पुस्तक : जंगलांतील दिवस (jangalantil divas)
लेखक : व्यंकटेश माडगूळकर (Vyankatesh Madgulkar)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १८३
ISBN : दिलेला नाही
मॅजेस्टिक प्रकाशन. पहिली आवृत्ती १९८४. तिसरी आवृत्ती २००५
लेखकाच्या शब्दातच पुस्तकाची ओळख करून घ्यायची तर प्रस्तावनेत लेखकाने म्हटलंय की “१९७४ पासून ते ८४ पर्यंतच्या दहा वर्षांत मी कुठे कुठे हिंडलो, आणि मला काय काय दिसले, काय काय जाणवले ते मी, निरनिराळ्या नियतकालिकांमधून सांगत आलो. या साऱ्या निवेदनांचा हा संग्रह आहे“. काझिरंगा, भरतपूर, मेळघाट, नवेगाव बांध या आणि अजून काही अभयारण्यांना, जंगलांना त्यांनी भेट दिली त्या अनुभवांचे हे वर्णन आहे.
साहित्यिक, चित्रकार आणि वन्यजीवन प्रेमी अशा व्यक्त्तिमत्त्वाच्या त्रिवेणी संगमातून व्यंकटेश माडगूळकरांचं हे पुस्तक आपल्यासमोर येतं. रूढ प्रवासवर्णनांप्रमाणे हे त्या त्या जागेचं सविस्तर वर्णन नाही, वन्यजीवनावर खूप अभ्यास करून सादर केलेले गंभीर संशोधनही नाही तर वाचकांना या वन्यजीवनाची थोडी ओळख व्हावी या दृष्टीने लिहिलेले हे लेख आहेत. त्यामुळे जंगलात काय दिसू शकतं, जंगलात भटकण्यात काय मजा येते आणि अडचणी येतात याची झलक आपल्याला दिसते. उदा. कान्हामाधील व्याघ्रदर्शनाचा हा प्रसंग
फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा
लेखाच्या ओघात एकशिंगी गेंडे, रानडुक्करे, रानम्हशी, गवे, काळवीट यांच्या जीवनचक्राची, वागणुकीची थोडी शास्त्रीय माहिती मिळते. कितीतरी वेगवेगळ्या प्राण्यांची, पक्ष्यांची, झाडांची नावे वाचायला मिळतात. लेखकाने जी शिकाऱ्यांची, जंगलावरची पुस्तके वाचली आहेत त्यातले काही रोचक किस्सेही वाचायला मिळतात. त्यांची स्केचेसही पुस्तकात आहेत.
इष्टस्थळी पोचण्याचा प्रवासही कसा मजल दरमजल करत करावा लागायचा हे पण वाचायला मिळतं. तीसचाळीस वर्षांपूर्वी या अभयारण्यांपर्यंत पोचण्यासाठी रेल्वे, बस, रिक्षा आणि पायी प्रवास, तोही बेभरवशाचा करायला लागत होता. अडचणीच्या, घाणेरड्या लॉजमध्ये राहण्याची सोय. सरकारी लालफितीच्या परवानग्या काढून प्रवेश. हे सगळं वाचून आता वनपर्यटनाची स्थिती, प्रवासाच्या आणि राहण्याच्या सोयी खूपच सुधारल्या आहेत हे जाणवल्यावर बरं वाटतं.
लेखांचा एकूणच बाज खूप गंभीर न ठेवल्याने माडगूळकर आपल्याशी त्यांच्या सफरींबद्दल गप्पाच मारतायत असं वाटतं. थोडी माहिती, थोडे किस्से, थोडे रंजन असं पुस्तक वाचायला मजा आली. त्यांच्यातला प्रतिभावतंत लेखक त्या त्या ठिकाणची शब्दचित्रेही छान रंगवतो. डाकबंगल्याचं हे वर्णन वाचून पुढच्या सुट्टीत तुम्हालाही डकबंगल्यात जावसं वाटलं तर नवल नाही.
तरीही जंगलाची भव्यता, गांभीर्य शब्दांत आणि स्केच मध्ये पकडणं कठीणच. त्यात शहरात वाढलेल्या मी इतके प्राणी, पक्षी, झाडं स्वतः बघितलेली नाहीत. त्यामुळे सगळी वर्णनं डोळ्यासमोर उभी राहत नाही. पुस्तकात खरे रंगीत फोटो असायला हवे होते असं वाटतं. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता डिस्कव्हरी किंवा नॅशनल जियोग्राफिकवर आणि इंटरनेटवर घरबसल्या आपण जंगलं, प्राण्यांचा जीवनक्रम, शिकारीचा थरार सगळं बघू शकतो. नेटवर प्रत्येक प्राण्याचे फोटो आणि माहितीही सविस्तरपणे मिळते. त्यामुळे सध्या हे पुस्तक वाचताना तितकं जिवंत वाटत नाही. पण माडगूळकरांच्या शब्दात जंगलाबद्दलचा हो लडिवाळपणा आढळतो त्यामुळे आपणही असं जंगल प्रत्यक्ष (टिव्हीवर नाही) बाघावं असं नक्की वाटतं. पुस्तकामागचा त्यांचा उद्देशही हाच आहे. प्रस्तावनेच्या शेवटी ते म्हणतात .. “जंगलांतील दिवसाच्या कहाण्या वाचून वाचकांपैकी कुणा चार जणांना बुद्धी झाली आणि आपल्या कृत्रिम जगातून बाहेर पडून निसर्गाची भव्यता, श्रीमंती आणि सौंदर्य याचा त्यांनी आनंद घेतला, तर बरेच आहे“.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-