लेखिका – सलमा (Salma)
मराठी अनुवाद – सोनाली नवांगुळ (Sonali Navangul)
मूळ पुस्तक – இரண்டாம் ஜாமங்களின் கதை ( इरंडाम् जामंगळीन् कदै)
मूळ पुस्तकाची भाषा – तमिळ
इंग्रजी अनुवाद – The hour past midnight (द अवर पास्ट मिडनाईट)
ISBN – 978-93-83850-92-1
तमिळ लेखिका सलमा ह्यांनी तामिळनाडूमधल्या मुस्लिम समाजातील महिलांच्या स्थितीवर ही कादंबरी लिहिली आहे. सोनाली नवांगुळ यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. ह्या अनुवादाला नुकताच मराठी अनुवादासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. त्यामुळे हे पुस्तक वाचायची उत्सुकता निर्माण झाली.
स्त्रीचं समाजातलं कार्यक्षेत्र म्हणजे, “फक्त चूल आणि मूल”; हा एकूणच जागतिक समज. प्रबोधनाच्या, समाजसुधारणेच्या ज्या टप्प्यावर एखादा देश, एखादा धार्मिक समाज असेल त्या टप्प्यानुसार या धारणेत कमी-अधिक शिथीलता येते. त्यानुसार मुलींना शिक्षणाचं, व्यवसायाचं, जोडीदार निवडण्याचं, कुठले कपडे घालायचे याचं, काय भाषा बोलायची, कोणाशी भेटायचं याचं स्वातंत्र्य मिळतं किंवा त्यावर नियंत्रण घातलं जातं. मुस्लिम समाज या बाबतीत अजूनही बराच मागासलेला आणि बंदिस्त आहे. या बंदीस्ततेमुळे मुसलमान स्त्रियांची जी कुचंबणा होते आणि त्यातून शारीरिक, मानसिक व लैंगिक भावनांचा जो विस्फोट होतो त्याचं समाजचित्र एक मुस्लीम महिलाच आपल्या समोर उभं करत आहे.
मुलगी वयात आली की तिने घराबाहेर पाऊल ठेवायला बंदी. सगळ्या वस्त्रांमध्ये लपेटून घरच्या लोकांबरोबरच अगदी जवळपासच्या घरी किंवा नातेवाईकांकडे फक्त येणंजाणं. लग्न सुद्धा नात्यागोत्यातच. साटंलोटं. चुलत भावाशी, मावस भावाशी लग्न. मुलीच्या जन्मापासूनच किंवा मुलगी लहान असतानाच मोठ्या माणसांनी ठरवायचं की माझी मुलगी माझ्या बहिणीच्या मुलाला किंवा माझ्या भावाच्या मुलाला देणार. पुढे ती मुलगी किंवा तो मुलगा कसे निघतात; त्यांची एकमेकांची आवड निवड ह्याचा काही संबंध नाही. कारण लग्न आवडी-निवडी साठी नाही तर पुरुषाच्या सुखासाठी आणि मुलं पैदा करण्यासाठी आहे एवढंच ! लग्न आपल्या आपल्यातच झालं तर संपत्ती, पैसा त्याची फाटाफूट होणार नाही. ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात असंच होत राहील.
एका मर्तिकाच्या प्रसंगाच्या वेळी भेटलेल्या बायका एकमेकींशी गप्पा मारतायत. पण विषय नेहमीचाच “विषयवासनांचा”.
पुस्तक ५६१ पानी आहे. प्रसंगांमगून प्रसंग येत असतात. पण ह्यात कथासूत्र नसल्यामुळे एक विस्कळीतपणा जाणवतो. पुढे काय घडतंय हे वाचायची उत्सुकता जाणवत नाही. जरा रेटत रेटतच वाचावं लागतं. जास्तीत जास्त प्रकारच्या समस्या मांडता यावयात ह्यासाठी 3-4 कुटुंबात सगळ्या समस्या दाखवल्या आहेत. एकही सरळमार्गी कुटुंब नाही, एकही व्यक्ती शुद्ध चारित्र्याची वाटत नाही; हे जरा अतीच होतं. पुस्तक बरंच लांबलंय त्यामुळे काही तपशील गाळून पुढे वाचावं लागतं नाहीतर कंटाळा येतो.
मूळ पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचा हा मराठी अनुवाद आहे. अनुवाद छान, सरळ आणि ओघवता झाला आहे. पुस्तकाचा आशय तितक्याच ताकदीने मराठीत आणला आहे . पण इंग्रजी भाषांतरात काही तमिळ शब्द तसेच ठेवले असतील ते मराठीत आणताना मात्र भयानक चुका झाल्या आहेत. मला स्वतः ला प्राथमिक तमिळ लिहिता-वाचता-बोलता येतं (मला तमिळ बोलताना ह्या व्हिडिओत बघू शकाल https://www.youtube.com/watch?v=hNTuNy-AgMk ) त्यामुळे तमिळ शब्द आला आला की माझी उत्सुकता चाळवायची आणि बरेच घोळ दिसायचे.
तमिळ शब्द -பாவாடை इंग्रजीत – pavadai पुस्तकात – पावादाई. योग्य लेखन “पावाडै”
पुस्तकात एक उल्लेख सारखा येतो. “उपास सोडण्यासाठी मशिदीतून निंबू-कांजी आणली”. हा काय प्रकार आहे कळलं नाही. तमिळ मध्ये निंबू म्हणत नाहीत. मग नेट वर शोधल्यावर कळलं की तो நோன்பு கஞ்சி नोन्बु कंजी असा शब्द आहे. नोन्बु म्हणजे उपास. तर कंजी हा दाल-खिचडी सारखा पदार्थ आहे.
एखाद्या मुलीशी बोलताना आपण “काय गं” ,”कुठे गं” असं म्हणतो म्हणजे. शब्दाला “गं” जोडतो तर मुलासाठी आपण “रे” जोडतो “काय रे”, “कुठे रे”. तसं तमिळ मध्ये मुलीसाठी “मा” जोडतात, मोठ्या पुरुषासाठी “पा” तर मुलासाठी “डा” जोडतात.
“एन्नम्मा”, “एन्नडा”, “एन्नप्पा” असे शब्द तयार होतात. पण पुस्तकात मराठीत लिहिताना ते अम्मा ,अप्पा असं लिहिलंय. तमिळ मध्ये अम्मा म्हणजे आई तर अप्पा म्हणजे वडील. त्यामुळे अर्थाची वाट लागते. तमिळ मधले नातेवाचक शब्द उदा. पेरियम्मा, चित्ती इ. शब्द तसेच ठेवलेत(तेही चुकीच्या उच्चारात). पण त्यामुळे मराठी वाचकाला दोन पत्रांमधलं नातं काय हे समजत नाही. गोंधळ होतो. तमिळ शब्द पहिल्यांदा वापरला तिथे तळटीप द्यायला हवी होती अथवा “मावशी, काकू” असे सरळ मराठी शब्द वापरायचे.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–