पुस्तक : पुन्हा मी … पुन्हा मी (punha mi… punha mi)

लेखक : पु.ल. देशपांडे (P. L. Deshapnade)

भाषा : मराठी (Marathi)

पाने : १९६

ISBN : 978-81-8086-075-1

पूर्वी वेगवेगळ्या मासिकांत, व्रुत्तपत्रांत, पुस्तकांत प्रसिद्ध झालेल्या पुलंच्या कथा, कविता, भाषणे, लेख, मुलाखती यांचा समावेश या पुस्तकात आहेत. पुढीलप्रमाणे.

यातल्या कविता आणि पहिल्या “हिरॉइन” पर्यंतच्या कथा मला आवडल्या नाहीत. भाषा खूपच ठोकळेबाज जणू एखादा सरकारी रिपोर्ट वाचतोय अशी आहे. या कथा पुलंच्यां नसाव्यात असं वाटावं इतपत रुक्ष आहेत. पण “तुका वाण्याचे दुकान” या कथे पासून पुढचं सर्व पुस्तक म्हणजे १०० नंबरी सोनं आहे.

“तुका वाण्याचे दुकान” आणि “साक्ष” या कथा गावाकडच्या मराठी ढंगात आहेत. भक्तीरसात डुंबलेले तुकाराम महाराज दुकान कसं चालवत असतील आणि त्यांच्या अव्यवहारी वागण्याने आवलीला कसा त्रास होत असेल याचं सुरेख चित्र गोष्टीत आहे. तर दुसऱ्या गोष्टीत एका इरसाल गावकऱ्याची कोर्टात साक्ष आहे.

वसंत सबनिसांनी पुलंची घेतलेली एक मजेशीर मुलाखत आहे. या सबनीस आणि पुलांची शाब्दिक कोट्या आणी शब्दांचे खेळ करणारी प्रश्नोत्तरे आहेत उदा.

पुढील व्यक्तींबद्दल लेख आहेत : आकाशवाणीतील अधिकारी आणि शास्त्रीय संगित रसिक के. डी. दिक्षीत, नाट्यनिकेतन या नाट्यनिर्मिती संस्थेचे प्रमुख मो. ग. रांगणेकर, गोव्यात “कलवंतीण”च्या पोटी जन्माला येऊन आपल्या समाजाच्या सन्मानासाठी काम करणारे राजारामबापू, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. व्यक्तीचित्रातून त्या व्यक्तीमत्त्वांचा परिचयच नाही तर त्यांच्या कार्याची वेगळेपण आणि महत्त्वही पुलंनी अधोरेखित केले आहे. उदा. पुरंदऱ्यांबद्दल ते लिहितात :

पुढे सामजिक विषयांवरचे लेख आहेत. आणिबाणी, भारत-चीन युद्धाच्या वेळी सर्वसामान्य नागरीकांमध्ये काय गुणदोष दिसले; एक समर्थ राष्ट्र म्हणून उभं राहायचं असेल तर आपल्यला आचार विचारांतील शिस्त कशी हवी हे स्पष्टपणे सांगणारे लेख आहेत. साने गुरुजींवरचा एक लेख आहे.

१९७४ साली मुंबई महानगरपालिकेला संगीत शिक्षणाबद्दल बद्दल केलेल्या सूचनांचा गोषवारा आहे. दुरदिवाने अजूनही त्या सूचना अभ्यासक्रमात आणलेल्या दिसत नाहीत. आता तर संगीत विषयच असून नसल्यासारखा आहे.

१९८२ सालच्या “मराठी मुलखात मराठीचा दर्जा” या लेखात मराठीच्या अवहेलनेबद्दल लिहिले आहे. भाषाशुद्धीकरणाच्या नावाखाली मराठीला संस्कृतप्रचूर रूप देण्याचा प्रयत्न होतोय ज्यामुळे राज्यकारभाराची भाषा मराठी असली तरी “ही” मराठी लोकांची मराठी नव्हे. त्याबद्दल पुलंनी त्यांह्या खास शैलीत काय लिहिलंय त्याचं उदाहरण.

ज्यांनी पुलंचं फक्त विनोदी लिखाण वाचलं आहे त्यांना हे वैचारिक लिखाण पुलंच्या व्यक्तिमत्त्वाचा नवा पैलू दाखवेल. मलाही पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं की या लिखाणामगे एक संवेदनशील, सर्वसमावेशक, निखळ गुणग्राही व्यक्ती आहे. त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीने आनंद घेत आनंद देत जगलं पाहिजे. धर्म-जात-भाषा-देश-वय-लिंग यांच्या बेड्या घालून घेऊन कुरूप, खुरटं, किरकिरं  न जगता “जे जे उत्तम उन्नत महन्मधुर ते ते” शिकण्याचा, बघण्याचा, ऐकणयाचा, खाण्याचा आनंद घेतला पाहिजे, आनंद दिला पाहिजे !

————————————————————

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )

————————————————————

———————————————————————————

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

———————————————————————————-