पुस्तक : कुतूहलापोटी (kutuhalapoti)
लेखक : अनिल अवचट (Anil Avachat)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २००
ISBN : दिलेला नाही
डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, लेखक असे बहुपेडी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या अनिल अवचट यांनी “कुतूहलापोटी” या पुस्तकातून निसर्गातील चमत्कारांचे जग आपल्यासमोर खुले केले आहे. पुस्तकाच्या मनोगतात त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की एखाद्या गोष्टीचं कुतूहल वाटलं की त्याबद्दलची पुस्तकं वाचणं, त्यातल्या तज्ञांना भेटून त्याचं सखोल ज्ञान मिळवणं हा त्यांचा खाक्या रहिला आहे. ज्या गोष्टी त्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमात होत्या त्या कॉलेजजीवनात जबरदस्ती म्हणून शिकल्या गेल्या होत्या. त्यात आनंदाचा भाग कमी होता. पण तीच गोष्ट आज शिकताना आनंद, कुतूहल, जिज्ञासा यापोटी खूप खोलात जाऊन समजावून घेतली जाऊ लागली.
(फोटोंवर क्लिक करून झूम करून वाचा)
निसर्गात पदोपदी दिसणाऱ्या चमत्कारांनी मन हरखून जातं. असेच आश्चर्याचे आणि ज्ञानाचे तुषार या पुस्तकातून त्यांनी वाचकांवर उडवले आहेत. त्याचे विषयही खूप वेगवेगळे आहेत. अनुक्रमणिका पहा.
फंगस म्हणजे बुरशीचं जीवनचक्र कसं चालतं, समुद्रापासून जंगलापर्यंत आणि उंच शिखरापासून माणसाच्या शरीराच्या आत बुरशी वाढते. जिथे वाढते तिथल्या वनसपतींकडून अन्न मिळवते आणि जमिनीतल्या घटकांचे विघटन करून वनस्पतीला पोषक द्रव्य पुरवते. असा परस्परसहकार्याचा मामला असतो. बॅक्टेरिया हे सूक्ष्मजीव पण असेच कुठे कुठे आधणारे. कधी उपकारी, कधी त्रासदायक. अशी बुरशीची, बॅक्टेरियाची माहिती आहे.
शरीरात हे सूक्षमजीव कुठे वास करतात ते वाचा :
मधमाश्यांच्या पोळ्याची रचना कशी असते, कामकरी माश्या मध शोधतात आणि नाच करून इतर माश्यांना योग्य दिशा कशी दाखवतात, मधमाश्यापालनातून शेतकऱ्यांना फायदा करून देण्याचा व्यवसाय परदेशात कसा चालतो याची माहिती आहे. मधमाश्यांच्या स्वच्छतेबद्दल वाचा :
अशीच रोचक, रंजक माहिती कीटक, साप, पक्षी यांची आहे.
शेवटच्या पाच लेखांत शरीराचे वेगवेगळे भाग आणि त्यांची रचना निसर्गाने कशी कमालीची केली आहे, शरीराच्या आत कितीतरी रासायनिक प्रक्रिया कशा घडतात, जखम झाली की रक्त बाहेर येते आणि रक्त साकळते या नित्य अनुभवामागे सुद्धा किती गुंतागुंतीची प्रक्रिया घडते इ. माहिती सविस्तर आहे.
रक्त तपमान नियंत्रण कसं करतं ते बघा.
पेशींची अनिर्बंध अनियंत्रित वाढ म्हणजे कॅन्सर. काही कारणांमुळे पेशीमध्ये बिघाड होतो आणि ती अनियंत्रित वागू लागते. पण अश्या बिघडलेल्या पेशी आपल्या शरीरात नेहमी उत्पन्न होत असतात. तरी प्रत्येकाला सतत कॅन्सर होत नाही. कारण अश्या बिघडलेल्या पेशी शोधण्याची, त्या नष्ट करण्याची यंत्रणा सुद्धा शरीरात आहे. हे सगळं पेशींचं जीवनचक्र सुद्धा त्यांनी सोप्या शब्दात समजावून सांगितलं आहे. बाळाच्या हृदयाची वाढ कशी होते
पुस्तकाचा विषय गंभीर आणि किचकट आहे. पण पुस्तक तांत्रिक नाही. सर्व सामान्यांना सोप्या भाषेत थोडी तोंडओळख व्हावी, प्रत्येक गोष्टीमागे किती सखोल विज्ञान आहे, किती बारकावे आहेत या कडे अंगुलीनिर्देश व्हावा हा आहे. आणि हे सांगताना लेखकाची भाषा अशी आहे की जणू तो आपल्याशी गप्पा मारतोय, “काल काय किस्सा घडला” असं मित्राने सांगावे अशा थाटात, “तुला एक गंमत सांगतो, इतका लहान अजगर इतके मोठे प्राणी कसे गिळू शकतो माहिती आहे ? … आणि पोटातल्या बाळाला ऑक्सिजन कसा जातो हे ऐकलंस तर चक्रावूनच जाशील..” असं आपला मित्र सांगतोय असं वाटतं. दाखले पण रोजच्या जगण्यातले. ज्यांनी अनिल अवचटांची व्याख्यानं किंवा त्यांच्याशी संवादाचे कार्यक्रम ऐकले असतील त्यांना या गप्पांचंच लेखन केलंय असं वाटेल.
त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला वाचायला आवडेल, उपयुक्त ठरेल, कुतूहल चाळवेल आणि अजून खोलात जायची इच्छा निर्माण करेल असे हे पुस्तक आहे. प्रस्तावनेत डॉ. आभय बंग यांनी योग्यच म्हटलं आहे – “लहान मुलाचं न संपणारं कुतूहल, वैज्ञानिकाची जिज्ञासा आणि श्रेष्ठ दर्जाची सहज लेखनशैली अशा तीन व्यक्तिमत्त्वांनी एकत्र येऊन हे पुस्तक लिहिलं असावं. त्यातून हा दोनशे पानांचा आनंदोत्सव निर्माण झाला आहे.”
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————