पुस्तक : LOSER-Life of software engineer (लूजर – लाईफ ऑफ सॉफ्टवेअर इंजिनियर)

लेखक : Dipen Ambalia (दिपेन अंबालिया) 

भाषा : English(इंग्रजी )

पाने : २१०

ISBN : 978-81-7234-397-2


माहिती तंत्रज्ञान अर्थात “आयटी” क्षेत्र भारतातलं रोजगाराचं महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. आयटी म्हटलं की – चांगला पगार मिळतो, परदेशवारीची संधी मिळते; परदेशी कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा अलभ्यलाभ मिळतो, आरामदायी एसीत बसून काम करायचं असतं अशी वेगवेगळी वैशिष्ट्य आपल्याला कुणीही सांगेल. त्यात काही चुकीचंही नाही. पण समर्थांनी म्हटलंच आहे “जगी सर्व सुखी असा कोण आहे?”. एखाद्या आयटीवाल्याशी तुम्ही बोललात तर तो तुम्हाला त्याच्या समस्यांचा पाढा वाचून दाखवेल. आत्महत्याग्रस्त शेतकरी, शोषित कामगार किंवा वंचित आदिवासी यांच्या समस्यांइतक्या या समस्या तीव्र, जीवघेण्या नक्कीच नाहीत. पण तरीही त्याला काहितरी सलतंय खरं; हे तुम्हाला समजेल ! तो आयटिवाला  जर “दिपेन अंबालिया” असेल तर तो नुसतं तुमच्याशी बोलणार नाही थेट पुस्तकंच लिहील “लूजर – लाईफ ऑफ सॉफ्टवेअर इंजिनियर” नावाचं. आणि त्याच्या समस्या ऐकताना तुमच्या डोळ्यातून खरंच पाणी येईल… हसून हसून.


लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती आणि अनुक्रमणिका



दिपेन अंबालिया या एका सॉफ्टवेअर इंजिनियरने विनोदी खुसखुशीत शैलीत आयटी क्षेत्रातल्या वेगवेगळ्या पैलूंवर भाष्य केलं आहे. आयटीची-आउटसोर्सिंगची सुरुवात काही दशकांपूर्वी नाही तर कोलंबसाच्या काळातच झाली असं सांगत तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यांची गमतीदार तुलना त्याने केलीये. व्यवसाय कुठल्यही असो, “मी मरमरून काम करतोय पण मला त्याचं काही फळ नाही; त्या कमचुकाराला मात्र बढती” ही रड सगळीकडचीच. आयटीही त्याला अपवाद नाही. म्हणून जास्त मेहनत “करू नका” तर जास्त मेहनत करतोय असं “दाखवा” असा सल्ला दिपेन देतो आणि असं दिसायचं कसं याचं मार्गर्शनही करतो. मॅनेजर जवळ आला की कसा विचार करतोय असं दाखवायचं, आकृत्या काढून नवीन कल्पना डोक्यात शिजत्ये असं दाखवायचं नाहितर कहितरी कारण काढून बोलणं कसं टाळायचं इ.


मीटींग, प्रेझेंटेशन्स हा आयटीतला अविभाज्य भाग. लांबलचक चालणाऱ्या मीटींग्स, कंटाळवाणी प्रेझेंटेशन्स यातून तरून जाण्यासाठी कंटाळा घालवायचे आणि आपण लक्ष देतो आहोत असं दाखवायचे विनोदी उपायही सांगितलेत. नमुन्यादाखल हे वाचून बघा :



सॉफ्टवेअर इन्जिनिअरच्या (लेखकाच्या शब्दात : सॉफ्टीच्या) जॉबच्या पहिल्या दिवशी काय होतं तिथपासून शेवटच्या दिवशी काय होतं इथपर्यंतत नेहमी घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी लेखकाने सांगितल्या आहेत. अप्रेझल अर्थात पर्फॉर्मन्स इवॅल्युएशनच्यावेळी मॅनेजर बरोबर बातचित होताना “तू इतरांपेक्षा वेगळं काय केलं??” असा असणारा सूर १८० अंशात बदलतो जेव्हा तोच सॉफ्टी राजिनामा देतो. आणि मग याच चर्चा कशा होतात हेही लिहिलंय.


