पुस्तक : झुळूक अमेरिकन तोऱ्याची ( Jhuluk Amerikan toryachi)
लेखक : शरद वर्दे (Sharad Varde)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १९५
ISBN : 978-81-7432-036-0
आपण चार दिवस बाहेर जाऊन आलो की परतल्यावर घरच्यांना, मित्रमांडळींना तिकडच्या गमतीजमती सांगतो. तिकडे काय बघितलं काय खाल्लं, कसे लोक भेटले, आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक वाटला असं बरंच काही सांगतो. आणि ते बाहेरगाव अमेरिके सारखी स्वप्नभूमी असेल तर मग सांगण्यासारखं किती आणि काय काय असेल ! त्यात जर तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने तिकडे पुन्हा पुन्हा गेलात, किंवा शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने काही महिने-वर्षं घालवली असतील तर तिथला तुमचा अनुभव फक्त पर्यटन स्थळांपुरता मर्यादित राहत नाही. तुम्ही तिथल्या लोकांना भेटता, वाहतूक व्यवस्थेने प्रवास करता, तिथले शिष्टाचार समजून घेता, लोकां खाण्यापिण्याच्या सवयी बघता, वागण्याच्या तऱ्हा बघता. त्यामुळे तुमच्या कडे सांगण्यासारखं खूप काही असतं. असाच अमेरिकेच्या अनुभवाचा खजिना लेखकाने आपल्यासमोर या पुस्तकात उघडून दाखवला आहे. तोही अतिशय विनोदी, खुसखुशीत ढंगात.
अमेरिकेत आणि आपल्यात खूप फरक आहे. खाण्यापिण्यात तर अगदी साध्या बाबतीतही फरक आहे. जेवताना पाणी पिण्याची आपल्याला सवय असते. (देवालाही नैवेद्य दाखवताना आपण “मध्ये पानीयं जलं समर्पयामि” म्हणतो. पण अमेरिकेत पाणी पिण्याची सवयच नाही लोकांना. कोक पेप्सी नाहितर आणि काहितरी पेय पितात. तेव्हा भारतीय माणसाला हॉटेलात नुसतं पाणी मिळवतानाही किती गोंधळ उडतो पहा.
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)
अमेरिकेत प्रत्यक्ष गेला नसाल तरी बातम्यांमध्ये, चित्रपटांमध्ये तिथले मोठमोठाले रस्ते पाहिले असतीलच. पण रस्ते मोठे आहेत , गुळगुळीत आहेत ही मजा असली तरी तिथले नियमही चित्रविचित्र आणि काटेकोरपणे सांभाळले जाणारे. जर तुम्ही तिथे नव्याने ड्रायव्हिंग करत असाल तर किंवा कुणा बरोबर जात असाल तर या नियमपालनाची कसरत करता करता ड्रायव्हिंगचा आनंद कदाचित हरवून बसेल. उदाहरण म्हणून “पूल-लेन” च्या नियमाबद्दल वाचा.
अमेरिका आणि इतर विकसित देशांत आढळणारी अगदी साधी पण आपल्याला अप्रूप वाटायला लावणारी गोष्ट म्हणजे “स्वच्छता” आणि “शिस्त”. अमेरिकेतल्या खूप मोठ्या योझेमिटी नॅशनल पार्कला भेट दिली असता ही स्वच्छता आणि शिस्त (का त्याचा अतिरेक) बघून भारतातली कुठेही आडोशाला “जाऊन यायची” मोकळीक आठवली नसती तर नवल नाही. वाचा हा मजेशीर प्रसंग.
अमेरिकन समजात मिसळताना भारतीय एनआरआय मध्ये कसा बदल होतो. त्यांची बोलण्याची, वागण्याची, भारताकडे बघण्याची दृष्टी कशी बदलते याचे नमुने पण पानोपानी आहेत.
अशा कितीतरी गंमतीदार किश्श्यांनी पुस्तक भरलेलं आहे. २००७ ते २००७ दरम्यान मासिकांमध्ये आणि दिवाळी अंकांत प्रसिद्ध झालेले लेख यात संग्रहित आहेत.
अनुक्रमणिका:
लेखांबद्दल एक दोन वाक्यांत सांगतो.
स्वातंत्र्याची ऐशी तैशी : कुठलेही नियम फार मनावर न घेणारे आपण भारतीय स्वतंत्र; का शिस्तशीर, नियमाने बांधलेले अमेरिकेन स्वतंत्र अशी विनोदी तुलना.
वन कोक प्लीज – अमेरिकेतील फास्ट फूड खाद्यसंस्कृतीबद्दल
सुदृढनिश्चयी – अरबटचरबट खाणी आणि बैठ्या जीवनशैलीमुळे लोकांचे अतिविशाल आकार आणि त्याबद्दल न लाजता उलट त्याचं कौतुक करणाऱ्या वस्त्र-संस्कृतीबद्दल.
अॅज गुड अॅज न्यूड – लहान कपड्यांच्या, प्रसंगानुरूप वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालण्याच्या सोसाबद्दल.
