पुस्तक : नर्मदा परिक्रमा एक आनंदयात्रा (Narmada Parikrama Ek Anandayatra)

लेखक : उदयन्‌ आचार्य (Udayan Acharya)

भाषा : मराठी (Marathi)

पाने : ३२४

ISBN : 978-81-937187-4-2


नर्मदा नदी भारताच्या मध्यभागातून वाहणारी महत्त्वाची नदी आहे. मध्यप्रदेशातल्या अमरकंटक जवळ उगम पावून पश्चिम दिशेला वाहत गुजराथ मध्ये भरूच जवळ समुद्राला मिळते. म.प्र. आणि गुजराथेतून मुख्यत्वे वाहताना थोडासा भाग महाराष्ट्रातूनही जातो. खूप मोठ्या भूभागावरच्या मानवी संस्कृतीचा आणि निसर्गाचा आधार ही नदी आहे. सर्वांभूती देव मानणाऱ्या, निसर्गाशी सानुकूल जीवनशैली आणि निसर्गतत्वांबद्दल कृतज्ञता शिकवणाऱ्या भारतीय संस्कृतीत नद्यांना लोकमाता, देवतास्वरूप मानून त्या वंदनीय, पूजनीय आहेत. त्यातही सात महत्त्वाच्या नद्या विशेष पवित्र मानल्या आहेत. 


नर्मदा ही अशी देवतास्वरूप नदी. एखादी देवता म्हटली की तिचे रूप, किती हातांची मूर्ती, वाहन, त्या अनुषंगाने कथा, पुराणे, चमत्कार, आवडते रंग, पदार्थ, उत्सव, उपासना, व्रतवैकल्यं ही सगळी परिसंस्था आपली लोकसंस्कृती निर्माण करते. नर्मदेच्याबाबतीतही हे सगळं आहे. मगर हे तिचं वाहन आहे. ती कुमारिका आहे. नर्मदेची परिक्रमा करणं हा तिच्या उपासनेचा भाग आहे. नर्मदेच्या काठावरून चालायला सुरुवात करायची आणि नदी उजवीकडे ठेवून चालत राहायचं. कुठे नदी ओलांडायची नाही. जिथे समुद्राला मिळते तिथे बोटीतून समुद्रातून जाऊन दुसऱ्या काठावर जायचं आणि चालणं सुरू ठेवायचं. आणि चालायला जिथून सुरुवात केली तिथे पुन्हा पोचून प्रदक्षिणा पूर्ण करायची असं परिक्रमेचं स्वरूप आहे. नर्मदेच्या काठावर अनेक तीर्थस्थळं आहेत, अनेक महान ऋषिमुनींनी, साधूसंतांनी तिच्या काठावर तपश्चर्या केली असल्याने अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्यांना या नदीकाठाचं आणि परिक्रमेचं विशेष महत्त्व आहे. इतकं चालणं हेही मोठंच काम आहेच आणि त्यातही अध्यात्ममार्गावर प्रगतीसाठी, एखाद्या तपश्चर्येप्रमाणे ही परिक्रमा करतात. नेहमीच्या तीर्थयात्रेप्रमाणे स्वतःच्या पैशातून, सुखसोयींनी युक्त अशी यात्रा न करता संन्याशाप्रमाणे रहायचे, जिथे मिळेल तिथे राहायचे, जे लोक देतील ते खायाचे आणि सर्व वेळ नामस्मरण, पूजाअर्चा यात घालवायचा असे हे खडतर व्रत आहे. हजारो वर्षांपासून भारतातले साधक हे व्रत करत आले आहेत. या पुस्तकाचे लेखक उदयन आचार्य यांनी अशी परिक्रमा केली आणि तिचे अनुभव आपल्याला सांगितले आहेत.


परिक्रमेच्या वेळी नर्मदेची आणि निसर्गाची दिसणारी निरनिराळी रूपं, लेखकाला अध्यात्मिक येणारे अनुभव आणि आजूबाजूच्या लोकसंस्कृतीचं दर्शन अशा तीन पातळींवर ही अनुभव गाथा पुढे जाते.


