मराठी भाषेतही वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या कालखंडात ही नाटके भाषांतरित केलेली आहेत. पण आता त्या भाषांतरित पुस्तकांमधली मराठी भाषा सुद्धा थोडी जुन्या वळणाची, कदाचित क्लिष्ट वाटू शकेल. त्यामुळे आजच्या मराठीत, सोप्या मराठीत शेक्सपियरचे साहित्य भाषांतरित झाले तर ती मराठी वाचकांसाठी आनंदाची बाबच आहे.
२३ एप्रिल हा शेक्सपियर चा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस. म्हणूनच तो जागतिक पुस्तक दिवस म्हणूनही साजरा केला जातो. यावर्षी(२०२६) मध्ये २३ एप्रिल च्या मुहूर्तावर वैशाली प्रकाशनने शेक्सपियरच्या सहा नाटकांची आजच्या आणि सोप्या मराठीत नव्याने भाषांतरे प्रकाशित केली आहेत. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि तेव्हा ती सहाही पुस्तके विकत घेतली. त्यातली दोन वाचून झाली. त्याबद्दल आता लिहितो. सुरुवातीलाच स्पष्ट करतो की, नेहमीप्रमाणे हे माझे पुस्तक परीक्षण नाही; तर नव्याने आलेल्या पुस्तकांची माहिती आणि मी ती वाचली याची वाचन नोंद आहे.
“मर्चंट ऑफ व्हेनिस” या नाटकात एक ज्यू सावकार, एक ख्रिश्चन व्यापारी, व्यापाऱ्याचा मित्र आणि मित्राची प्रेयसी अशी पात्रे आहेत. ज्यू सावकार – शायलॉक – आपल्या धंद्यात पक्का आहे. दिलेले कर्ज वसूल करण्यात तो वाकबगार आहे. कर्ज फेडू न शकणाऱ्यांकडून कसंही करून तो पैसा मिळवतोच. त्यामुळे लोकांचं त्याच्याबद्दलचं मत, तो एक दुष्ट,लोभी, पाषाणहृदयी माणूस आहे, असं झालं तर नवल नाही.
या उलट ख्रिश्चन व्यापारी – अँटोनियो – लोकांना बिनव्याजी कर्ज देतो. सावकाराची कर्ज फेडायला मदत करत असतो. त्यामुळे शायलॉक अँटोनीयोवर डूख धरून आहे.
पुढे परिस्थिती अशी होते की अँटोनियो मित्रासाठी शायलॉक कडून कर्ज घेतो. कर्ज फेडलं नाही तर अँटोनियोला भयंकर शिक्षा होईल अशा शर्ती ठरतात. मित्राला ते कर्ज फेडणं का शक्य होत नाही, त्या भयानक अटी काय असतात आणि त्या भयानक अटींपासून त्याची सुटका कशी होते हे सगळं नाट्य म्हणजे “मर्चंट ऑफ व्हेनिस”.
काही पाने उदाहरणादाखल
मित्राची प्रेयसी पोर्शिया या पात्राच्या स्वयंवराच्या वेळचा पण आणि मोरोक्कोच्या राजपुत्राचा त्याला प्रतिसाद.

कर्ज वेळेत फेडू न शकल्याने ठरवलेली जीवघेणी शिक्षा अँटोनियोला मिळालीच पाहिजे यासाठी हट्टाला पेटलेल्या शायलॉकचे संवाद.


दुसरं नाटक मी वाचलं ते “मॅकबेथ”. स्कॉटिश राजा डंकनचा सरदार मॅकबेथ. मॅकबेज अतिशय शूरवीर धडाडीचा आणि डंकनचा विश्वासू सरदार. पण आपल्या बायकोच्या हट्टाला बळी पडून तो डंकनचा स्वतःच्या घरी खून करतो. स्वतः राजा बनतो. डंकनची मुले परागंदा होतात. इतर सरदारांचेही खून घडवले जातात. राज्यात असंतोषाचे वातावरण पसरतं. अराजक निर्माण होतं. मॅकबेथ आणि त्याची पत्नी कपटाने मिळवलेलं यश मनापासून उपभोग होऊ शकत नाहीत. आपल्या अपराधाची टोचणी त्यांच्या मनात सतत सलत असते. जुन्या राजाशी प्रामाणिक सरदार मॅकबेथविरुद्ध उठाव करायचं ठरवतात. शौर्य, विश्वासघात, पश्चाताप, महत्वकांक्षा, बंड, राजनिष्ठा या सगळ्याचं नाट्य म्हणजे “मॅकबेथ”.
काही पाने उदाहरणादाखल.
मॅकबेथ नाटकातल्या प्रसिद्ध चेटकिणींची गुरु हेकेट चा संवाद

