पुस्तक – काळेकरडे स्ट्रोक्स (Kalekarde strokes) / औदूंबर (ऑडिओ बुक) (Audumbar)
लेखक – प्रणव सखदेव (Pranav Sakhadev)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २१९
ISBN – 978-93-86493-49-1

प्रणव सखदेव लिखित “काळेकरडे स्ट्रोक्स” कादंबरीचे फोटो बऱ्याच वेळा बघितले होते. पण वाचायचा योग आला नव्हता. या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला ही बातमी वाचल्यामुळे उत्सुकतेने पुस्तक वाचायचा विचार केला. तेव्हा कळलं की स्टोरीटेलवरती ही कादंबरी “औदुंबर” या नावाने प्रकाशित झाली आहे. त्यामुळे स्टोरीटेल वरच ऐकायला सुरुवात केली.

ही गोष्ट एका तरुण मुलाची आहे. डोंबिवलीतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला हा तरुण मुलगा रुईया कॉलेजला जायला लागला आहे. मास कम्युनिकेशन प्रशिक्षण घेतो आहे. त्याला असं वाटतंय की आपलं घर, आपल्या घरचं वातावरण अगदीच साधं, बुरसटलेल्या विचारांचं आहे. आपल्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचंय. पण ते वेगळे म्हणजे काय हे नक्की माहिती नाही. सरधोपट मार्गावर जायला सांगणारे आपले आई-वडील हे जणू अडथळा आहेत. त्यामुळे आई-वडिलांशी फटकून वागून; जेवढ्यास तेवढं बोलून जास्तीत जास्त वेळ घराबाहेर कॉलेजच्या कट्ट्यावर, मित्रांमध्ये काढणारा हा मुलगा.

सहाजिकच पुढे नवनव्या मुलांशी ओळखी होतात, मित्रांच्या नादाने सिग्रेट, दारूचं व्यसन सुद्धा लागतं. संपर्कात आलेल्या काही मुलींशी जवळीक वाढते. पण तिचा फक्त सहवास आवडतोय का प्रेम वाटतंय का शारीरिक आकर्षण वाटतंय हे त्याला कळत नाही. घरी आई-वडिलांची काळजी न करणारा मुलगा गर्लफ्रेंड्सचं दुःख, गर्लफ्रेंडला काय वाटतंय याची मात्र चौकशी करु लागतो आणि फार काळजी करू लागतो.

प्रेम प्रकरणातून शारीरिक संबंध पर्यंत मजल जाणं आणि त्यातून अपराधी वाटणं, मुलीने सोडून जाणं तिच्या विरहात व्याकूळ होणे मग अजून दारू आणि वाईट संगतीत जाणं, घर सोडून अवांतर हिंडणं, पुन्हा प्रेमात पडणं हे सगळं “बैजवार” होतं.

अशी एकूण दिशाहीन तरुणाची ही गोष्ट आहे. म्हटलं तर या गोष्टीत काही नावीन्य नाही. हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात तसं कॉलेज म्हणजे फक्त प्रेम आणि चाळे. ह्या कथा नायकांना कॉलेज मधल्या परीक्षा, असाइनमेंट्स ह्यांचं काही टेन्शन नाही. शेजारपाजारचे लोक, नातेवाईक काय म्हणतात हे जणू आयुष्यात नसतंच. आणि खाणं-पिणं-राहणं-जाणंयेणं-कपडे-इंटरनेट ह्या खर्चाला पैसे “आपोपाप” येतात. असं वास्तवाशी फटकून मांडलेलं “वास्तववादी” कथानक.

बरं कथानक म्हणावं तर गोष्टीला सुरुवात, मध्य, शेवट असं काही नाही. प्रसंगात मागून प्रसंग येत राहतात. त्यांच्यात सुसूत्रता वाटत नाही. वाचता वाचता मला पुरस्कारप्राप्त कादंबऱ्यांची वैशिष्ट्य यातही जाणवायला लागली. ती पुढे देतो आहे. पुस्तक ऐकलंय; वाचलं नाही. त्यामुळे पुस्तकातले उताऱ्यांचे फोटो देता येत नाहीत. पुढे दिलेली वाक्यं साधारणपणे पुस्तकातल्या वाक्यांप्रमाणे आहेत. जशीच्या तशी उतरवलेली नाहीत.