सुरुवातीला लोकसंस्कृतीबद्दल बोलूया. वाचताना आपल्याला दिसते की परिक्रमेच्या मार्गावरच्या सर्व गाव व शहरांत परिक्रमावासींचे आदरातिथ्य करायची संस्कृती रुजलेली आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी या परिक्रमावासींचे छान आदरातिथ्य होते. “महाराज आसन लगाओ” म्हणत स्वागत होते. आणि यजमानाच्या सोयीनुसार खिचडी, डाळ, टिक्कड, गोड पदार्थ असा प्रसाद दिला जातो. उपास असेल तर खिचडी, बटाटे, चिवडा यांची सोय होते. वाटेतले दुकानदार प्रेमाने चहा पाजतात, खाण्यापिण्याचे पदार्थ देतात. वेगवेगळ्या मठांमधून राहण्या-जेवण्याची सोय होते. विशेष म्हणजे जेव्हा वाट अगदी खेड्यापाड्यातून जाते तेव्हा गरीब लोकही आपल्या तुटपुंज्या उत्पन्नातून जमेल तशी सेवा करतात. प्रसंगी स्वतः उपाशी राहून परिक्रमावासींना खायला घालतात. तेही इतक्या आनंदाने, सहजतेने की आपण दिङ्‍मूढ होऊन जातो. असे कितितरी रोमांचक अनुभव यात आहेत.


नर्मदेची नाना तीर्थस्थळे, विशाल पात्रं, हजार छोट्या प्रवाहातून वाहणारे रूप, कुठे निर्मळ पाणी, तर कुठे खडकाळ किनारा अशी रूपे जाता जाता दिसतात. पण यांचं वर्णन खूप सविस्तर नाही. उदयन आचार्य हे काही व्यावसायिक लेखक नसल्यामुळे तसा साहित्यिक ढंग किंवा चित्रमय शैली असा प्रकार नाही. ओझरते उल्लेख होतात इतकेच.

उदा. अस्वलं वाटेत आडवी येतात तो क्षण

(फोटोवर क्लिक करून झूम करून वाचा)



ही सगळी परिक्रमा हे पर्यटन नसल्यामुळे पहिले दोन मुद्दे तसे गौण आहेत तर अध्यात्मिक अनुभव हा मुख्य गाभा आहे. त्या अनुभवांची इथे रेलचेल आहे. दृष्टांत होणे, स्वप्नात दर्शन घडणे, मनात एखादी इच्छा आली की ती लगेच पूर्ण होणे, एखादी व्यक्ती काहितरी सांगून जाते आणि नंतर तिची प्रचिती येणे असे अनुभव पानोपानी भरलेले आहेत. परिक्रमेच्या आधी एकाने त्यांच्याकडे येताना शिवलिंग आणायला सांगितलेलं असतं आणि एका मठात एक साधू महाराज आपणहून त्यांना शिवलिंग देतात, कुणीही न सांगता. एकदा एक साधू महाराज त्यांच्या स्वप्नात येतात. आधी कधीही न पाहिलेले साधू महाराज. ते कोण, काय, काही कळत नाही. आणि दुसऱ्या दिवशी लेखक अनायसे एका मंदिरात पोचतात तर तिथल्या साधूंची मुर्ती अगदी तशीच. जणू काही या साधूंनीच लेखकाला खेचून आणलं. प्रवासात त्यांची स्लीपिंग बॅग खराब होते. बरेच दिवसांनी एका मठात एक आंधळे साधूबाबा जणूकाही अंतर्ज्ञानाने ते ओळखून आपल्या शिष्याकरवी नवीन बॅग पाठवतात. हे सगळे बाह्यानुभव वाचणं कोड्यात टाकणारं आहे. एखाददुसरा अनुभव असता तर फक्त योगायोग म्हणून सोडून देता आलं असतं पण पुन्हा पुन्हा आलेले अनुभव पाहून हे काहितरी वेगळंच आहे हे जाणवतं.

