पुस्तक – निवडक विश्वसंवाद (Nivadak Vishwasamwaad)
लेखक – मंदार कुलकर्णी (Mandar Kulkarni)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २४३
प्रकाशन – राजहंस प्रकाशन, जून २०२२
ISBN – 978-93-91469-77-1

विश्वसंवाद ह्या “पहिल्या मराठी पॉडकास्ट” मध्ये श्री. मंदार कुलकर्णी ह्यांनी वेगवेगळ्या मराठी व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. ह्या मुलाखती त्यांच्या पॉडकास्ट वर आणि युट्युब चॅनल वर ऐकता येतात. ह्या ६०हून अधिक मुलाखतींपैकी निवडक १३ मुलाखती आता पुस्तक रूपाने प्रसिद्ध होत आहेत. ह्या आणि इतर मुलाखतीचे नायक-नायिका रूढार्थाने प्रसिद्ध/लोकप्रिय नाहीत. पण आपापल्या क्षेत्रात वेगळी उंची गाठून त्यांनी स्वतःचं नायक्तत्व सिद्ध केलं आहे. “ज्ञानाधारित समाज” जिथे – व्यक्तीचं ज्ञान, कौशल्य – अधिकाधिक महत्त्वाचं ठरणार आहे – तिथे ह्या व्यक्तींचं काम पथदर्शी आहे.

सर्वप्रथम आपण मंदार कुलकर्णी ह्यांची ओळख करून घेऊया.

आता प्रत्येक व्यक्तीबद्दल थोडक्यात समजून घेऊया

१) अतुल-प्राजक्ता – हे दाम्पत्य नागपूरला राहतं आणि स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी चालवतात. पण त्याचबरोबर ‘Angel Mentoring’ म्हणून ज्याचं वर्णन करता येईल असं अगदी वेगळं क्षेत्र त्यांनी आपल्या कामातून निर्माण केलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक काम करू पाहणाऱ्या तरुण मंडळींना आर्थिक मदत तर करतातच पण त्यांना व्यवसायिक मार्गदर्शन, व्यवस्थापन मार्गदर्शन करतात. त्यामुळे “फक्त देणगी देऊन थांबलो”, असं ना होता नव्या सामाजिक कामाला योग्य आधार मिळतो . आणि ते काम पुढे टिकून राहण्याचे शक्यता वाढते.
सामाजिकता आणि व्यावसायिकता ह्यांचा सुरेख मिलाफ साधून ते समाज शांतपणे समाज परिवर्तन करत आहेत.
त्यांची ह्यामागची भावना किती तर्कशुद्ध आणि निखळ आहे पहा –



२) सानिया किर्लोस्कर – “टीच फॉर इंडिया” चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि सुदूर ईशान्य भारतातील दुर्गम भागात शिक्षण पोचवण्यासाठी झटणारी युवती.

३) काशिराज कोळी – “घर तिथे वाचक” ही चळवळ सुरु केली आहे. स्वखर्चातून गावात बैलगाडीतून फिरते आणि मोफत वाचनालय सुरु केले. आज उपक्रम वाढत आहे.

४) सुनील खांडबहाले – बहुभाषिक शब्दकोशाची निर्मिती करणारे सुनील ! आधी सीडी, मग एसएमएस आणि नंतर वेबसाईटच्या माध्यमातून मराठी आणि इतर भारतीय भाषांच्या डिक्शनरी त्यांनी तयार केल्या आहेत. नाशिक मध्ये आयोजित होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या सॉफ्ट्वेअर कंपन्या, उद्योजक, व्यक्तिगत प्रोग्रामर ह्यांना एकत्र आणून कुंभमेळ्यातील वेगळावेल्या समस्यांसाठी तंत्रज्ञानाधारित सिस्टीम तयार करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. ह्या माध्यमातून काही स्टार्टअप सुद्धा सुरु झाल्या आहेत.
कॉलेजच्या वयात एक मोठं ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वतःचे पैसे, कष्ट ह्या कामात लावण्याचा हा टप्पा


