पुस्तक – हिज डे (His Day)
लेखिका – स्वाती चांदोरकर (Swati Chandorkar)
भाषा – मराठी  (Marathi)
पाने – २४१
ISBN – 9789386888594

“हिज डे”. पुस्तकाच्या नावातल्या दोन शब्दांतली जागा काढली की झाला शब्द “हिजडे”. हो, हे पुस्तक “हिजडे” अर्थात तृतीयपंथीयांवरचं आहे. रस्त्यावर, रेल्वे गाड्यांमध्ये भीक मागताना, टाळ्या वाजवताना किंवा शुभकार्याच्या प्रसंगी हक्काने पैसे मागणारे हे लोक आपण पाहिलेले असतात. त्यांच्या बद्दल भीती, किळस, कुतूहल, अनुकंपा अश्या कितीतरी वेगवेगळ्या भावना प्रत्येकाच्या मनात असतात. अश्या सगळ्या अनुभवांना सोबत घेत, कशालाही चूक ना ठरवता आपल्याला त्यांच्या जगात घेऊन जाणारं; त्यांच्या भावना दाखवणारं हे पुस्तक आहे.

लेखिकेबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

हेलिना नावाच्या एका कॉलेजयुवतीला बऱ्याच वर्षांनी आपली लहानपणीची मैत्रीण -चमेली – भेटते. तिला समजतं की ती इतके वर्ष संपर्कात नव्हती कारण तिचे वडील “ते” आहेत. आजपर्यंत तिने ह्या लोकांना लांबूनच बघितलेलं असतं पण मैत्रिणीमुळे तिला खरी खुरी माहिती कळू लागते. पुस्तकात कधी हेलिना निवेदक होते तर कधी चमेली. आपण सुद्धा चमेलीचं बोट धरून त्या वस्तीत जातो. त्यांची भाषा आपल्या कानावर पडते. अंगावर शहारे आणणारे हे प्रसंग दिसतात.

शरीर पुरुषाचं तरी मानाने स्वतःला स्त्री समजणारे हे लोक. वयात येताना जेव्हा एखाद्या मुलाला असं वाटू लागतं तेव्हा त्याच्या घरच्या लोकांना हे सत्य स्वीकारणं कठीणच. असे लोक मनाचा कोंडमारा सहन करत जगतात. पण कोणीतरी हिजड्यांच्या संपर्कात आले की स्त्री म्हणून जगण्याचा हा मार्ग कळतो. साडी नेसून, मेकअप करून बाई म्हणून वावरता येतं. ज्यांचं तेवढ्यावर भागत नाही ते करतात सरळ गावठी पद्धतीने लिंगच्छेद !! हिजड्यांच्या भाषेत “कत्लेआम”. ४० दिवसांचा भयानक त्रासदायक काळ. मरणाच्या दारापर्यंत नेऊन आणणारा. पुस्तकात असे भयानक प्रसंग आपल्यासमोर लेखिकेने सांगितले आहेत. एकीकडे स्त्री म्हणून स्वतःच्या शरीरात होणारे बदल हेलिनाला जाणवत असतात; लग्न, मूल ह्या आयुष्य चांगल्याअर्थी बदलवून टाकणाऱ्या घटना तिच्या आयुष्यात घडतात पण ज्यांच्या नशीबात हे सुख नाही यांच्यातला तिचा वावर ह्याचे ताणेबाणे मांडत लेखिकेने दोन्ही बाजूंचा तोल साधला आहे