खून केल्यानंतर मॅकबेथ आणि त्याच्या बायको मधला संवाद


वरच्या दोन परिच्छेदात मी थोडक्यात कथानक सांगितले आहे. पण या ढोबळ कथानका पलीकडे प्रत्येक पात्र, त्याची वैचारिक व मानसिक भूमिका, त्यांचे संघर्ष हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे. गेली चारशे वर्ष हजारोंनी साहित्यप्रेमी साहित्यअभ्यासक शेक्सपियरच्या साहित्याचा अभ्यास करतायत, प्रबंध लिहितायत, पीएचडी करतायत. त्यामुळे मी त्यावर नव्याने स्वतंत्रपणे काही लिहावं इतका माझा अभ्यास नाही.
दोन्ही अनुवादकांनी उत्तम अनुवाद केला आहे. मुळातच ही नाटके आहेत त्यामुळे भाषा थोडी नाटकी असणारच. तिचं मराठीकरण करताना तो नाटकीपणा, औपचारिकपणा मराठीत येणं ही स्वाभाविक आहे. मूळ नाटकातली भाषा पद्य स्वरूपाकडे झुकणारी आहे. पण इथे तसा तंतोतंत अनुवाद, यमक जुळवत पद्य स्वरूपातला अनुवाद न करता थेट गद्य स्वरूपातच संवाद आहेत. त्यामुळेच ते वाचायला आणि कथानक समजून घ्यायला सोपं आहे.
दोन्ही पुस्तकांच्या प्रस्तावनेत अनुवादक शिरीष सहस्त्रबुद्धे यांनी नाटकातल्या प्रतिमा, पत्रांच्या वर्तनातले ताणेबाणे, शेक्सपियरची शैली याबद्दल थोडक्यात निरीक्षणे मांडली आहेत. त्या दोन्ही प्रस्तावना वाचनीय आहेत.
शेक्सपियरच्या साहित्याबद्दल उत्सुकता असणाऱ्या पण मूळ इंग्रजी वाचू न शकणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने अवश्य वाचावं अशी ही दोन पुस्तके आहेत.
मी दिलेली पुस्तक श्रेणी
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
अजून पुस्तक परीक्षणे
हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या सुमारे साडेतीनशे पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या
देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!
मी एक भाषा प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी ३ ट्युटोरियल्स चालवत आहे – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती शिकत आहेत.
या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात भाषा शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.
माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा
https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/
–
गंमत चिनी भाषेची मराठीतून
२०२० पासून मी चिनी भाषा (मॅण्डरीन) भाषा शिकतो आहे. HSK Level ३ परीक्षा मी ९३% नी उत्तीर्ण झालो. इंग्रजी भाषेतून चिनी भाषा शिकवणाऱ्या बऱ्याच वेबसाईट्स आणि युट्युब चॅनल्स आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हायची असेल तर जगातल्या कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान मराठीतून मिळवता आलं पाहिजे. म्हणजेच परदेशी भाषा शिकण्याची सोय मराठीतून उपलब्ध असली पाहिजे. त्यामुळे ते शिकणं सुद्धा खूप सोपं होतं. म्हणून “गंमत चिनी भाषेची मराठीतून” ही युट्युब व्हिडीओ मालिका मी सुरु केली आहे. त्यात मी चिनी भाषेच्या गमतीजमती सांगतो. तसेच मराठीतून चिनी भाषा शिकवायलासुद्धा सुरुवात केली आहे.
YouTube playlist link




