पुस्तक : खेकसत म्हणणे, आय लव्ह यू  (khekasat mhanane, I love you)

लेखक : श्याम मनोहर (shyAm manohar)

पाने : २०३

ISBN : 978-81-7185-998-6



कादंबरीचं नाव आणि मलपृष्ठावरचा मजकूर बघून काहितरी वेगळं असेल म्हणून पुस्तक वाचायला घेतलं. त्याप्रमाणे वेगळेपणा कादंबरीत आहे. पण तो वेगळेपणा मला अजिबात आवडला नाही. एखाद्या कादंबरीलेखकाने आपल्याला त्याची कादंबरी वाचायला देण्याऐवजी आपल्याशी तो काय विचार करतोय हे सांगत राहिलं तर कसं वाटेल तसं हे पुस्तक आहे. लेखकाने कादंबरीत पाच पात्र ठरवली आहेत. साचेबद्ध. एक संघाचा, एक समाजवादी, एक दलित नेता, एक तरूण मुलगी, एक तरूण. त्यांची ओळख करून दिली आहे. आणि ही पात्र घेऊन गोष्ट घडवायची आहे. मग त्यांना काय पार्श्वभूमी द्यायची त्याचे पर्याय आणि त्यातला निवडलेला पर्याय दिले आहेत. मग त्याच्या कथेची गरज म्हणून त्यांना एकांतवासात पाठवायचंय तर त्यांसाठी त्यांच्या आयुष्यात काय काय घडावता येईल त्याची चर्चा आणि त्यातला एक पर्याय निवडणे. मध्येच मुख्य पात्रांच्या आजुबाजूला घडणऱ्या काही घटना, मध्येच त्यांची स्वगतं, मध्ये नुसतेच विचार अशा भरताड पद्ध्तीने पुस्तक पुढे जात राहतं.

काही उदाहरणं


पात्र परिचय:


एका पात्राला दुसऱ्या माणसाची आठवण येते. तर पुस्तकात चक्क क्रमांकासहित आठवणींची यादी दिली आहे :



पात्राच्या आयुष्यात पुढे काय घडवायचे याची वाचकाशी चर्चा :



पात्रंपण  “कृष्ण-धवल” रंगवली आहेत. संघाचा माणूस म्हणजे तो अशाच साच्यात विचार करणार, असंच बोलणार; दलित नेता म्हणजे अशाच साच्यात विचार करणार, असंच बोलणार. हे साधारण टीव्हीवरच्या चर्चांमध्ये माणसं जशी अभिनिवेशाने, मुखवटा घालून वागतात तशीच ही पात्रं आहेत. त्यात काही कंगोरे वाटले नाहीत. त्यामुळे सुरुवातीची पानं तीसेक पानं नीट वाचली. मग पन्नासेक पानं गोषवारा पद्धतीने वाचली. तरीही पुस्तकाने काही पकड घेतली नाही. पुढची पाने चाळत चाळत वाचली. काही पाने सोडून अगदी शेवट वाचला. तरी मध्ये काय घडलं असेल याची काहीच उत्सुकता वाटली नाही. 


लेखकाला राजकीय, सामजिक चिंतन करायचंय आणि या पात्रांच्या मार्फत ते मांडायचंय एवढंच जाणवलं. पण अशीच पात्रं घेऊन,त्यांच्या तरल चित्रणातून, एक कथासूत्र ठेवून एल. भैरप्पांच्या कादंबऱ्या किती उच्च पातळी गाठू शकतात हे अनुभवलेलं असल्याने ही कादंबरी खूपच ठोकळेबाज, वरवरची वाटली. आणि कादंबरीच्या “फॉर्म” चा प्रयोगही मला भावला नाही.

———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) 

———————————————————————————-

———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )

———————————————————————————-