“टची गोची”, “हॅप्पी माय टाय डे”- आपल्याला कितीही चांगलं इंग्रजी येत असलं तरी आपले उच्चार आणि अमेरिकन उच्चार यात खूपच फरक आहे. त्यातून समोरच्याला बोलणं समजत नाही किंवा तो काहितरी वेगळंच समजून बसतो. “टी” या अक्षराच्या उच्चाराची अमेरिकन कशी वाट लावतात याची छान उदाहरणे या लेखात आहे. त्यातला एक परिच्छेद बघा.
“आफ्टर त बीप”, “सारं कसं स्वयंचलित” – अमेरिकेत घरगुती कामांसांठी नोकर मंडळी, गडीमाणसं हा प्रकार नसल्यामुळे सगळी कामं आपली आपल्यालाच करावी लागतात. त्यामुळे अंगमेहनतीची कामं जास्तीत जास्त यंत्रांकडून केली जातात. काहीवेळा ही यंत्रावलंबित्वाचा अतिरेकही तिकडे वाटतो. फोनवर प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा एकेमेकांच्या “आन्सरिंग मशीनवर” निरोप ठेवण्यातून संवाद साधला जातो. या पैलूंचे अनुभव या दोन लेखात आहेत.
अतिथी न येवो भव – भारतातल्यासार्कहं कुणच्याही घरी हवं तेव्हा टपकता येत नाही. प्रत्येकाच्या बिझी शेड्यूलमुळे आधी ठरवून भेट घ्यावी लागते त्याबद्दल.
अमेरिकन एक्सप्रेसवेड – रस्तेजंजाळ आणि नियमजंजाळाच्या मजा
श्रीयुत गोरे, काळे, पिवळे आणि तपकिरी – अधिकृतरित्या कोणी वर्णभेद करत नाही पण जरा नीट बघितलं की सार्वजनिक ठिकाणी वर्णभेद कसा नजरेला पडतो.
ग्रेट गँबलर्स – एका कॅसिनोला दिलेली भेट
गुलछबू – अमेरिकेत राहूनही आपला इटलियन गुलछबूपणा न विसरलेल्या इटलियन व्यक्तीरेखा
साग्र-संगीत जसेच्या तसे – योझेमिटी नॅशनल पार्कला भेट
तळ्यात मळ्यात – ज्यांची मुलं आता अमेरिकेत स्थायिक आहेत असे लोक एकदोनदा दीर्घ अमेरिकन वारी करून आले की कसे बदलतात त्याचं वर्णन. अमेरिकेतल्या सुखसोयी चंगल्या वाटतात पण व्यक्तीस्वातंत्र्याच्या अतिरेकामुळे तिथे नातेसंबंध आणि माणसांशी प्रत्यक्ष भेटणं-बोलणं घडत नाही. त्यामुळे पालक वर्गाला अमेरिका आवडतेही-आणि-नावडतेही. मुलांसाठी तिकडे जावं का आपल्याला सवयीच्या भारतात रहावं असा तळ्यात-मळ्यात विचार करणाऱ्यांबद्दल लेख.
अस्वलं, गिधाडं, कोल्हे, बगळे आणि गरूड – अमेरिकन व्यावसायिकांच्या धूर्तपणाचा, स्वार्थीपणाचा आणि व्यावसायिकतेचा आलेला अनुभव.
विनोदी लेखन म्ह्टलं की माझ्या डोळ्यासममोरे अत्रे, पुल, चिंवि, दमामि, कणेकर इ. नावं येतात. आणि विनोदी लेखाची शैली कुणाशी जुळते हे अपोआप बघितलं जातं. वर्दे यांची शैली नक्कीच पुलंसारखी आहे. गुदगुल्या करणे, शाब्दिक कोट्या, संयत टीका, हलकेच चिमटे काढणे अशा पद्धतीचं लेखन मला खूप आवडलं. वर्द्यांचं हे मी दुसरं पुस्तक वाचलं आधी वाचलेलं “फिरंगढंग” हे फिरंगी व्यक्ती-आणि-वल्ली प्रकारचं आहे. त्यावरून विशिष्ट अपेक्षा ठेवूनच हे पुस्तक हाती घेतलं आणि पुस्तकाने ती अपेक्षा पूर्ण केली.
तुम्ही स्वतः अमेरिकेत जाऊन, राहून आला असाल तर तुम्ही हे पुस्तक वाचताना पुनःप्रत्ययाचा आनंद घ्याल. तुम्ही मान डोलावत, हसत हसत नक्की म्हणाल “हो, हो, अगदी असंच आहे”. अमेरिकेत गेला नसाल आणि पर्यटन कंपनी बरोबर दहा-बारा जाण्याचा विचार करत असाल तरी धावत्या भेटीत कदाचित तुम्हाला ही अमेरिका दिसणार नाही. म्हणून तुम्हालाही हे पुस्तक आवडेल. नक्की वाचा. हसा. आनंदी रहा.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दोनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–