पुस्तक : हत्या (Hatya)
लेखक : श्री. ना. पेंडसे (Shri Na Pendse)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २८४
ISBN: दिलेला नाही
“हत्या” म्हणजे खून, वध नव्हे तर “हनुमंता” या नावाचं ते लघुरूप आहे. बाळ्या, पोऱ्या प्रमाणे. हनुमंता उर्फ हत्या या पंधरा-सोळा वर्षाच्या मुलाच्या भावजीवनावर आधारित ही कादंबरी आहेत. त्यात हत्याच निवेदक आहे. कोकणातल्या दापोली जवळच्या एका ब्राह्मण कुटुंबाची ही कहाणी आहे. खाऊनपिऊन सुखी असं हे कुटुंब. कोकणचा निसर्ग, बागा आणि आपले कुटुंबीय यात हत्या मजेने बालपण घालवत असतो. पण एकत्र कुटुंबात जी भांडणं दिसतात तशी जबाबदाऱ्या आणि सामायिक कर्जं यांच्यावरून भांडणं इथेही होतात. हत्याचे वडील वाटण्या करून वेगळे होतात. गाव सोडून कुटुंबाला घेऊन दापोलीला स्थायिक व्ह्यायचंठर्वतात. हत्याच्या भावविश्वाला पहिला तडा इथे जातो. आपली माणसं तर त्याला दुरावतात. माणसांइतकीच प्रिय असणारी झाडं-कलमं, आवडती गायीगुरं यांच्यापासून त्याची ताटातूट होते. शहरातल्या जीवनात, शाळेत, नव्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्यात तो कसा मिसळायचा प्रयत्न करतो याचं चित्र अनेक प्रसंगातून उभं केलं आहे.
पुढे त्यांच्या घरावर संकटांची मालिका येते. हत्याला शाळा सोडावी लागते आणि एका हॉटेलात नोकरी धरावी लागते. अनेक वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. ज्यांच्या पासून हत्याचे वाडील वेगळे झले असतात ते त्यांचे काका- हत्याचे आजोबा – झालं गेलं विसरून या कुटुंबाच्या मदतीला उभे राहतात. जमेल तशी मदत करतात. आजोबा-नातवाचं हे प्रेमळ नातं हळुवार उलगडलं आहे.
वर्ष सहा महिन्यांत इतके वाईट प्रसंग, अपमान, गरीबी आणि कश्ट हत्याच्या वाट्याला येतात की ती बाल कोवळीक अकालीच पोक्त होते. हा प्रवास म्हणजे हत्या कादंबरी.
“हत्या” या शब्दाच्या उच्चारावरून कादंबरीबद्दल वेगळाच समज होऊ शकतो. त्यामुळे या नायकाचं नाव हत्याच का ठेवलं असेल असा प्रश्न पडतो. कादंबरीत येणारे प्रसंग पाहून मला जी.एं.च्या “काजळमाया“ची आठवण झाली. त्या पुस्तकातल्या नायकांच्या मागे पण असेच दुर्दैवाचे दशावतार दाखवले आहेत. त्यामुळे कादंबरी वाचन जरा विषण्ण करणारंच आहे. पण काजळमाया एवढं हे भडक, भयानक नाही.
हत्याचा बदलणारा स्वभाव, आजोबांची समंजस स्थितप्रज्ञ वृत्ती, आईचे प्रेम आणि मुलाची होणारी फरपट बघून होणारा कोंडमारा, शेजाऱ्यांची वरून गोड आणि आतून जळफळाट करण्याचा पिंड आणि गोष्टीत येऊन जाऊन असणाऱ्या पात्रांची स्वभाववैशिष्ट्ये हे सगळं संवादांमधून आपल्यासमोर उभं राहतं. प्रसंग जिवंत होतात. कोकणच्या निसर्गाचं दर्शन होतं. हल्ली कमी ऐकू येणारी ब्राह्मणी बोलीचा गोडवाही चाखायला मिळतो. कादंबरीत अनेक नाट्य घडतात तरी कादंबरी नाट्यमय वाटत नाही ती संथ लयीत जात रहते. खूप उत्सुकताही लावत नाही आणि कंटाळाही आणत नाही.
हत्याची आजारी बहीण, सासरी त्रास भोगून त्यांच्या घरी राहायला येते तेव्हाचा प्रसंग :
(फोटोंवर क्लिक करून झूप करून वाचा.)
असं ललित वाचायला आवडत असेल तर वाचून बघायला हरकत नाही.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————