पुस्तक – पांडेपुराण (Pandepuran)

लेखक – पीयूष पांडे  (Peeyush Pandey)

भाषा – मराठी (Marathi)

पाने – २५५
मूळ पुस्तक – Pandeymonium (पांडेमोनिअम
)

मूळ पुस्तक भाषा – इंग्रजी (English

अनुवाद – प्रसाद नामजोशी (Prasad Namjoshi)

ISBN :978-93-86118-47-9

वाचनालयात हे पुस्तक बघितलं तेव्हा पीयूष पांडे कोण आहेत याबद्दल मी अज्ञानी होतो.

पण पुस्तकाच्या नावात “जाहिरात आणि मी” हा उल्लेख आणि मलपृष्ठावरची माहिती याच्यावरून जाहिरात विश्वाशी संबंधित ही एक मोठी व्यक्ती आहे आणि तिने आपले अनुभव पुस्तकात सांगितले आहेत हे कळलं. जाहिरातविश्वाशी माझा थेट संबंध नाही. म्हणूनच मला माहिती नसलेल्या या क्षेत्राबद्दल थोडेफार समजून घ्यायची संधी या पुस्तकातून मिळेल या अपेक्षेने हे पुस्तक घेतलं.

तुम्हाला पीयूष पांडे हे नाव माहिती असेल किंवा नसेल तरीही त्यांनी केलेल्या जाहिराती तुम्हाला नक्कीच माहिती असतील. फेविकॉल ची ती जाहिरात ज्यात राजस्थान मधला एका ट्रकवर सगळीकडे माणसं कोंबलेली आहेत ती पाहिली असेल.

फेविक्विची जाहिरात आठवतेय? एक माणूस गळ टाकून बसलाय पण मासे लागत नाहीत तेवढ्यात दुसरा येतो आणि काठीला फेविक्विक लावून एका मिनिटात मासे पकडून जातो.

 

वोडाफोन झु झु !!
आठवल्या जाहिराती??

या सगळ्या मागचं कलात्मक डोकं पीयूष पांडे आणि त्यांच्या ऑगिल्वी कंपनीच्या टीमचं. अशा एकाहून एक सरस जाहिराती देणाऱ्या पांडे यांच्या बद्दल पुस्तकात दिलेली माहिती.

 

हे पुस्तक आत्मचरित्र नाही किंवा आठवणींचा प्रवास अशा पद्धतीने नाही. तर काही आठवणी, काही महत्त्वाचे प्रसंग, त्यांच्या कामावर परिणाम करणाऱ्या घटना, त्यातून शिकलेले धडे असं सरमिसळ पद्धतीचं आहे.

अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया.

 

पुस्तकाच्या पहिल्या भागात पांडे यांचे एकत्र कुटुंब; त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे त्यांचे भाऊ-बहिणी, भाचे, पुतणे इत्यादींमुळे लहानपणापासून आत्ता त्यांच्या पर्यंत त्यांचा अनुभवांचा आवाका आपोआप कसा वाढला हे आपल्याला दिसतं. आपलं कुटुंब, आपला मित्रपरिवार असा बहुरंगी असण्याचे फायदे त्यांनी सांगितले आहेत. आपला परिवार तसा नसेल तर किमान आपल्या मित्रपरिवार तरी आपण तसा तयार केला पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याशी संबंधित नसलेले, आपल्यापेक्षा अगदी वेगळेच वागणारे लोक यांच्याशी आपली गट्टी जमते आणि त्यांच्याशी बोलून आपल्याला नव्या संकल्पनांचा कस लावून बघता येतो असं ते म्हणतात.

 

पुस्तकाच्या पुढच्या भागात जाहिरात क्षेत्राशी संबंधित त्यांनी शिकलेले धडे आणि मार्गदर्शक सूत्र असे लेख आहेत. त्यातून वेळोवेळी केलेल्या जाहिराती आणि जाहिराती बनवण्याची प्रक्रिया यामध्ये आपल्यालाही तर डोकावून बघता येतं उदाहरणार्थ जाहिरात आपल्या दिसते तसेच ऐकू येते आणि तसे संगीत कसे आहे यावरून तिची परिणामकारकता कमी अधिक होत असते हे सोदाहरण सांगितलं आहे.

