पुस्तक : जमात ए पुरोगामी (Jamat E Purogami)

लेखक : डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परीक्षित शेवडे (Dr. Satchidanand Shevde & Dr. Pareexit Shevde)

भाषा : मराठी (Marathi)

पाने : ११४

ISBN : 978-93-86059-54-3

आपल्या देशात सतत काही ना काही घडत असतं आणि त्यावर दूरदर्शन वाहिन्या, वृत्तपत्रे, नियतकालिके आणि समाजमाध्यमे यांवर चर्चा होत असते. या चर्चेतली एक बाजू स्वतःला पुरोगामी, सेक्युलर, संविधानवादी, डाव्या विचारांचे, विवेकवादी वगैरे म्हणत असते. वरवर बघता ही बाजू पुरोगामी – पुढारलेली अशी वाटते. पण अजून जवळून आणि पुन्हा पुन्हा त्यांच्या बोलाण्या-वागण्याचा जरा विचार केला की लक्षात येतं “दाल में कुछ काला है”. हे काळबेरं आपल्या समोर स्पष्ट करण्याचं काम हे पुस्तक करतं.

हिंदूंच्या अंधश्रद्धांवर तावातावाने बोलणारे बाकी धर्मियांच्या अंधश्रद्धांवर काही बोलत नाहीत. “संविधान बचाव” म्हणून ओरडणारे दुसरीकडे “भारत तेरे तुकडे होगे, इन्शा अल्लाह” म्हणणाऱ्यांची तळी उचलतात. विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवतो म्हणणारे भारतीय शास्र आयुर्वेद यांची वैज्ञानिक चिकित्सेच्याही भानगडीत न पडता हे सगळं थोतांड आहे असं स्वतःच जाहीर करतात.  अशा अनेक दुटप्पीपणाची, ढोंगींपणाची उदाहरणं देऊन लेखकांनी अपला मुद्दा स्पष्टपणे पुढे मांडला आहे.

उदा. त्रिपुराचे मुख्यमंत्री यांच्या साध्या रहाणीचा खूप गवगवा मध्यंतरी झाला पण प्रत्यक्ष चित्र मात्र वेगळेच होते. त्याबद्दलच्या एका लेख

अलिगढ विद्यापीठात जीनांच्या फोटोवरून वाद झाला आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने गळे काढले गेले पण एका प्राध्यापकाची समलैंगिक म्हणून हकालपट्टी केली तेव्हा मात्र कुणाला हे स्वातंत्र्य आठवले नाही.

हिंदू धर्मातले, भारतीय परंपरांतले सगळे वाईट अवैज्ञानिक म्हणून बदनाम करणारे मात्र वैज्ञानिक आधार द्यायला काचकूच करतात. एखादी गोष्ट विज्ञानाने सिद्ध केली तर आपण त्या गावचेच नाही असे अनुल्लेखाने मारतात.

तर अशा खोट्या पुरोगाम्यांना या पुस्तकाने जमाते-पुरोगामी ही संज्ञा दिली आहे. जमातवाद म्हणजे टोळीवाद अर्थात माझी टोळी हीच चांगली, श्रेष्ठ; तिलाच जगण्याचा अधिकार बाकी सगळ्यांना शस्त्र, शास्त्र, शब्द यांनी तुटून पडायचं, विध्वंस करायचा. म्हणून हे जमात ए पुरोगामी. या विषयावर दोन्ही लेखकांनी तरूण भारत मध्ये लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. अनुक्रमणिकेवरून लेखांच्या विषयांची साधारण कल्पना येईल.

डॉ. सच्चिदानंद शेवडे हे व्याख्याते, प्रवचनकार आणि साहित्यिक आहेत. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या, क्रांतिकारकांची चरित्रे, धार्मिक आणि समाज प्रभोधनार्थ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. डॉ. परीक्षित हे त्यांचे पुत्र व्यवसायाने वैद्य असून तेही ऐतिहासिक आणि समज प्रबोधनपर व्याख्याने देतात. 

