पुस्तक : कालगणना   (Kalganana)

लेखक : मोहन आपटे (Mohan Apte)

भाषा : मराठी (Marathi)

पाने : २३८

ISBN : 978-81-7434-421-2


आज काय तारीख आहे? आजचा वार काय? किती वाजले आहेत? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कॅलेंडर आणि घड्याळ बघून देऊ शकता. पण त्यामागचं सामान्य ज्ञान आणि थोडं विज्ञान तुम्हाला माहिती आहे का? वर्षाचे १२ महिने अर्थात ३६५ दिवस असतात. आमावास्या, प्रतिपदा ते पौर्णिमा अशा तिथ्या असतात वगैरे ही माहिती असेलच. पण हे कॅलेंडर असंच का? या पद्धतीच्या कालगणानांची सुरुवात कशी झाली. इंग्रजी महिने, भारतीय महिने, इस्लामी कॅलेंडर, पारशी कॅलेंडर यांच्यात काय फरक आहे. “नेमेचि येणारा पावसाळा” जून-जुलैत येतो, डिसेंबरच्या आसपास थंडी पडते. या महिन्यांचं आणि ऋतूंचं नातं असं घट्ट कसं काय झालं. बातम्यांमध्ये ऐकू येतं ते “भारतीय सौर दिनांक” ही काय भानगड आहे. असे कितीतरी प्रश्न तुमच्या मनात येत असतील. हे कुतूहल शमवणारं आणि कालगणना, पंचांग याबद्दल अजून कुतूहल निर्माण करणारं पुस्तक आहे मोहन आपटे लिखिल कालगणना.


पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यातून दिवसरात्र होते. चंद्राच्या वेगवेगळ्या कलांमधून महिन्याची जाणीव होते. पृथ्वीची सूर्याभिवती एक प्रदक्षिणा झाली की एक वर्ष पूर्ण झाल्याची जाणीव होते. पण या प्रत्येक गोष्टीला लागणारा वेळ वेगळा आहे. आणि त्याच्यात सतत कमी जास्त वेळ लागतो. ३० दिवसांचा १ महिना म्हटलं तरी चंद्राच्या सर्व कला दिसायला २९.५ दिवस लागतात. सुर्याभोवती फिरायला ३६५.२४२२ दिवस लागतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना कधी जोरात पुढे जाते तर कधी हळू. कुठलाही एक संदर्भ बिंदू घेतला – सूर्य, चंद्र किंवा आकाशातले तारे – तरी सगळ्याच गोष्टी अवकाशात फिरता आहेत, एकमेकांच्यातलं अंतर कमीजास्त होतंय या सगळ्यामुळे कलगणना करणं किचकट होतं. या पुस्तकात हे किचकट गणित सोप्यापद्धतीने सर्व सामान्यांना कळेल असा पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला आहे.


अनुक्रमणिकेवर एक नजर टाकल्यावर पुस्तकातल्या मुद्द्यांचा अंदाज येईलच. 



कालगणानेचं खगोलशास्त्र, गणितीय समीकरणं, परंपरा आणि इतिहास अशा चहुअंगांनी या विषयाचा वेध घेतला आहे. त्यामुळे काही गमतीशीर गोष्टीही कळतात. उदा. फार पूर्वी रोमन कॅलेंडर १०च महिन्यांचं होतं. मार्च ते डिसेंबर. नंतरचे दोन महिने इतकी थंडी असायची तिकडे, की लोकांना काही काम करणं शक्यांच व्हायचं नाही. त्यामुळे ते दिवस मोजलेच जायचे नाहीत. पुढे ज्युलियस सिझरच्या काळात कॅलेंडर मध्ये सुधारणा झाल्या आणि त्याच्या सन्मानार्थ जून नंतरच्या महिन्याला जुलै नाव देण्यात आलं. ३६५.२४२५ मधल्या वरच्या पाव दिवसाची व्यवस्था करण्यासाठी लीप वर्षात एक दिवस जादा द्यायला सुरुवात झाली. पोप ग्रेगरीने त्यात अजून सुधारणा केल्या. इस्टर चा सण वसंत ऋतूत आला पाहिजे; ज्यादिवशी दिवस-रात्र सारखी असते तो उहाळ्यातला दिवस पूर्वीप्रमाणे २२ मार्चच्या आसपास यावा अशा काही धार्मिक गरजा तेव्हा निर्माण झाल्या. ग्रगरीने एका साली कॅलेंडर मधले १० दिवस काढून टाकले, काही नवीन नियम बनवले आणि ग्रेगोरियन कॅलेंडरची- जे सध्या आपण इंग्रजी कॅलेंडर म्हणतो त्याची – सुरुवात झाली. शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेचा गोंधळ त्यामुळेच आहे. तो असा :



कॅलेंडर मध्ये सुधारणा करण्यासाठी जागतिक कॅलेंडर प्रस्तावित करण्यात आलं होतं. जे बारगळलं. त्याची झलक बघा.



भारतीय कालगणना सुद्धा खूप प्राचिन आणि पुढारलेली आहे. ती कालगणना कशी चालते हे पुस्तकात सविस्तर दिलं आहे. वेदकाळात महिन्यांची नावं वेगळी होती ती पहा.


आठवड्याचे ७ वार. पण शनि, रवि, सोम.. असा क्रम कसा ठरवला गेला असेल. त्यामागचं गणित बघा.


महाराष्ट्रात काही कुटुबांमध्ये “टिळक पंचांग” वापरलं जातं. ते वेगळं कशामुळे आहे तो इतिहास आणि त्यामागचं खगोल शास्त्र पुस्तकात आहे. भारतीय आणि पाश्चात्त्य राशीव्यवस्थेतला फरक समजावून सांगितला आहे.



चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या आधारे २७ स्थानांवरून २७ नक्षत्रांची संकल्पना आहे. तसेच सूर्याच्या स्थानांवरून १२ राशींची कल्पना आहे. ही सगळी गणिते सविस्तर सांगितली आहे


आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये सेकंद मोजण्यासाठी काही मूलद्रव्यांच्या अणू-रेणूंचा वापर केला जातो त्याचीही ओळख करून दिली आहे. पुस्तकाच्या शेवटी बरेच तक्ते, आकृत्या, पारिभाषिक शब्दांची सूची, संदर्भग्रंथांची यादी दिलेली आहे.


पुस्तक वाचताना खगोलशास्त्रातील काही अमूर्त संकल्पना डोळ्यासमोर आणणं अवघड वाटतं. तेव्हा नेटवर चित्र/व्हिडिओ च्या सहाय्याने ती संकल्पना थोडी समजावून घेतली की पुढचा भाग समजायला सोपा जातो. खूप मोठ्ठी समिकरणं दिली आहेत ती लक्षात नाही राहिली तरी चालू शकेल पण त्याच्या मागची थेअरी समजली पाहिजे. 


अशाप्रकारे हे पुस्तक खगोल, गणित आणि माहिती यांनी परिपूर्ण आहे. ही सगळी माहिती एकादमात वाचून संपववण्यासारखी नाही. हळूहळू वाचून विषय समजावून घेतला पाहिजे त्या दृष्टीने पुस्तक संग्राह्यसुद्धा आहे. या विषयात ज्यांना रस आहे ते तर आवर्जून वाचतीलच, पण ज्यांना रस नाही त्यांनाही कदाचित पुस्तक वाचनातून रस वाटणं सुरू होऊ शकेल. किमानपक्षी सामान्य ज्ञानात आणि आकलनात भर घालण्यासाठी अवश्य वाचा. 




———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )

———————————————————————————-





———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————