 

पुढचे लेख लाला कंपन्यांवर आहे. “लाला कंपनी” म्हणजे अशी कंपनी ज्यात सर्व कारभार कुटुंबीयांच्या हातात. तसं बघायला गेलं तर बिरला, रिलायन्स, पिडिलाइट या लाला कंपन्याच आहेत पण त्यांचा दृष्टिकोन बहुराष्ट्रीय कंपन्यांसारखाच आहे असा पीयूष पांडे यांचा अनुभव आहे. त्यामुळे, कंपन्यांमध्ये अशी वर्गवारी लोक करतात आणि त्याचा कसा परिणाम होतो हे वाचणे मजेशीर आहे.

पुढच्या भागात त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वात कुठले गुण गुण असावेत याबद्दल सांगितलं आहे. या भागातल्या एका लेखात ते आपल्या मतांशी ठाम राहा असे म्हणतात तर आधीच्या प्रकरणात, आपली मतं दुसऱ्यांना सांगून त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यातून बदल घडवा असं सांगतात. बघायला गेलं तर हे परस्परविरोधी वाटतंय. पण यशस्वी व्हायचे असेल तर दोन्ही गोष्टींचा समतोल साधला पाहिजे. तो त्यांना जमला म्हणूनच ते यशस्वी असे म्हणायला हरकत नाही.

जेव्हा चाकोरी मोडणारी काही संकल्पना आपण मांडतो तेव्हा त्याला विरोध होणे, त्यावर कोणी विश्वास न ठेवणे सहाजिक आहे. पण जर आपल्याला ती संकल्पना मनापासून आवडली असेल आणि तिचा पाठपुरावा केला तर लोक तोंडात बोट घालतीलअसे यश मिळू शकते. त्यामुळे जोखीम उचलण्याची तयारी सुद्धा पुढे जाऊ इच्छिणाऱ्यांना ठेवली पाहिजे. उदाहरणार्थ झु झु ची कल्पना मांडली गेली तेव्हा तिचा स्वागत कसं झालं पुढे त्याच्यावर काम कसं झालं त्याबद्दल हे वाचा.

 

व्यवसायिक काम करताना त्यातून मिळालेले व्यवसायिक यश,पैसा,प्रसिद्धी हे आपल्या कामाचे मूल्यमापन करणारे मापदंड असतातच. पण जेव्हा या व्यावसायिक कामातून काहीतरी समाजोपयोगी घडतं तेव्हा त्याची मजा काही वेगळीच असते. पीयूष यांना राष्ट्रीय साक्षरता मिशन साठी पोलिओ अभियानासाठी काम करायची संधी मिळाली. काही वर्षांपूर्वी गायलेलं “मिले सुर मेरा तुम्हारा” या बहुसांस्कृतिक गीताची निर्मितीसुद्धा पांडे यांच्या टीमनेच केली आहे. अशी कुठली कामं त्यांना करायला मिळाली हे त्यांनी पुढच्या लेखात सांगितलं आहे

पुढचा विभाग “ऑगिल्वी आणि मी” हा त्यांची कंपनी, त्यातली नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींबद्दलचा आहे.

प्रादेशिक बहुसांस्कृतिक वाद लेखात त्यांनी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या लोकांची टीम उत्कृष्ट काम करू शकते याची जाणीव करून करून दिली आहे. मल्टिनॅशनल कंपनी म्हणजे फक्त जगात अनेक ठिकाणी कचोर्‍या असणारी कंपनी नव्हे तर अनेक ठिकाणची माणसं अनेक संस्कृतीतली माणसं जिथे काम करतात अशी कंपनी. कारण एखादी जाहिरात एका देशात तुफान चालेल तर दुसऱ्या देशात ही संकल्पना वादग्रस्त ठरेल. एखादी गोष्ट एका राज्यात लोकांना भावेल दुसऱ्या राज्यात लोकांना त्याच्याशी रिलेट करता येणार नाही म्हणूनच बहुसंस्कृतिक टीम असेल तरच एका पठडीतला विचार होणार नाही.