जमात ए पुरोगामींचा दुटप्पीपणा आणि देश विघातक कारवाया हा काही या पुस्तकानेच जाणवून दिलेला मुद्दा आहे अशातला भाग नाही. दूरदर्शन वरील चर्चेत भाग घेणारे हा दुटप्पीपणा लगेच दाखवून देतात. समाजमाध्यमांत तर अशांची रेवडी उडवली जाते. व्यंगचित्र, विनोद केले जातात. या त‍थाकथित विचारवंतांची मुक्ताफळे आणि बदललेली सोयिस्कर भमिका अगदी स्क्रीनशाॅट सकट दाखवून लगेच दात घशात घातले जातात. पुस्तकातल्या लेखांचं स्वरूप साधारण असेच आहे. 

समाजमाध्यमांतले लेख हे कित्येकदा अननुभवी किंवा कमी अनुभवी लोकांनी लिहिलेले असतात. बर्‍याचदा याचा एकूण रंग whataboutism – आम्ही चुकलो काय म्हणता; तुम्ही किती चुका केल्या आहेत ते पहा – असा असतो. खोलात जाऊन, वैचारिक पातळीवर मूलगामी चूक दाखवणे घडत नाही. नियतकालिकांत जागा आणि शब्द संख्या यांच्या मर्यादेमुळे साक्षीपुरावे, आकडेवारी यांच्या आधारे गोळीबंद बाजू मांडली जात नाही. सोशल मिडियात एका पोस्टवर लोक फार टिकत नाहीत म्हणून मोठ्या पोस्ट टाळल्या जातात. 

त्यामुळे या विषयावर पुस्तक रूपाने काही प्रकाशित होतंय म्हटल्यावर माझ्या काही जास्त अपेक्षा होत्या (हे पुस्तक विकत घेताना हा लेखांचा संग्रह आहे हे मला माहीत नव्हतं)पण मोठे, ससंदर्भ लेख पुस्तकात शक्य आहेत. असं पुस्तक जास्त प्रभावी आणि जास्त काळ टिकणारं असतं. ती अपेक्षा हे पुस्तक पूर्ण करत नाही. संदर्भसूची तरी नक्कीच हवी होती. लेखकाशी सहमत वाचकाला जर एखाद्या मुद्याच्या खोलात जायचं असेल तर त्याला ते उपयोगी पडलं असतं. लेखकाच्या विरूद्ध मताच्या (पण संतुलित) वाचकाला हे अधिक विश्वासर्ह वाटलं असतं.

उघडपणे दिसणारा दुटप्पीपणा दाखवला आहे पण छुपेपणे कसा बुद्धीभेद करतात – माध्यमांत चर्चा कशा रंगवल्या जातात, मथळे कसे दिले जातात, विरोधी मतांची गळचेपी कशी होते याबाबतचा लेखकांचा अनुभव शेअर करायला हवा होता.

पुस्तकात जमात ए पुरोगामी हे दुखणं मांडलं आहे पण त्यावारच्या उपायांची विशेष दखल नाही. छद्मपुरोगाम्यांना रोखण्यासाठी कोण प्रयत्न करतंय, काय केलं जात आहे, काय केलं गेलं पाहिजे, वाचकांकडून काय अपेक्षा आहेत यावर काही लेख हवे होते.

त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या राजकीय-सामाजिक चर्चां बघत-वाचत असाल तर यातले बहुतेक मुद्दे कुठेना कुठे वाचलेले असतील. एखाददोन घटना, आकडेवारी नव्याने कळेल. जर तसं वाचन कमी असेल किंवा तुम्ही अगदीच “पुरोगामीभक्त” असाल तर या पुस्तकातून तुमच्या विचारांना चालना मिळू शकेल. ज्यांना खूपच आदर्श मानत होतो त्यांची उलटतपासणी करणं गरजेचं आहे एवढं तरी पटेल.

लेखकद्वयी डोंबीवलीची आहे आणि पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम डोंबीवलीतच होता. त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते झाले. त्यांचेही मनोगत ऐकायला मिळाले.

पहिल्यांदाच असे प्रकाशनात जाऊन पुस्तक घेतले आणि लेखकांच्या सह्या घेतल्या.

———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )

———————————————————————————-

———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

———————————————————————————