५) अपूर्वा जोशी – “फॉरेन्सिक अकाउंटींग” म्हणजे “न्याय-सहायक लेखापरीक्षण” ह्या नवोदित क्षेत्रात अपूर्वाजींनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. जेव्हा आर्थिक गुन्हा घडतो तेव्हा त्या खटल्याच्या आर्थिक बाजूचं जे शोधकाम आहे ते नेहमीच्या गुन्ह्यांपेक्षा खूप वेगळं आहे. त्यासाठी आर्थिक व्यवहाराच्या बाजू एखाद्या बँकर प्रमाणे समजून घ्यायच्या , कर-कायदे कानून एखाद्या सी ए प्रमाणे समजून घ्यायच्या आणि ऑनलाईन व्यवहारांतलं तांत्रिक बाजूही समजावून घ्यायची. असं बहुपेडी काम आहे.
त्या स्वतः ह्या क्षेत्रातल्या पहिल्या काही व्यक्तींपैकी आहेत. आणि त्यांनी ह्या विषयाचा अभ्यासक्रमसुद्धा तयार केला आहे.

६) दत्ता पाटील – अमेरिकेत याहू कंपनीत काम करणारे दत्ताजी आपल्या महाराष्टातल्या खेडेगावातल्या पाणी प्रश्नाने अस्वस्थ झाले. मग त्यांनी सुट्टी घेऊन, गावी येऊन स्वतः पुढाकार घेऊन गावकऱ्यांना एकत्र आणलं. लोकसहभागातून जलसंधारणाची कामं केली आणि गाव पाणीदार केलं.

७) अनिमा पाटील-साबळे – अवकाशात प्रवास करणारे अंतराळवीरांचे अनुभव हे रोमांचक असतात. आपल्यालासुद्धा अशी सफर करायला मिळावी अशी स्वप्न आपण बघतो. पण हे स्वप्न पुरं व्हावं ह्यासाठी पाठपुरावा करावा करणारे खूप थोडे. पण लग्नानंतर, एक मूल झालं असताना अमेरिकेत राहताना आपल्या ह्या स्वप्नाचा पाठपुरावा अनिमाजींनी केला. त्यासाठीचे कोर्सेस, पदवी, अभ्यासक्रम पूर्ण करत “नासा”मध्ये प्रवेश मिळवला. सध्या त्या वेगवेगळ्या संशोधन प्रकल्पांत काम करत आहेत. अंतराळ प्रवासासाठीची जी शारीरिक, मानसिक तयारी लागते त्याबद्दलच्या काही प्रयोगांत भाग घेत आहेत. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास आणि सध्याचं काम फारच रोचक आहे.
त्यांच्या एका संशोधन प्रकल्पाबद्दल..


८) शिरीष फडतरे आणि मेधा ताडपत्रीकर – प्लॅस्टिक पासून इंधननिर्मिती करून प्लॅस्टिक कचऱ्याच्या प्रश्नावर सकारात्मक उत्तर शोधणारे उद्योजक

९) आशिष महाबळ – कॅलिफोर्निया विद्यापीठात अंतराळ संशोधन, मराठी विज्ञान कथा लेखन, नाण्यांचा संग्रह, संस्कृत भाषेचा अभ्यास अश्या बहुरंगी प्रतिभेचे धनी

१०) प्रकाश यादगिरे – गावातल्या मुलांना गणिताची गोडी लागावी म्हणून गावातल्या घरांच्या भिंतींवर गणिताची सूत्रे, प्रमेये लिहिण्याचा अभिनव प्रयोग राबवणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक.

११) प्रदीप लोखंडे – भारतातल्या ४९हजार खेड्यांची माहिती असलेला डेटाबेस तयार करणारे आणि १९९३ पासून “रिलेशनशिप मार्केटिंग”ची अभिनव कल्पना राबवणारे उद्योजक.
(सुमेध वडावाला(रिसबूड) ह्यांनी लिहिलेले “प्रदीप लोखंडे, पुणे-१३” हे पुस्तक मी पूर्वी वाचले होते. त्याचे परीक्षण पुढील लिंकवर वाचू शकाल.
https://learnmarathiwithkaushik.com/courses/pradeep-lokhande-pune-13/)

१२) अतुल वैद्य – हिंदी सिनेसंगीताच्या कराओके सिस्टीमचे आद्य निर्माते; इप्रसारण ह्या इंटरनेट रेडिओचे संस्थापक संचालक

