पुस्तक – कुल्फी दिवाळी अंक २०२३ (Kulfi Diwali Ank 2023)
संपादक – ऋषिकेश दाभोळकर (Rushikesh Dabholkar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – ८२
ISBN – दिलेला नाही
छापील किंमत – २२०

वाचनालयात दिवाळी अंक चाळताना नजर गेली ह्या अंकावर. नाव वेगळंच… कुल्फी. आकार वेगळा चौरसाकर..आणि वर कार्टून/अर्कचित्र. धमाल करणारी मुलं. ते बघूनच हसू आलं आणि आत काय आहे बघूया म्हणून मासिक हातात घेतलं. सहज पानं चाळली. तर पानोपानी रंगीबेरंगी पेंटिंग्ज. काही वास्तवदर्शी तर काही अर्कचित्र. डोळ्यात भरणारे रंग, मनोवेधक मांडणी आणि उच्च दर्जाची कला बघून मन मोहून गेलं. लहान मुलांसाठीचा दिवाळी अंक आहे हे कळत होतं पण इतका सुबक, सुंदर की मोठ्यांनाही त्याचं रूपडं आकर्षित करेल असं दिसलं.

मुलांसाठी इतकी मेहनत घेऊन, विचार करून, खर्च करून बनवलेला हा दिवाळी अंक बघून माझ्यातलं लहान मूल जागं झालं. आणि मी अंक घरी आणला.
आता तुम्हीच ही काही पानं बघा म्हणजे तुम्हाला सुध्दा माझं म्हणणं पटेल.

ह्या मासिकात गोष्टी आहेत. प्रवास वर्णन आहे. एक विज्ञान कथा आहे. मुलांसाठी गुलाजारांनी लिहिलेल्या पुस्तक संचाची ओळख करून दिली आहे. प्रमाण भाषेप्रमाणे मराठीच्या बोलींतल्या गोष्टी आहेत. मुलांचा एक ग्रुप पोटात शिरतो आणि आपली पचनसंस्था एखाद्या “फॅक्टरी व्हिजिट” प्रमाणे बघतो अशी कल्पना करून माहितीपर लेख आहे. कुमार गंधर्व ह्यांच्या गाण्याची ओळख लहानपणी कशी झाली असा एक लेख आहे.

एक मला आवडलं की नेहमीप्रमाणे प्राण्यांच्या गोष्टी – माणसांच्या ऐवजी प्राणी पात्र म्हणून दाखवायच्या – असा प्रकार इथे नाही. तर खऱ्याखुऱ्या माणसांच्या खऱ्याखुऱ्या घटनांच्या गोष्टी आहेत. सुपर हिरो आणि कार्टून नाहीत. थेट “तात्पर्य” सांगणाऱ्या नीतीकथा नाहीत. तरी काहीतरी सांगणाऱ्या गोष्टी आहेत. आपलं आपण ते शोधायचं आहे.

सगळाच मजकूर खूप धमाल आहेत असं नाही. पण वेगवेगळी भावविश्वे नवे अनुभव मुलांसमोर सादर करणारा आहे. पाचवी-सातवी पुढच्या मुलांना स्वतःला नीट समजेल. लहान मुलांना मात्र मोठ्या व्यक्तीने वाचून दाखवून, थोडं समजावून सांगायला लागेल. थोडं गंभीर, थोडं डोक्याला चालना देणारं वेगळ्या धाटणीचं हे लेखन आहे.

मासिकात दिलेल्या माहितीनुसार ह्या नियतकालिकाचे वर्षात तीन अंक निघतात (उन्हाळी, पावसाळी आणि दिवाळी). हल्ली कोणी वाचत नाही, इंग्लिश मिडीयम मुळे मुलांना मराठी वाचता येत नाही, समजत नाही; अशी रड सगळीकडे चालू असताना मराठी भाषेत मुलांसाठी इतके उच्च निर्मितीमूल्य असणारा दिवाळी अंक काढणाऱ्या कुल्फीच्या निर्मात्यांच्या धाडसाला वंदन. त्यांचा हा प्रयत्न महाराष्ट्रभर पोचो, त्यांना चांगला प्रतिसाद मिळो आणि हा उपक्रम दीर्घायुषी ठरो ही माझी प्रार्थना. परिचय लिहून ही माहिती प्रसारित करण्यात माझा खारीचा वाटा.

मला अंक वाचनालयात मिळाला. तुम्हाला कुठे उपलब्ध होतो आहे का पहा. नाहीतर पुढे दिलेल्या माहितीनुसार “कुल्फी”च्या टीमशी संपर्क साधून थेट त्यांच्याकडून मिळतोय का बघा.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या अडीचशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

My book reviews

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/

गंमत चिनी भाषेची मराठीतून

२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level २ परीक्षा मी ९५% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link