पुस्तक – मनशक्ती बालकुमार दिवाळी अंक २०२६ (Manashakti Balkumar Diwali Edition 2026)
संपादक – श्रीहरी कानपिळे, वर्षा तोडमल, दीपक आलुरकर (Shrihari Kanpile, Varsha Todmal, Deepak Alurkar)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – ९०
छापील किंमत – रु. १५०/-
मनशक्ती बालकुमार दिवाळी अंक २०२६ मला वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल वर्षा तोडमल ह्यांचे मनःपूर्वक आभार.
हा दिवाळी अंक हातात घेल्यावर मुखपृष्ठापासूनच हा अंक आवडायला सुरुवात झाली. एक सहज गमतीदार चित्र. ते शि.द. फडणीस ह्यांचं आहे हेही शैलीवरून लक्षात येतं. वयाच्या १०१ व्या वर्षी कार्यरत असणारे आणि विनोदबुद्धी तल्लख असणारे शि.द. फडणीस ह्यांना मनोमन वंदन करून पुढे अंक चाळून बघितला. भरपूर रंगीत, मोठमोठी अर्कचित्रं असणारा देखणा अंक आहे. पुढची अर्कचित्र/व्यंगचित्र बघतानाही नाव लगेच ओळखू येतं.. लोकसत्तात लेखानुरूप चित्र रेखाटणारे निलेश जाधव. ती चित्रंही मोहक आहेत. अजून प्रसिद्ध चित्रकार/व्यंगचित्रकार ह्यांनी पानोपान सजवले आहे, रंगवले आहे. मग अनुक्रमणिका बघितली. कथा, कविता, लेख, अनुवाद, उपक्रम असे बरेच विभाग आहेत. आणि तिथेही प्रसिद्ध लेखक, कवी, अनुवादक ह्यांची नावं बघून खूप अप्रूप वाटलं. व्यंकटेश माडगूळकर, द.मा. मिरासदार, श्रीकांत बोजेवार, नंदू मुलमुले, रवींद्र गुर्जर, अरुण ढेरे, दासू वैद्य, द. दि. पुंडे… किती नावं लिहू तुम्हीच अनुक्रमणिका बघा. इतक्या सर्वांनी मुलांसाठी, बाल-कुमार वयोगटाला आवडेल असंही लेखन केलं आहे हे बघून सुखद आश्चर्य वाटलं.


चातुर्यकथा, विनोदकथा, भावकथा अशा वेगेवेगळ्या प्रकारच्या रंजक गोष्टी आहेत.
सध्याच्या स्पर्धेच्या जगात, निकालाची – पाहिलं येण्याची आस प्रत्येकाला असते. ज्या विषयात स्पर्धा आहे त्या विषयाचा आनंद घेणं राहून जातं. त्या दोन्हीचा तोल संभाळला पाहिजे हे नंदू मुलमुले ह्यांनी लेखात समजावून सांगितलं आहे. “अटेन्शन स्पॅन” कमी होतोय ही तक्रार आता प्रत्येकाच्या तोंडी असते. लहान मुलांना ह्या समस्येतून वेळीच बाहेर काढण्यासाठी छोटे छोटे उपाय सांगणारा लेखही उपयुक्त आहे. अजूनही वाचनीय लेख ह्या विभागात आहेत.
अनुवादित कथांमध्ये इंग्रजी, बंगाली, कोकणी, तमिळ , फ्रेंच अशा भाषांमधल्या गोष्टींचे प्रसिद्ध अनुवादकांनी मराठीत केलेले अनुवाद आहेत. भाषा दुसरी, समाज वेगळा असला तरी मूळ मानवी भावभावना सगळीकडे सारख्याच असतात ही जाणीव मुलांच्या मनात वाढीस लागावी ही दृष्टी त्यामागे आहे. रवींद्रनाथ ठाकूर, मार्क ट्वेन, ऑस्कर वाईल्ड अशा दिग्गजांच्या मूळ साहित्यकृती आहेत. मुलं ह्या गोष्टी, गोष्टी म्हणूनच वाचतील पण भविष्यात त्यांच्या लक्षात येईल की किती उत्तम जागतिक साहित्य आपल्याला मराठीत वाचायला मिळालं होतं.
भाषेचे खेळ, सोपे वैज्ञानिक खेळ, गमतीदार कविता आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या खेळाडूंच्या संघर्षावरचा प्रेरणादायी लेख असं बरंच काय काय मासिकात आहे.
आता काही पाने उदाहरणादाखल.
चातुर्यकथा

असा हा अथपासून इतिपर्यंत आकर्षक, वाचनीय, संस्कार करणारा, विचार प्रवृत्त करणारा अंक आहे. मुलांनाच काय, मोठ्यांनाही आवडेल असा आहे. मी पुतण्याला वाचून दाखवताना आधी शि. द. फडणीस कोण आहेत हे सांगितलं, त्यांची व्यंगचित्र बघून दोघे हसलो. रवींद्रनाथ ठाकूर म्हणजे कोण, आणि त्यांच्या गोष्टीत नद्या आणि नौका का दिसतायत कारण बंगाल मधला भूगोल तसा आहे, हे सांगता आलं. त्यामुळे तुमच्या घरातल्या बाल-कुमारांसाठी नक्की विकत घ्या. त्यांना वाचायला सांगा. जमल्यास त्यांच्याबरोबर वाचा म्हणजे कथेतल्या मजकूरामागचा भाव त्यांच्यापर्यंत पोचवता येईल.

मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. हे माझं ३७८वं पुस्तक परीक्षण. मी परीक्षणे लिहिलेल्या पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link