१३) दिनेश वैद्य – भारतीय संस्कृतीचे परंपरागत ज्ञान असंख्य पोथ्यांमध्ये विखुरलेले आहे. ह्या पोथ्या जुन्या आणि बऱ्याचवेळा जीर्ण झाल्यामुळे ते ज्ञान कायमचं लुप्त होईल का काय अशी भीती आपल्याला भेडसावते आहे. पौरोहित्य म्हणजे “गुरुजी” म्हणून काम करणाऱ्या दिनेश वैद्यांना ह्या परिस्थितीने अस्वस्थ केले. हे ज्ञान कायमस्वरूपी जतन व्हावे म्हणून स्वतःच्या पैशाने प्राचीन हस्तलिखितं आणि पोथ्यांचे डिजिटायझेशन त्यांनी सुरु केले.

मला सांगायला अभिमान वाटतो की , विश्वसंवाद वर मंदारजींनी माझीही मुलाखत घेतली आहे. माझ्या ऑनलाईन मराठी आणि गुजराथी शिकवण्याच्या उपक्रमाबद्दल आम्ही गप्पा मारल्या आहेत. तो भाग आपण पुढील लिंकवर ऐकू शकाल. https://www.youtube.com/watch?v=2BRHC2aPXqI
विश्वसंवाद च्या युट्युब चॅनलची लिंक https://www.youtube.com/c/Vishwasamwaad

ह्या पुस्तकात किती वेगवेगळी व्यक्तिमत्व तुम्हाला भेटतील ह्याचा अंदाज आला असेलच. मंदार कुलकर्णी ह्यांची मुलाखतीची शैली ही खूप छान आहे. मुलाखतींपेक्षा सहज गप्पा असंच हे स्वरूप आहे. तरी नेमके प्रश्न विचारून ह्या व्यक्तींचं काम समजावून घेतलं आहे, त्याचं वेगळेपण अधोरेखित केलं आहे. ह्या कामामागच्या प्रेरणा; त्यासाठी घ्यावे लागलेले कष्ट हे सुद्धा छान उलगडून घेतलं आहे. ह्या मुलाखती अचंबित करणाऱ्या आहेत, प्रेरणादायी आहेत ! विशेषतः तरुणांना करियर म्हणून किंवा समाजकार्य करण्यासाठी मळलेल्या वाट सोडून काहीतरी कल्पक विचार करायला लावणाऱ्या आहेत.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दोनशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/

देशी-विदेशी व्यक्ती शिकत आहेत मराठी आणि गुजराथी भाषा ! ऑनलाईन माध्यमातून !! मोफत !!!

मी एक  भाषा  प्रेमी, युवा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मराठी आणि गुजराती भाषा कोणालाही सोप्या पद्ध्तीने, घरबसल्या आणि मोफत शिकता यावी, यासाठी मी गेल्या ८ वर्षांपासून ३ ट्युटोरियल्स चालवत आहे  – एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी, दुसरी हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी आणि तिसरी इंग्रजीतून गुजराती शिकण्यासाठी. यांच्या माध्यमातून भारतीय तसेच परदेशी नागरिकही मराठी,गुजराती  शिकत आहेत.

या ट्युटोरिअल्स मध्ये लिपी, प्राथमिक व्याकरण ( नाम, सर्वनाम, काळ, अव्यय ई. ) पासून सुरुवात करून लहान वाक्यांपर्यंत आणि पुढे पूर्ण संभाषण, रोजच्या  भाषेत वापरले जाणारे short forms इथपर्यंत सर्व आहे. थोडक्यात  भाषा  शिकू इच्छिणाऱ्यांसाठी ‘one-stop-shop’ अशा ह्या ट्युटोरिअल्स आहेत. मी या ट्युटोरिअल्स मधील संभाषणाच्या  दृकश्राव्य क्लिप्स ही YouTube channel वर टाकल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्याना उच्चार लवकर आत्मसात करता येतील.

माझ्या परदेशी विद्यार्थ्यांचे मराठी, गुजराती बोलतानाचे व्हिडीओ या लिंकवर पहा

https://learnmarathiwithkaushik.com/testimonials/