पुस्तक : काजळमाया (Kajalmaya)

लेखक : जी.ए. कुलकर्णी (G.A. Kulkarni)

किंमत : २७७

ISBN : 81-7185-446-0


जी ए कुककर्णींच्या दीर्घ कथांचा हा संग्रह आहे. एक दोन पौराणिक प्रकारच्या, एक दोन फँटसी आणि बाकी सध्याच्या काळातल्या कथा आहेत. 



हा कथासंग्रह मला विशेष आवडला नाही. “विदूषक”,”रत्न” इ. पौराणिक व फँटसी कथा या जीवनविषयक सूत्र सांगण्यासाठी किंवा काहितरी मौलिक उपदेश देण्यासाठीच बेतलेल्या आहेत असं वाटतं. त्यामुळे पात्रांच्या तोंडी लांबलचक संवाद आणि तत्वज्ञानाची काथ्याकूट असा प्रकार मला खूप कंटाळवाणा वाटला. हीच तत्वज्ञानाची चर्चा थेट वैचारिक निबंध म्हणून समोर आली असती तर आवडीने वाचली असती. पण कथेमध्ये त्यांचा अतिरेक होतो. 


सद्यकालीन कथा, कथा म्हणून चांगल्या आहेत. पण एकजात सर्व कथांमधलं वातावरण फारच निराशाजनक आहे.  जगण्यातल्या ज्या ज्या नकारात्मक बाजू असतील त्या आठवणीने गोळा करून कथा लिहिल्या आहेत. दुःख, दैन्य, दारिद्र्य, अपमान, विश्वासघात, अत्याचार, मृत्यू, अपेक्षाभंग अशा सगळ्या गोष्टी प्रत्येक कथेत भरपूर !! बहुतेक वेळा नायिका वृद्ध, जीवनाला विटलेल्या आहेत. तरूण वयाच्या असतील तर दारिद्र्याने गांजलेल्या, निपुत्रिक आहेत. नायक हे दरिद्री, व्यसनी, घरच्यांकडून अपमानित झालेले. त्यांच्या बायका-मुली बाहेरख्यालीपणा करतात, मुलं वाया जातात. गावातली आजूबाजूची मंडळी पण एकमेकांचे खून करणारी, लुबाडणारी. निर्सर्गाचं वर्णन पण सतत अंधारून आलंय, मळकट संधीप्रकाश, कुबट वातावरण असं. 

जरा हीच सुरुवात बघा (मोठं करण्यासाठी क्लिक करा) :


मृत जनावर, कुंद-अरुंद गल्ल्या, खुरटी काटेरी झुडपे, तापलेला अंधार, प्रेताची ताठर बोटे, उद्धट सूर्यप्रकाश, स्फोट, तपलेले कण… अरे अरे अरे काय हे ! सुरुवातीच्या एकाच परिच्छेदात हे असं तर पानंच्या पानं पुस्तक कसं असेल विचार करा.


त्यामुळे एक दीर्घकथा वाचल्यावर आपण एखाद्या बरेच दिवस बंद राहिलेल्या धूळ आणि बुरशी साचलेल्या हवेलीत, पावसाळी संध्याकाळी वावरतोय असं होतं. एकदोन कथा वाचल्यावर ही नेपथ्यरचना एकसुरी वाटू लागते. विनाकारण शब्दाला शब्द आणी प्रसंगाला प्रसंग जोडत आठवून आठवून दुःखी वातावरण निर्मिती कृत्रिम आणि कंटाळावाणी वाटते. मी तर पानं भराभर उलटली आणि “हं, ते दुःख कळलं , मुद्द्याचं बोला” असं म्हणत पुस्तक संपवलं; तेही एकावेळी अर्धी किंवा एक कथाच वाचून. एखाद्या नैराश्यग्रस्त किंवा कंटाळलेल्या माणसाने हे पुस्तक वाचलं तर त्याची उरलीसुरली उमेद आणि जगण्यावरचा विश्वास, माणसाच्या चांगुलपणावरचा विश्वासच उडून जायचा. 


पण जगण्याचा या काळ्या भागाचं इतकं प्रभावशाली वर्णन आणि वातावरण निर्मिती अभ्यासण्यासाठी साहित्याच्या विद्यार्थ्यांनी, होतकरू लेखकांनी पुस्तक वाचायला पाहिजे. एकदा हे काळं औषध कसं बनवायचं कळलं की आपल्या कथेत त्याचा योग्य मात्रेत उपयोग करता येईल.





———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————-

———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

———————————————————————————-