उदा. एका मनकवाड्या साधूचा आलेला अनुभव


या बाह्य अनुभवाप्रमाणेच लेखकाने आपल्या मनात येणाऱ्या भावभावना आणि विकल्प यांचे अगदी प्रामाणिक वर्णन केले आहे. मी खूप मोठा कोणी आहे असा बिलकुल अभिनिवेश ते बाळगत नाहीत. उलट आपण अध्यात्माक्षेत्रात अगदी पहिल्या पायरीवर आहोत, आपले सद्गुरू आणि नर्मदामैया यांच्या कृपेने आपण हे शिवधनुष्य पेलत आहोत हा नम्रभाव पूर्ण पुस्तकभर आहे. जर त्या दिवशी काही चांगलं घडलं, मनात एखादी इच्छा आली आणि ती लगेच पूर्ण झाली की माई तू किती प्रेमळ आहेस, भक्तांचे कसे लाड पुरवते आहेस असा प्रेमळ भाव आहे. कधी खायला नाही मिळाले, राहायची गैरव्यवस्था झाली, अपवादात्मकच पण अपमान झाला तर, माई तू माझी परीक्षा बघते आहेस असा भाव आहे. काहीवेळा खाण्याची, राहण्याची उत्तम व्यवस्था उत्तम झाली की जरा अजून खावं, तिथेच अजून रेंगाळावं असे भाव मनात आले की उदयनजी कातर होतात. मन या सुखासीनतेपासून अजून दूर जात नाहीत, वैराग्यभाव अजूनही पूर्ण जागृत होत नाही म्हणून व्याकूळ होतात. देवीची प्रार्थना करतात. कधी कुणावर चकून रागावले, वेडावाकडा शब्द गेला की अजूनही “अचपळ मन माझे नावरे आवरीता” ही भावना त्यांना उदास करते. त्यांच्या आईची आठवणही त्यांना व्याकूळ करते. साधकाला समस्थिती, स्थितप्रज्ञत्वतेकडे नेण्यासाठी ही परिक्रमा फलदायी कशी ठरत असेल हे आपल्याला यातून कळतं.

उदा. आइस्क्रिम खायला मिळालं तो प्रसंग


पुस्तकात ८ पाने रंगीत फोटो ही आहेत तीर्थस्थळांचे.


तीनशे पानी पुस्तकातून आपणही उदयनजींबरोबर परिक्रमा करतो. पुस्तकाची भाषाही सहज संवादी आहे. पुस्तकाचे स्वरूप रोजनिशीप्रमाणे आहे. त्यामुळे कुठे जेवलो, काय जेवलो, कुठे आंघोळ केली, काय नामस्मरण केलं, कोणाकडे  जेवलो, जेवणात काय काय होतं, वाटेत काय खाल्लं इ. सगळे तपशील दिलेले आहे. यातला काही भाग कापून, द्विरुक्ती टाळून किंवा पुन्हापुन्हा येणारे जेवण्या-राहण्याचे संदर्भ टाळता आले असते तर जास्त रोचक झालं असतं. हे प्रवासवर्णन नाही तरी परिसरवर्णन थोडं वाढवलं असतं तर पुस्तक अजून माहितीपूर्ण झालं असतं.


लेखक, प्रकाशक – मोरया प्रकाशन आणि ज्यांच्या हस्ते प्रकाशन झाले ते सच्चिदानंद शेवडे सगळे डोंबिवलीचे – माझे गाववाले आहेत याचं मला आणि कौतुक (गाड्यासोबत नळ्याची यात्रा 🙂 ). या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यालाही मी गेलो होतो.


परिक्रमेवरचे गो.नि.दांचे कुणा “एकाची भ्रमणगाथा”, जगन्नाथ कुंटे यांचं “नर्मदे हर हर”, आणि ध्रुव भट्ट यांचं गुजराथी “તત્ત્વમસિ” ही पुस्तके आधी वाचली होती. तरी प्रत्येकाचे अनुभव वेगळे, सांगायचे कथाभाग वेगळे, शैली वेगळी. त्यानुसार हे चौथे पुस्तक असले तरी वेगळेच आहे.



सश्रद्ध लोकांना हे पुस्तक आवडेलच; इतरांनाही हे अनुभवविश्व जाणून घ्यायला आवडेल.

———————————————————————————-

मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा (जमल्यास वाचा)

———————————————————————————-

———————————————————————————-

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

———————————————————————————