१) प्रसंगांमध्ये महत्त्वाचं फार थोडं घडतं पण लेखक त्या प्रसंगाचं नेपथ्य वर्णन करण्यात वाक्यंच्या वाक्य फुकट घालवतो. वर्णनबंबाळ आणि शब्दबंबाळ !! म्हणजे एखाद्या प्रसंगात काय घडलं यापेक्षा प्रसंग घडला त्या खोलीचं वर्णन, तेव्हा माणसाने कुठले कपडे घातले होते, त्याने केशभूषा केली होती, त्याच्या चपलेचा आवाज कसा येत होता असलं काहीतरी फालतू. म्हणजे, समजा असा प्रसंग असेल की मित्र घरी आला आणि आम्ही चहापाणी करून गप्पा मारल्या आणि गप्पांमधे रहस्य कळलं. तर पुस्तकांत काय असेल… मी मित्राला मॅगी केली. आधी पाकीट फोडलं. निळ्या ज्वालांवर पातेले ठेवलं, आम्ही दोघांनी थोडं थोडं खाल्लं ताटलीत थोडं राहिलं … असलं फालतू वर्णन. विषय काय होता; कथानक पुढे कसं गेलं हे नाही.

२) पुरस्कारप्राप्त पुस्तकांचं दुसरं लक्षण म्हणजे ह्या निरर्थक वर्णनातून आपण खूप मोठा अर्थ, काहीतरी तत्त्वज्ञान सांगतोय मानवी जीवनाचा वेध घेतोय असा आव आणायचा. काहीतरी अमूर्त चित्र विचित्र कल्पना मांडायच्या. उदा. त्या क्षणी मला असं वाटलं की माझ्यादेहाची नळी झाली आहे आणि लख्ख प्रकाश त्यातून आरपार गेला आहे…

मला वाटलं की तिच्या दुःखात न खूप मोठा अवकाश सामावलेला आहे आणि आपल्याला त्याचा वेध घेता येत नाही

तिचं गाणं एक आदिम निराशा मांडत होतं … सगळीकडे पसरत जाणारी , चराचराला गुरफटून टाकणारी निराशा…
असं ह्या पुस्तकात जागोजागी आहे.

३) लैंगिक संबंधाची वर्णने, लैंगिक अवयवांबद्दल उघडउघड टिप्पणी करणारी पात्रे. कादंबरी “बोल्ड” पाहिजेच. या कादंबरीतही नायक आणि त्याचा टपोरी मित्र ह्यांचे पोरी पटवून मजा मारायचे उद्योग चालतात. त्याचे प्रसंग आहेत. त्यांच्यातल्या गप्पांमध्ये ते बढाई मारत असले किस्से सांगतात. “कसं केलं”, “बाई कशी होती” वगैरे. हे सांगताना वर  ही पात्रं “फिलॉसॉफी” झाडणार – देहाच्या गरजा, शेवटी स्त्री-आणि पुरुष हेच दोन प्रकार खरे असली भंकस.

पुस्तकाचं अभिवाचन शिवराज वायचळ ह्याने छान केलंय. स्पष्टता, आवाजातला चढ-उतार, वेगळ्या पात्रांचे थोडे वेगळे आवाज ह्यामुळे “ऐकणं” हा भाग तरी कंटाळवाणा झाला नाही.

सुरुवातीला या पुस्तकाचे भाग मी त्याच्या नेहमीच्या स्पीडने ऐकले. मग जसं पुस्तक आपण भराभर वाचतो तसं स्पीड १.५ करून ऐकलं आणि शेवटी वेग दुप्पट करून ऐकलं. आता तरी काहीतरी होईल काहीतरी कथानक घडेल अशा आशेने पुढे पुढे जात राहिलो. या पात्रांच्या भूमिकेशी समरस होऊन लेखक त्यांच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करेल असं वाटलं पण तसं झालं नाही. टीव्हीहीवरच्या दैनंदिन मालिकांसारखं पाणी घालून गोष्ट वाढत राहिली. एक दिवस लेखकाला लिहून लिहून कंटाळा आला आणि कादंबरी संपली. मी सुटलो !
तुम्ही त्यात अडकू नका एवढंच सांगावसं वाटतंय.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/