पुस्तक :  If God Was A Banker (इफ गॉड वॉज अ बँकर)

लेखक : Ravi Subramanian ( रवी सुब्रमण्यन )

भाषा : English (इंग्रजी)

पाने : २६०


“इफ गॉड वॉज अ बँकर” ही बँकिंग क्षेत्राविषयीची कादंबरी आहे. ऐंशीच्या दशकात न्यूयॉर्क इंटरनॅशनल बँकेने(एन.वाय.बी) नुकतेच भारतात पदार्पण केलेले असते. त्या काळात जुन्याच पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या सरकारी बँकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करून एन.वाय.बीला पुढे जायचे असते. अशावेळी “ट्रेनी” म्हणून संदीप आणि स्वामी हे दोन आय.आय.एम पदवीधर तरूण बँकेत कामाला लागतात. बँकेचे तेव्हाचे प्रमुख आदित्य यांना या दोघांमधली बुद्धिमत्तेची चुणुक दिसते. ते या दोघांना घेऊन नवीन संकल्पना राबवून बँकेचा व्यवसाय वाढवू लागतात. अशाप्रकारे सुरुवातीपासूनच दोघांच्या यशस्वी वाटचलीला सुरुवात होते. हाच यशाचा प्रवास पुढे कसा होतो, कशी अनपेक्षित आणि धोक्याची वळणं घेत जातो हे उलगडून दाखवणारी ही कादंबरी आहे.


संदीप आणि स्वामी दोघेही हुशार, कष्टाळू पण यश मिळवण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याचा सारासार विचार स्वामीकडे आहे तो संदीपकडे नाही. स्वामी स्वतःच्या कार्यक्षमतेच्या बळावर १०-१२ वर्षांत मोठ्या पदावर जातो. संदीपही तेथे पोचतो. पण अधिक वेगाने. “वेगळ्याच” वाटेने. आपणच नेहमी जिंकलं पाहिजे ह्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपुढे योग्य काय अयोग्य काय हे हळूहळू तो विसरायला लागतो. त्याच सुमारास बँकेबाहेरचा पण बँकेतल्या अनेकांशी हितसंबंध जोडलेला नरेश त्याच्या आयुष्यात येतो. संदीपच्या व्यावसायिक यशाच्या चढणीला आणि नैतिक घसरणीला सुरुवात होते. स्वतःला मिळणाऱ्या मलिद्याच्या बदल्यात नरेश संदीपला अनेक डील्स मिळवून देतो; मॅनेजमेंटकडून हव्या त्या बढत्या मिळवून देतो, आणि अनैतिक शरीरसुखाचे चोचलेही पुरवतो. स्वतःच्या अधिकाराने आंधळा झालेल संदीप अपल्या महिला सहकाऱ्यांशीही अनैतिक वागयाला पुढेमागे पहत नाही. आदित्य त्याला सुधारण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना यश येत नाही. 


याहून अधिक लिहणं म्हणजे पुस्तकातले प्रसंग लिहून लेखकावर अन्याय केल्यासारखं होईल आणि तुमचाही रसभंग होईल.


संदीपचा हा प्रवास; हळूहळू निगरगट्ट होत जाणं, त्याला बँकेतल्या समप्रवृत्तीच्या लोकांकडून मिळणारी साथ, हे सगळे गैरव्यवहार उघडकीस येतात का आणि कसे; मग त्याचं काय होतं; हे जाणून घ्यायचं तर ही कादंबरी वाचायला हवी. कादंबरीची भाषा साधी सरळ, नवी आणि फ्लॅशबॅक तंत्र परिणामकारक आहे. पुढे काय होतंय याची उत्कंठा वाचताना सारखी राहते. कॉर्पोरेट जगतातल्या चांगल्यावाईट जागांमधून लेखक आपल्याला फिरवून आणतो. लेखकबरोबरची ही भटकंती मला खूप आवडली. तुम्हालाही नक्की आवडेल. 


————————————————————

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )

————————————————————





———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

———————————————————————————-