हिजडे आपल्याआपल्यातच आई, बहीण, भाऊ अशी मानलेली नाती निर्माण करतात. त्यांची त्यांची गुरु परंपरा असते. गुरूला पैसे द्यावे लागतात. नवीन देवी देवता आणि त्यांचे उत्सव साजरे करणं होतं. पूर्वीचे हिंदू, पण हिजडे झाल्यावर मुसलमान गुरूमुळे मुसलमानी रिवाज पाळणारे असेही लोक असतात. हेलिना ह्या लोकांच्यात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करते. हेलिना आणि चमेलीला त्या वस्तीत भेटतात असेच नाना प्रकारचे लोक – एक हिजडा असून अनाथ मुलाचा सांभाळ करणारा रामसखा, शरीराने मुलगी पण मानाने स्वतःला मुलगा समजणारा सुक्की, जगात पुरुष पण फक्त “बधाई” मगण्यापुरतं आपल्यातलं स्त्रीत्व उघड करणारी हाला, हिजड्यांना लैंगिक रोगांपासून वाचवण्यासाठी निरोधाबाबत जागृती करणारी एक मोठी गुरू, प्रसंगी पोलिसांकडून सुद्धा लैंगिक अत्याचार सोसावे लागणारे गरीब हिजडे, तर श्रीमंत “क्लायंट” असणारे सुंदर हिजडे असे कितीतरी.
हिजड्यांची दुर्दशा आणि त्यातही अंतरीचा जिव्हाळा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या रामासखाबद्द्लचा एक प्रसंग
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)

एका पाठोपाठ एक प्रसंग विलक्षण प्रभावी पद्धतीने गुंफले आहेत. हिजड्यांच्या तोंडी त्यांचीच रांगडी भाषा संवादात वापरली आहे. सभ्य समाजासाठी जे अश्लील तेच ह्यांच्या अश्या जगण्याचं कारण आणि पोट भरण्याचं साधन. त्यामुळे नागवे सत्य मांडणारी नागवी भाषा.

हेलिनाला ह्या लोकांची , त्यांच्या भाषेची नव्यानेच ओळख होऊ लागते तेव्हाचा एक प्रसंग

चमेलीचा तिच्या वडिलांचा/आईचा हा संवाद आणि भिन्नलैंगिकतेबद्दल विचार करायला लावणारे हे स्वगत
एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून हेलिनाच्या मनाचा प्रवास माहिती, ओळख, सलगी अश्या टप्प्यांनी जातो. आपणही तो प्रवास करत असतो. पुस्तकाचा शेवट देखील तितकाच परिणामकारक आणि अंतर्मुख करणारा आहे.

सध्या एकूणच भिन्न लैंगिकतेचा स्वीकार करण्याच्या चळवळी सुरू आहेत. पूर्वी भारतीय समाजात तृतीयपंथीयांना योग्य स्थान होतं. ते भिकारी नव्हते. पण ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी पद्धतशीरपणे हा समाज तोडला असं पुस्तकाच्या ओघात आलं आहे. हिजडे हा शब्द सुद्धा “हिज डे ” ह्या इंग्लिश वाक्यातून ब्रिटिश काळात तयार झालेला आहे असा एका हिजड्याच्या तोंडाचा संवाद आहे. पुस्तकातून आपली माहिती वाढते, जाण वाढते. आपण लगेच त्यांच्याशी अगदी खेळीमेळीने वागायला लागू असं नाही पण त्यांच्याकडे एक दुर्दैवी व्यक्ती म्हणून, जिच्याशी निसर्गाने वेगळाच खेळ खेळला आहे म्हणून थोड्या सहृदयतेने बघू शकतो.

पुस्तकाचे भाषा ओघवती आहे. पुस्तक फार झटाझट निवेदक बदलते. तिथे वाचताना क्षणभर अडखळल्यासारखं होत. पण नंतर नंतर लेखिकेच्या ह्या शैलीची सवय होते.

हिजड्यांबरोबरच समलैंगिकतेच्या प्रश्नालाही स्पर्श करायचा प्रयत्न केला आहे पण ते प्रसंग थोडे ओढून ताणून आल्यासारखे वाटतात. अन्यथा प्रसंगांची सुंदर गुंफण आहे. हे पुस्तक अनुवादित नाही तर मूळ मराठी आहे. मराठीत ह्या दर्जाचं मूळ लेखन करणाऱ्या स्वातीजींना आणि प्रकाशकांना प्रणाम.

आपल्यापेक्षा जे दुःखात आहेत त्यांच्याकडे बघा म्हणजे आपल्याला काय काय नशिबाने मिळालं आहे ह्याची जाणीव होईल. अगदी देह-आणि-मन एकसारखं वागतंय ही सुद्धा किती मोठी देणगी आहे; असं वाटायला लावणारं हे पुस्तक आहे.

थोडा धीर करा आणि आवर्जून वाचा.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/