पुस्तक – मंत्रावेगळा (Mantravegala)

लेखक – ना. सं. इनामदार  (Na. S. Inamdar)

भाषा – मराठी (Marathi)

ISBN – दिलेला नाही

पाने – ५५९

छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेल्या हिंदवी स्वराज्याच्या बीजाचे एका महावृक्षात रूपांतर पेशवाईच्या काळात झाले आणि तो वृक्ष वठला सुद्धा पेशवाईच्या काळात. दुर्दैवी योगायोग हा की जे “बाजीराव” नाव साम्राज्याच्या  विस्ताराशी जोडले गेले तेच “बाजीराव” नाव त्याच्या शेवटाशी सुद्धा जोडले गेले. ज्यांच्या काळात पेशवाईचा अंत झाला त्या दुसरे बाजीराव पेशवे यांच्या बद्दल वेगवेगळ्या कथा, वदंता प्रसिद्ध आहेत. पेशव्याच्या रंगेल स्वभावामुळे, भित्रेपणामुळे राज्य नष्ट झाले असा समज रूढ आहे म्हणूनच “पळपुटा बाजीराव” असं नामाभिधान रूढ झालंय. पण ना. सं. इनामदार यांनी केलेल्या संशोधनामध्ये त्यांना असे आढळले की बाजीराव पळपुटे नव्हते. उलट त्यांनी त्याला जमेल त्या सामर्थ्यानिशी इंग्रजांचा प्रतिकार नक्कीच केला. परिस्थितीच अशी होती की मराठी राज्य उतरणीला लागले होते. पेशवे घराण्यातला गादीचा संघर्ष, पेशवे वि. कारभारी असा संघर्ष, सरदारांमधली स्पर्धा अशा नाना कारणांनी एकूण परिस्थितीची वाटचाल अटळ शेवटाकडे होत होती. तो शेवट दुसर्‍या बाजीरावाचे नशिबात होता इतकंच. लेखकाने दीर्घ प्रस्तावना लिहून आपली भूमिका आणि संशोधन मांडले आहे. त्यातली ही दोन पाने वाचा.

(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)

दुसऱ्या बाजीरावांच्या इंग्रजांविरुद्धच्या संघर्षातील शेवटच्या काही वर्षांत चित्रण या कादंबरीत लेखकाने केले आहे. बाजीराव पेशव्यांची बाजू आपल्यासमोर यावी; ते कशा प्रसंगातून गेले असतील; मराठी दौलत वाचवायची अखेरची धडपड कशी केली असेल असेल याचं मनोज्ञ वर्णन या कादंबरीत आहे.

कादंबरीच्या सुरुवातीच्या भागात त्यावेळचं भरलेलं, बहरलेलं पुणे शहर; त्यात होणारे सण-उत्सव, नाचगाण्याचे कार्यक्रम, पेशव्यांचा लवाजमा यांचं वर्णन प्रसंगोपात येतं. यातून एका समृद्ध राज्याची कल्पना येते.

पण पुढच्या प्रसंगातून हळूहळू कळायला लागतं की वरून सगळं छान दिसत असलं तरी खरी परिस्थिती तशी नाही. इंग्रजांचा हस्तक्षेप पेशव्यांच्या गादीपर्यंत पोहोचलेला आहे. याआधी झालेले राजकारण, इंग्रजांची घेतलेली मदत आणि त्यातून झालेला इंग्रजांचा चंचुप्रवेश आता मराठी साम्राज्याच्या गळ्याभोवतीचा फास झाला आहे. बाजीराव त्यातून सुटण्यासाठी धडपड करण्याच्या  तयारीत आहेत. 

पेशवा आता नाच-गाण्यात रंगला आहे, लढाईला घाबरतो; मराठी लोक आता जणू लढणं विसरले आहेत असा समज इंग्रजांचा व्हावा असा प्रयत्न एकीकडे चालू आहे. तर दुसरीकडे जुन्या सरदारांचे रुसवे-फुगवे काढून त्यांना युद्धाची तयारी करायला लावण्याची कसरत दुसरीकडे. त्यावेळी गादीवर असलेल्या छत्रपतींवर सुद्धा इंग्रज वकीलांचा इंग्रजांचा प्रभाव होतात आणि दरबारी राजकारणात पेशव्यांचा दुस्वास करणारे लोकही होते हे त्रांगडे तिसरीकडे. अशा पेचातून बाजीराव मार्ग काढत आहेत.

सरदारांना पुन्हा सैन्यौभरणीचं आवाहन करणारा हा एक प्रसंग.

इंग्रजसुद्धा गाफील नाहीतच. मराठा साम्राज्यातील सगळे राजकारण आपल्या कलेने चालावं यासाठी वरून मैत्रीचा आव आणत आतून फंदफितुरला प्रोत्साहन देणं चालू होतं. कधी पेशव्यांशी गोड बोलून, तर कधी करारमदारात अडकवून इंग्रज फास आवळीत आवळीत होता. हे राजकारण हळूहळू कसं आकार घेतं ते कादंबरीत थोडं उलगडून दाखवलं आहे.

