळत घालण्यासाठी सोपी योजना पुरवणारे “ईझीड्राय” , “पितांबरी”, डोंबिवलीतील प्रसिद्ध “कानिटकर लाडूवाले” आणि “हेमंत सुगंधी भांडार” आणि अजून काही उद्योग ह्यांवरचे लेख आहेत. एक छोटी पण सर्वांना आवश्यक अशी गोष्ट कल्पकतेने तयार करून सुरु झालेले हे उद्योग आता चांगलेच नावारूपाला आले आहेत. त्यांचा प्रवास समजून घेणं ज्ञानवर्धक आहे.
एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, एकनाथ शिंदे, श्रीधर फडके, रामदास फुटाणे, अशोक पत्की, हृदयनाथ मंगेशकर आणि अजून काही नामवंतांच्या जीवन प्रवासाबद्दल लेख आहेत.
रेल्वे विषयक दोन लेख आहेत. आशियातील पहिल्या महिला मोटरमन सुरेखा यादव ह्यांच्यावर एक लेख आहे. तर “रुळानुबंध” पुस्तकाचे लोकप्रिय लेखक आणि स्वतः इंजिन ड्रयव्हर असणाऱ्या गणेश कुलकर्णी ह्यांनी जगात रेल्वे कशी सुरु झाली, तिच्या तंत्रज्ञानात महत्वाचे बदल कसे झाले, ती पूर्वीपेक्षा जास्त वेगवान, सुरक्षित, आरामदायी कशी झाली ह्याची रोचक माहिती देणारा लेख लिहिला आहे… “रेल्वेचा प्रवास”. “मेट्रो वुमन” अश्विनी भिडे ह्यांच्यावर एक लेख आहे. तर मुंबईच्या बेस्ट बसमधील प्रवासाचे किस्से सांगणारा रवी प्रकाश कुलकर्णी ह्यांचा लेख आहे. लता मंगेशकर तरुणपणी गाण्याचा रियाज करण्यासाठी बेस्ट प्रवास कसा करत; नूरजहाँच्या आठवणी असे अपरिचित किस्से ह्यात वाचायला मिळतील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्ताने “शताब्दी प्रचारक संकल्पनेची” असा लेख ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर ह्यांनी लिहिला आहे. सु. ग. शेवडे, सच्चिदानंद शेवडे, परीक्षित शेवडे ह्या एकाच कुटुंबातील तीन पिढ्या आपल्या लेखन व वक्तृत्वातून राष्ट्रपेमी विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी कसे काम करतायत हा “कौटुंबिक प्रवास” एका लेखात आहे. अजून एकदोन सामाजिक कामांची चांगली माहिती देणारे लेख आहेत.
वाचकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या ग्रंथाली प्रकाशन आणि चळवळीच्या सुवर्णमहोत्सवी वाटचाली बद्दल एक लेख आहे. “कॉर्पोरेट दिंडी” पुस्तक, टाटा समूह, विशेषतः रतन टाटांबरोबर केलेल्या कामाच्या अनुभवांवरच्या व्याख्यानांसाठी जास्त प्रसिद्ध असलेल्या माधव जोशींनी वेगळ्याच विषयांवर लेख लिहिले आहेत. ते म्हणजे ज्ञानेश्वरीचे रसग्रहण आणि “भारतीय शास्त्रीय संगीताची वाटचाल”.
क्रीडा विषयक “भारतीय क्रिकेटचा इतिहास” असा कौस्तुभ चाटेंचा लेख आहे. ते स्वतः क्रिकेटला वाहिलेला “क्रिककथा” असा दिवाळी अंक काढतात. त्यांच्या व्यासंगाची ओळख ह्या लेखातून होईल. सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर ह्यांच्यावर एक छोटा लेख आहे.
काही पाने उदाहरणादाखल
विठ्ठल कामतांच्या आठवणी
श्रीधर फडके आणि शांता शेळके ह्यांनी एकत्र काम केले ते प्रसंग

रेल्वे इंजिनांच्या विद्युतीकरणाचा प्रवास

“बायको गेली माहेरी काम करी पितांबरी” अशा पितांबरीचा प्रवास

अशाप्रकारे साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, उद्योग, चित्रपट, संगीत, रेल्वे -मेट्रो, सामाजिक कार्य अशा आपल्या आयुष्याच्या नानाविध अंगांना स्पर्श करणारा हा दिवाळी अंक आहे. लेख लिहिणारे सुद्धा मान्यवर, अभ्यासू अशी व्यक्तिमत्त्वे आहेत. प्रत्येक पान वाचनीय, माहितीपूर्ण आहे. ह्यावर्षीच्या दिवाळी अंकांच्या वाचनीय अंकांच्या यादीत “हॅशटॅग”चा नक्की समावेश करा.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे तीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
<a href=”https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/”>https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/</a>
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link





