पुस्तक :- Life of Pi (लाईफ ऑफ पाय)
लेखक :- यान मार्टेल (Yann Martel )
भाषा :- इंग्रजी (English)
“लाईफ ऑफ पाय” हा गाजलेला हॉलिवूड चित्रपट ज्या कादंबरीवरून तयार केला गेला आहे ती “यान मार्टेल” याची कादंबरी नुकतीच मी वाचली. जहाजबुडीतून वाचलेला एक लहान मुलगा एका छोट्या लाईफ बोटीवर कित्येक महिने कसा राहतो, स्वतःचा जीव कसा वाचवतो, संकटांना तोंड कसं देतो याचं रोमहर्षक चित्रण यात आहे. आणि हो, या प्रवासात तो एकटा नसतो बरं. छोट्याश्या लाईफबोटीवर असतात त्याच्याबरोबर वाघ, तरस, गोरिला असे हिंस्त्र प्राणी.
पॉंडीचेरी ला प्राणिसंग्रहालय चालवणारे एक कुटुंब आपलं प्राणिसंग्रहालय बंद करून कॅनडात स्थलांतरीत व्हायचे ठरवते. बहुतेक प्राणी विकले जातात. काही प्राणी विक्रीसाठी कॅनडाला न्यायचे असतात. म्हणून एका मोठ्या मालवाहू जहाजने ते प्रवासाला निघतात. प्राण्यांचे पिंजरेही जहाजावर चढवलेले असतात. आणि एके रात्री काही अपघात होऊन जहाज बुडू लागते. त्या कुटुंबातला एक लहान मुलगा – ज्याचं नाव “पाय”- तोच वाचतो कारण जहाजाचे कर्मचारी त्याला एका लाईफ बोटी वर फेकतात. पण हाच प्रसंग त्याच्या आयुष्यातला “ट्रनिंग पॉइंट” ठरतो. कारण “लाईफ” बोटी वर तो एकटा नसतो तर आधीच त्या बोटीत चढलेले/पडलेले वाघ, तरस, गोरिला असे हिंस्त्र प्राणी.
ती बोट अथांग महासगरात वारा नेईल तशी फिरत राहते. आणि पुढचे तब्बल ७ महिने तो त्या बोटी वर कसे दिवस काढतो याचं वर्णन अंगावर काटा आणतं. जीव वाचवायचा तर बोटीत राहिलं पाहिजे आणि बोटीत गेलं तर प्राणी हल्ला करतील अशा विचित्र कात्रीत सापडलेला “पाय” छोटा तराफा बांधून बोटीजवळ राहायचा प्रयत्न करतो. बोटीतलं जीवनावश्यक सामान शिताफिने मिळवायचा प्रयत्न करतो. सगळं खाणं संपल्यावर अगतिक होऊन त्याला मासे/खेकडे/कासवं खावी लागतात आणि संपूर्ण शाकाहारी असणाऱ्या त्याला पहिल्यांदा हातात असलेला जिवंत मासा मारणं – एक हत्या करणं- किती जड जातं असे कितितरी हृदयस्पर्शी प्रसंग आहेत.
प्राणी एकमेकांशी लढतात आणि शेवटी “पाय” आणि वाघच बोटीवर उरतात. अशावेळी त्याला वाघाची भीतीही वाटते आणि मैलोन्मैल पसरलेल्या पाण्यात त्याचीच सोबतही वाटते. आपला जीव वाचवायचा तर वाघाला कसं ठर करता येईल याचा विचार एकीकडे तर या वाघाच्या भीतीमुळे आपल्याला समुद्राची भीती वाटायला वेळच मिळाला नाही-त्याच्या मुळे आपण मानसिक सबळ राहिलो असा विचार दुसरीकडे. “पाय”च्या मानसिक आंदोलनांचं हृद्य वर्णन वाचलंकीच जाणवेल. वाघाला सर्कस प्रमाणे ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी प्राण्यांची बुद्धी कशी काम करते हे लेखकाने छान समजावून सांगितलं आहे. पायला पाण्या खालचं नैसर्गिक जलजीवन कसं दिसतं, एका अद्भुत बेटाला भेट आणि तिथला जीवन्मृत्युचा संघर्ष हे सगळं वाचकाला खिळवून ठेवतं.
पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात “पाय” चे लहानपण, त्याच्या “पाय” या नावामागची कहाणी, त्याला सर्व धर्मांबद्दल वाटणारं आकर्षण हा भाग आहे पण तो पूर्ण अनावश्यक आहे. पहिली शंभर पानं वाचताना ’चुकीचं पुस्तक तर वाचत नाहीयेना मी’ असं वाटवं इतका अप्रस्तुत भाग त्यात आहे. फक्त त्या प्रकरणातून मिळणारी वन्यप्राण्यांच्या जीवनशैलीबद्दलची माहिती उपयुक्त आहे. तिसरं प्रकरण ही असंच अनावश्यक आहे. “पाय” वाचल्यावर जहाज कंपनीचे अधिकारी त्याला भेटायला येतात, तो त्यांना सर्व कहाणी सांगतो त्याच्यावर त्यांचा विश्वास बसत नाही मग त्यांना तो दुसरी एक कहाणी बनवून सांगतो. यात शेवटची तीसेक पानं रटाळपणा केला आहे.
त्यामुळे हे पुस्तक अवश्य वाचा पुस्तकाचं पहिलं प्रकरण भरभर वाचा. त्यातला प्राणीजीवनासंबंधीचा भाग मनोरंजक आहे आणि पुढच्या प्रकरणात “रिलेट” करण्यासाठी आवश्यक आहे. दुसरं प्रकरण हा मूळ गाभा आहे. तिसरं प्रकरण द्या सोडून.
हे पुस्तक वाचण्यापूर्वी मी चित्रपट बघितला नव्हता. पुस्तक अर्धं वाचून झालं तेव्हा अचानक चित्रपट बघायला मिळाला. पण पुस्तकाची मजा चित्रपटामधे आली नाही. समोर घडणाऱ्या प्रसंगांइतकेच पायच्या मनात घडणारी, प्राण्यांच्या मनात घडणारी आंदोलनेही तितकीच रोमहर्षक आहेत. कादंबरी वाचूनच ते कळेल. म्हणून चित्रपट बघितला असेल तरी कादंबरी अवश्य वाचा. कादंबरी वाचण्यापूर्वी चित्रपटाची झलक बघितली तर लाईफबोट, तिचा आकार, तिचे भाग हे एकदा डोळ्यासमोर आले की जास्त मजा येईल. कारण पुस्तकात बोटीच्या वेगवेगळ्या भागांचा उल्लेख आहे पण त्याचा अर्थ आणि स्वरूप नक्की काय हे कळलं नाही तर “पाय”ची कुठेतरी काहितरी धडपड चालू आहे इतकंच जाणवतं. म्हणून पुस्तक वाचताना मी बऱ्याच वेळा मी गूगलवरून फोटो लाईफ बघितले. पण चित्रपट बघितल्यावर बोटीचं, तराफ्याचं चित्र अजून स्पष्ट झालं.
असो. बरंच लिहिलं. शेवटी एकच – पुस्तक सगळ्यांना आवडेल असंच आहे. नक्की वाचा.
————————————————————
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
————————————————————
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
———————————————————————————-