इंग्रज प्रतिनिधी आणि पेशवे यांच्यातला हा नमुनेदार संवाद

कादंबरीचा तिसऱ्या भागात प्रत्यक्ष लढाईला तोंड फुटतं. पुण्यातून बाहेर पडून कधी इंग्रजांशी लढाई करत, कधी इंग्रजांवर छापे मारत, कधी त्यांच्यापासून पळत असा मराठी सैन्याचा संघर्ष सुरू होतो. प्रत्यक्ष पेशवे, त्यांचं कुटुंब, सरदार कुटुंब, सैन्य, छावण्या जणू फिरती राजधानीच. कुठल्याही लढाईत होतं त्याप्रमाणे हार-जीत होत असते. पारडी वर-खाली होत असतात. पेशवाईच्या अंताकडे वाटचाल चालू आहे हे आपल्याला माहिती असेल तरी प्रत्येक पानागणिक आपल्यालाही वाटतं या लढाईचा निर्णय आपल्या बाजूला लागेल. हे असं होईल; तसं होईल. आपणही त्या वर्णनात गुंगून जातो.

या सगळ्या परिस्थितून जाताना पेशव्यांच्या मनाची काय घालमेल झाली असेल!  किती ताण-तणाव आले असतील ! आशा-निराशेच्या या खेळात आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर पेशवे मन मोकळं करताना काय सांगत असतील?  त्यांच्या लहानपणी घडलेले कटू प्रसंग, नाना फडणविसांबरोबर झालेला संघर्ष, त्यातून त्यांच्या आयुष्याला आकार याची थोडीशी झलक आपल्याला दिसते.

अगदी शेवटच्या लढाईत जंगलात वणवण भटकायला लागल्यावर बाजीराव आणि त्यांच्या पत्नीमधला हा संवाद

असे प्रसंग कादंबरीत पुन्हापुन्हा येतात. खऱ्या लढाई सारखीच नायकाची मानसिक पातळीवर चाललेली लढाई हा खरा या कादंबरीचा गाभा आहे.

अशी ही साडे पाचशे पानांची भलीमोठी कादंबरी आहे. काही वेळा तेच तेच प्रसंग पुन्हा पुन्हा येतायत असं वाटतं. युद्धासुद्धा सारखा रोमहर्षक विषय असला तरी कादंबरी मात्र अजिबात रोमहर्षक होत नाही. दरबारी राजकारणात सारखा चकवा देणारा विषय असला तरी त्या डावपेचांची रंगत कादंबरीत उतरत नाही. कादंबरी अतिशय संथपणे जात राहते. वाचताना पुढे काय होणार याची उत्सुकता लागत नाही. 

दुसरी गोष्ट म्हणजे आधी घडलेल्या घटनांचे बरेच संदर्भ पुस्तकात येतात उदाहरणार्थ त्र्यंबकजी डेंगळे यांना इंग्रजांनी केलेली कैद, नाना फडणवीसांनी बाजीरावांना लहानपणी कैदेत ठेवले होते होते, इंग्रजांनी बाजीरावांना पेशवे पद मिळवून देण्यात मदत केली, बाजीराव विरुद्ध होळकर व काही सरदार अशा लढाया झाल्या होत्या. या सगळ्या घटना नीट माहिती नसतील तर कादंबरीत येणारे प्रसंग समजत नाहीत. म्हणून ह्या विषयावरचं एखादं ऐतिहासिक पुस्तक वाचलं तर या कादंबरीशी जास्त जोडून घेता येईल. 
साडेपाचशे पानांचं पुस्तक वाचल्यावर खूप माहिती किंवा ज्ञान मिळालं असं वाटलं नाही. एक महान कलाकृती वाचल्याचं समाधान मिळालं असही झालं नाही. म्हणून मला असं वाटलं की या पुस्तकाची नवीन संक्षिप्त आवृत्ती काढली पाहिजे. ज्यात कादंबरीतल्या काही प्रसंगांना, वर्णनाला थोडी कात्री लावायची आणि त्याऐवजी पुढचे मागचे संदर्भ माहिती म्हणून द्यायचे.
ज्यांनी दुसऱ्या बाजीरावांचा हा इतिहास वाचला नसेल त्यांना या विषयाची थोडी तोंडओळख होईल. ज्यांना इतिहास माहीत असेल त्यांना ह्या ऐतिहासिक नायकाच्या मनात डोकावण्याची संधी मिळेल. थोडं भराभर वाचत वाचत ही मोठी कादंबरी वाचायला हरकत नाही.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या वेबसाईट्स आहेत. मी या ब्लॉग मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/