पुस्तक :- “जडणघडण” या मासिकाचा दिवाळी अंक २०१६

पृष्ठ संख्या :- २४८

किंमत  :- रु. १५०/-


या वर्षीच्या (२०१६च्या) दिवाळी अंकांमध्ये आणखी एक वाचनीय आणि संग्राह्य दिवाळी अंक वाचण्यात आला. “जडणघडण” या मासिकाचा दिवाळी अंक.

अंक मुख्यत्वे दोन संकल्पनांमध्ये तयार केलेला आहे. एक संकल्पना आहे “बापमाणसं” आणि दुसरी संकल्पना “स्पर्धा परीक्षांचे दिवस”.


“बापमाणसं” एखाद्याच्या व्यक्तिमत्त्व विकासात त्याच्या आईबरोबर वडिलांचाही वाटा असतो. आई विषयीचं लेखन बऱ्याच वेळा केलं जातं पण “बाप”माणसाकडेही दुर्लक्षून चालणर नाही. या भूमिकेतून “बापमाणसं” ही लेखमाला घडली आहे. “बापमाणसं” या संकल्पनेत २४ लेख आहेत. यात काही नामवंतांनी आपल्या वडीलांबद्दल लिहिलं आहे उदा. जयंत नारळीकर, अभय बंग, माधव गाडगीळ, रवी परांजपे इ. तर बऱ्याच नामवंतांबद्दल त्यांच्या मुलांनी लिहिलं आहे. उदा. एस.एम.जोशी, रघुनाथ माशेलकर, ग.दि.माडगुळकर, व.पु.काळे इ.

पुढे दिलेल्या छायाचित्रांमधून पूर्ण यादी आपल्यासमोर उलगडेल. 

वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी असणऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात त्यांच्या वडीलांचा प्रभाव कसा होता हे यातून समजतं. तर यशस्वी व्यक्ती एक वडील म्हणून, एक माणूस म्हणून कश्या होत्या/आहेत हे पण आपल्या समोर उलगडतं. 

या व्यक्ती किंवा त्यांचे वडील हे प्रत्येक जण सर्वगुणसंपन्न व्यक्ती नव्हेत. कुणी रागीट आहे; कुणी विसराळू, कुणी फार कडक शिस्तीचे तर कुणी मुलांशी मित्रत्त्वाने वागणारे. म्हणून “यशस्वी बाप” असा काही साचा नाही. “पिंडे पिंडे मतिर्भिन्ना” प्रमाणे प्रत्येकाने आपला मार्ग स्वतः शोधायचा आहे याची याची जाणीव होते. साहजिकच आपल्यातल्या “बापा”ला आत्मपरीक्षण करायला लावणारे हे लेख आहेत. मी एक “बाप” म्हणून माझ्या मुलांना असं समृद्ध करतो आहे का (किंवा करीन का) आणि माझ्या यशापयशात माझ्या वडीलांचा वाटा जाणतो आहे का असा दोन्ही अंगांनी विचार करायला लावणारे आहेत.


“स्पर्धा परीक्षांचे दिवस” ही सुद्धा १७ लेखांची लेखमाला आहे. आणि यात १७ यशस्वी आय.ए.एस. ,आय.पी.एस, आय.आर.एस. अधिकाऱ्यांनी आपल्या स्पर्धा परीक्षांच्या दिवसाबद्दल सांगितलं आहे. उदा. अविनाश धर्माधिकारी, लीना मेहेंदळे, अश्विनी भिडे इ. सर्व लेखकांची नावं पुढील छायाचित्रात दिसतील


जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हे लेख खास मार्गदर्शनपर आहेतच पण इतरांनाही ते तितकेच रोचक वाटतील. कारण अधिकारी होण्यामागच्या प्रत्येकाच्या ऊर्मी वेगळ्या, प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी, यशापयशाची साखळीही वेगळी. परीक्षा/ध्येय एकच पण त्यापर्यंत पोचण्याचा प्रवास खूपच वेगळा. त्यामुळे दुसऱ्या यशस्वी व्यक्तीच्या आचार-विचाराची नक्कल करून यशस्वी होता येईलच असं नाही. तर त्यासाठी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला, क्षमतेला साजेसा असा स्वतःचा मार्ग प्रयेकाने शोधला पाहिजेच. हा नवा बोध यातून होतो. फक्त स्पर्धा परीक्षाच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हे लागू पडेल. “’मृत्युंजयचे’ मंत्रभारले दिवस” या दीर्घ लेखात संपादक सागर देशपांडे यांनी ’मृत्युंजय’ कादंबरी कशी घडली, लेखक शिवाजी सावंत यांनी कशी तयारी/संशोधन केले, या कादंबरीचं स्वागत मराठीजनांनी कसं केलं हे सगळं विस्ताराने सांगितलं आहे. काही जुने फोटोही आहेत. कादंबरी मागची ही कथाही निश्चित वाचनीय.


मासिकाच्या संपादकीय आणि सल्लागार मंडळाशी मोठीमोठी नावं जोडली गेली आहेत.

एकूणच मी सुरुवात करताना म्हटलं त्या प्रमाणे एक वाचनीय आणि संग्राह्य अशा दिवाळी अंक वाचण्यात आला. तुम्हीही वाचा; तुम्हालाही आवडेल याची मला खात्री आहे.

हे परीक्षण त्या मासिकाच्या मार्चच्या अंकात वाचकांच्या प्रतिसादाअंतर्गत पूर्णपानभर प्रसिद्ध झालं आहे

————————————————————

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )

————————————————————

———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

———————————————————————————-