ऑनसाईट – परदेशवारी किंवा दीर्घ मुदतीचा परदेशवास – हा आयटीचा मुख्य आकर्षणबिंदू. पण हे ऑनसाईट मिळणं सोपं नाही  महाराजा. त्यामुळे असं ऑनसाईटला जाऊन आल्याने कॉलर टाईट करून वागणारे आणि ऑनसाईट कधी न गेलेले यांच्या वागण्यात कसा बदल दिसेल तेही वाचणं खूप मजेशीर आहे. उदाहरणादखल थोडं :



आयटीत छान छान सुंदर मुली असतात पण आपल्या वाट्याला त्यातली नेमकी कुणीच येत नाही या प्रकारचं गुलाबी दुःखही बऱ्याच जणांचं असतं. आणि आपल्या टीम मध्ये सुंदर मुलगी आहे पण केवळ ती सुंदर आहे; फटाकडी आहे म्हणून सगळ्या चांगल्या गोष्टी तिलाच मिळतात असलंही गुलाबी दुःख कुणाचं आहे. आकर्षक, देखणे (मुलगा किंवा मुलगी) आणि तसे नसणारे अश्या प्रकारात सॉफ्टींचं वर्गीकरण केलं तर त्यांच्या वागण्या-बोलण्या-विचार करण्यात कसा फरक दिसेल यांचं विश्लेषणही “संशोधनाअंती” लेखकाने मांडलं आहे.


“Grass is always greener on other side” या म्हणीला आयटीच्या दृष्टिकोनातून बघितलं की काय जाणवेल ? दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये शिकायची जास्त संधी आहे, दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये लोक जास्त एन्जॉय करतात, दुसऱ्या टेक्नोलॉजीला जास्त मागणी आहे इ. याच निरीक्षणातून लेखकाने सांगितले आहेत आयटीचे मनोरंजक “वैश्विक नियम”.


एकूणच काय जर तुम्ही ज्युनिअर लेव्हलचे सॉफ्टवेअर इंजिनिअर असाल किंवा सिनियर लेव्हलचे; यातले बरेच अनुभव तुम्हाला स्वतःला किंवा सहकाऱ्यांना आले असतील, आजुबाजुला दिसत असतील आणि नसतील आले तरी असं होऊ शकतं याची कल्पना तर नक्कीच करता येईल. त्यामुळे पुस्तक वाचताना ते अनुभव आठवून किंवा त्या प्रसंगाची कल्पना करून तुम्ही हसाल हे नक्की. पुस्तक विनोदी आहे, विडंबन स्वरूपातलं आहे; त्याच्याकडे तितक्याच हलक्याफुलक्या शैलीतनं बघूनच वाचलं पाहिजे. मी असं करत नाही, आमच्याकडे कोणी असं वागत नाही, आयटी क्षेत्राला बदनाम करणारं पुस्तक आहे अशी “असहिष्णुता” दाखवू नका. सर्कशीत, जत्रेत “हसरे आरसे” असतात – अंतर्गोल, बहिर्गोल आरसे. त्यात आपण कधी ढेरपोटे दिसतो, कधी चवळीच्या  शेंगेसारखे, कधी वेड्यावाकड्या तोंडचे. हे पुस्तक तसं अहे. काही गोष्टी नेहमीपेक्षा मोठ्या दिसतील काही काही नेहमीपेक्षा खूप लहान. आयटितल्या नेहमीच्या अनुभवांचा मसावि आणि वाईट अनुभवांचा लसावि.


हे पुस्तक वाचतनाच फेसबुकवर लेखक दिपेनशी फेसबुकवर संपर्क केला होता. मग फोनवर थेट बोलणंही झालं. त्यामुळे मी परीक्षण लिहिलेलं हे लागोपाठ दुसरं पुस्तक आहे जे माझ्याच वयाच्या, आयटीतल्याच तरूण लेखकांनी लिहिलं आहे आणि पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्याशी थेट बोलणं ही झालं.


हे पुस्तक मराठीत अनुवादित झालं तर ज्यांची मुलं, नातवंडं, शेजारी-पाजारी आयटीत आहेत अश्या मोठ्या वयाच्या वाचकांना देखील तरुणांच्या जगात डोकवायची संधी मिळेल असं मला वाटतं. तो पर्यंत ज्यांना इंग्रजी वाचन आवडतं त्यांनी जरूर वाचा.



————————————————————

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )

————————————————————

———————————————————————————

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

———————————————————————————-