पुस्तक – करुणाष्टक (Karunashtak)
लेखक – व्यंकटेश माडगूळकर (Vyankatesh Madgulkar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – १५८
ISBN – दिलेला नाही . (पहिली आवृत्ती – १९८२)

करुणाष्टक ही स्वातंत्र्यपूर्व काळात घडणाऱ्या एका गरीब ब्राह्मण कुटुंबाची कहाणी आहे. ह्या कुटुंबातला एक मुलगा आठवणी सांगतो आहे. त्याच्या लहानपणापासूनच्या आठवणींपासून सुरुवात करून तो प्रौढ होऊन त्याची वृद्ध आई देवाघरी जाते तिथपर्यंतचा कालखंड आहे. ह्या आठवणी पूर्णपणे कौटुंबिक आहेत. आई, वडील, आजी आणि दोनतीन मुलांचं कुटुंब एका खेडेगावात राहत असतं. वडील कारकून. परिस्थिती बेताचीच. नव्या गावी बदली होते. मग तिथे नवीन बिऱ्हाड वसवतात. मग जे घरगुती प्रसंग घडू शकतील ते घडत राहतात. नवं घर काही सोयीचं नसतं त्यामुळे दुरून पाणी आणावं लागणं, सागळी कामं स्वतः करावी लागतात. नव्या शेजाऱ्यांशी ओळख, मुलांची आजारपणं, नव्या भावंडांचे जन्म आणि जुन्यांचे मृत्यू हे प्रसंग आहेत.

गरिबीमुळे घडू शकणारे प्रसंग येतातच – पैशाच्या ओढाताणीमुळे मोठ्या मुलाला वसतिगृहात जावं लागणं, दुसऱ्याला शिक्षण लवकर पूर्ण करून नोकरीला लागावं लागणं वगैरे होतं.

गरिबीच्या जोडीला दुर्दैव सुद्धा ह्या कुटुंबाच्या पाचवीलाच पुजलेलं. त्यामुळे चोरीचा आळ येण्याची शक्यता, मोठ्या मुलीची लग्न लवकर न जुळणं. मुलांची जुळली तर सुनांशी खटके उडणं, मुलांना धंद्यात खोत येऊन वडिलोपार्जित संपत्ती विकायला लागणं आणि अगदी शेवटी वृद्धापकाळी मुलांचे मृत्यू !!

काही पानं वाचा (फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)
नवरा परगावी गेल्यावर खायचे-प्यायचे वांदे झाल्यावर एका भिक्षेकऱ्याकडून भिक्षा मागण्याची वेळ 🙁

कादंबरीतला एकमेव बरा प्रसंग. नोकरीचा भाग म्हणून संस्थानच्या देवस्थानच्या खजिन्याची जबाबदारी मिळते तेव्हा काही चांगले दिवस येतात. मग पुन्हा बदली आणि ये रे माझ्या मागल्या !

गांधी हत्येनंतर गांधींच्या “अहिंसक” अनुयायायांनी  महाराष्ट्रभर ब्राह्मणविरोधी दंगली केल्या. ब्राह्मणांची घरं जाळली, हत्या झाल्या. त्या आगीत हे कुटुंबसुद्धा पडलं.  काहीतरी किडूकमिडूक जमा करून उभारलेला संसार सुद्धा दंगलखोरांनी जाळून टाकला.

पुस्तकात लेखकाने काढलेली पात्रांची रेखाचित्र आहेत. वृद्ध आईचं हे चित्र

तुमच्या लक्षात आलं असेल की हे पुस्तक करुणा “अष्टक” नाही तर करुणा सहस्रनाम आहे ! हे व्यंकटेश माडगूळकरांचं खरं आयुष्य आहे का खऱ्या आयुष्यावर आधारित पण काल्पनिक कादंबरी आहे कल्पना नाही. पुस्तकात तसं काही स्पष्ट केलेलं नाही. पण कदाचित आधारित तरी असावी. कारण औंध संस्थानाप्रमाणे वातावरण, गांधीहत्येनंतर घराची जाळपोळ हे त्यांच्या खऱ्या आयुष्याशी जुळतंय. मोठ्या भावाचे उल्लेख येतात – तो कवी गीतकार होता, रामची गीते लिहिली, शेवटी कर्करोगाने त्यांचं निधन झालं – ह्यावरून हे ग.दि.मा. बद्दल लिहिलंय हे स्पष्ट होतं.
(ज्यांना कोणाला पुस्तकाबद्दल खरं माहिती असेल त्यांनी सांगावं )जर हे खरं असेल तर फारच वाईट आयुष्य लेखकाच्या, कुटुंबाच्या आणि त्यांच्या आईच्या वाट्याला आलं. तरीही ह्या दोन बंधूंनी जे कर्तृत्व दाखवलं त्याचं नवलच वाटेल.पण हे पुस्तक काल्पनिक असेल तर खरंच विषण्ण करणारं पुस्तक आहे. पुस्तक वाचताना कंटाळवाणं होत नाही पण एकसुरी नक्कीच होतं. म्हणजे; सगळ्यांचं सगळं वाईटच होणार आहे हा “अजेंडा” कळाला की असं वाटतं की लेखक असा विचार करत असेल का – “हं आता आता यादीतील पुढचं संकट काय टाकू ? … अरे अजून आत्महत्त्या घेतली नाही. ह्या पात्राला तसं मारतो… ह्या पात्राचं बरं चाललंय असं दाखवलं; ह्याला कर्जबाजारी करतो. … त्याला वेडं करतो …”मला हे वाचताना “पथेर पांचाली” ची आठवण झाली त्याचं परीक्षण लिहिताना सुद्धा मी हेच लिहिलेलं “दुर्दैवाच्या दशावतारांची जंत्री असं कादंबरीचे स्वरूप वाटतं”. जी.एंच्या काजळमाया पुस्तकाबद्दल सुद्धा असंच वाटलेलं.
( “काजळमाया” चे परीक्षण https://learnmarathiwithkaushik.com/courses/kajalmaya

“पथेर पांचाली” चे परीक्षण https://learnmarathiwithkaushik.com/courses/pather-panchali )

ही पुस्तकं वाचून तत्कालीन मध्यमवर्गीय समाजाचं रूप डोळ्यासमोर असंच उभं राहतं की दारिद्र्यात जगणं; तरी पोरांचं लेंढार तयार करणं आणि ते सांभाळता सांभाळता पिचून जाणं; मग मोठ्या मुलाने आपल्या वडिलांचं लेंढार सांभाळत स्वतःच लेंढार तयार करून समस्या दहापट वाढवणं. र.धो. कर्व्यांसारख्या संततीनियमनाचा प्रसार करणाऱ्या विभूतीची त्याकाळी आणि आजही गरीब समाजाला किती आवश्यकता आहे हेच ह्यातून अधोरेखित होतं.दुसरं एक म्हणजे सध्याच्या जातीयवादी राजकारणाच्या जमान्यात ब्राह्मण समाज, सवर्ण समाज म्हणजे शोषक; सत्ता-श्रीमंती उपभोगणारा असं वर्णन केलं जातं. पण हा वर्गसुद्धा गरीबच होता आणि परिस्थितीशी झुंजत होता हे वास्तव लख्ख दिसतं. त्यामुळे हे “दलित साहित्य” नसलं तरी दाहकच आहे.

तर असं पुस्तक आहे. तुम्ही ह्या पद्धतीचं लेखन आधी नसेल वाचलं तर वाचा. जर असं लेखन वाचलं असेल तर वाचनातून खूप काही हाती लागलं असं वाटणार नाही.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/