२०१४ च्या निवडणुकीतली “आपकी बार मोदी सरकार”, “अच्छे दिन आने वाले है” ह्या लक्षवेधी घोषणा सुद्धा पीयूष यांच्याच आहेत त्याबद्दल त्यांनी थोडे सांगितला आहे.

शेवटच्या भागात त्यांनी जाहिरात क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा वेध घेतला आहे. 

 

इतकं मोठं यश मिळवून सुद्धा त्यांनी स्वतःची कंपनी काढली नाही Ogilvy शी एकनिष्ठ का राहिले राहिले याबद्दल स्वतःची प्रामाणिक व समाधानी भूमिका समोर ठेवली आहे. पत्रकारांच्या गोसीपिंगला उत्तर !!

असे एकूण पुस्तकाचं स्वरूप आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत जाहिराती बघत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. कारण वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मथळ्याऐवजी पानभर जाहिरात असते आणि रात्री झोपताना मोबाईलवर फेसबूक चेक करताना जाहिरात बघत किंवा युट्युबवर गाणे ऐकताना ऐकताना सुद्धा शेवटची स्किप ऍड करूनच आपण झोपतो. या जाहिराती तयार होताना पडद्यामागे काय घडतं याचा थोडासा अंदाज या पुस्तकातून येतो. पण पुस्तक फारच तुटक आणि त्रोटक पद्धतीने लिहिले आहे असं मला वाटलं.२०१४ चा निवडणूक प्रचार आणि त्यात असलेला जाहिरातींचा वाटा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्या जाहिराती कशा घडल्या; प्रत्यक्ष मोदींसह किंवा भाजपच्या दिग्गजांचे मार्गदर्शन कसे होते हे सविस्तर समजून घ्यायला आवडलं असतं. पण लेख तीन-साडेतीन पानांत गुंडाळला आहे. “मिले सुर मेरा तुम्हारा”,फेविकॉल आणि इतर लक्षात राहिलेल्या जाहिरातींच्या अशा जन्मकथा सविस्तर वाचायला मिळतील ही अपेक्षा पूर्ण होत नाही. त्यामुळे एखाद्या उत्तम आचाऱ्याने आज स्वयंपाक काय केला आहे याचे नमुने आपल्याला दाखवावे, आपल्या तोंडाला पाणी सुटावं; आता जेवण कधी वाढतोय याची वाट बघावी तर पान पुढ्यात येतच नाही अशी भावना होते. ह्या विषयावर दुसरे पुस्तक त्यांनी लिहिलंय का हे बघायला पाहिजे. 

मराठी अनुवाद उत्तमच झाला आहे. अनुवादात कुठे ठेच लागत नाही. “पांडे”जी नव्हे तर “श्री. देशपांडे” आपल्याशी बोलतायत असंच वाटतं.

जाहिरातींच्या जुन्या आठवणींना उजाळा, कहाण्याची थोडीशी झलक, एका यशस्वी व्यक्तीच्या ‘यशस्वी कसे व्हावे’ व ‘यशस्वी टीम कशी असावी’ याबद्दलच्या टिप्स समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हरकत नाही.

मी दिलेली पुस्तक श्रेणी

———————————————————————————-
जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

अजून पुस्तक परीक्षणे

हे परीक्षण आवडलं असेल अशी मला आशा आहे. मी परीक्षणे लिहिलेल्या दीडशेहून अधिक पुस्तकांची यादी आणि लिंक्स बघण्यासाठी या पेजला अवश्य भेट द्या

https://learnmarathiwithkaushik.com/my-book-reviews/