पुस्तक : QED (क्यूईडी)

लेखक : Richard Feynman (रिचर्ड फेनमॅन )

पाने : १५२

भाषा : English (इंग्रजी )

ISBN : 978-0-140-12505-4

मी सध्या विज्ञान-तंत्रज्ञानविषयक काही वाचलं तरी ते संगणक क्षेत्राशी नवीन टेक्नोलॉजी वगैरे वाचन होते. कॉलेज सोडल्यापासून मूलभूत विज्ञानाचा अभ्यास सुटला आहे. म्हणून आग्रहपूर्वक काहितरी विज्ञान विषयक वाचायचा प्रयत्न करावा असं डोक्यात आलं. काही दिवसांपूर्वी स्टिफन हॉकिंग यांचं पुस्तक वाचलं होतं.  The Grand Design (द ग्रॅंड डिझाईन)-Stephen Hawking & Leonard Mlodinow (स्टीफन हॉकिंग आणि लिओनार्ड म्लॉदिनोव) त्यात “क्वांटम फिजिक्स”, “क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्स” हे शब्द आले होते. त्यांनी सोप्या शब्दात समजवायचा प्रयत्न केला तरी फारच डोक्यावरून गेलं. तेव्हापासून हे शब्द डोक्यात घोळत होते. ऑनलाईन लायब्ररीत हे पुस्तक मिळालं. ज्या शास्त्रज्ञाच्या कामामुळे या क्षेत्रात मोठी प्रगती झाली, या संशोधनासाठी त्यांना आणि सहकाऱ्यांना १९६५ साली नोबेल पारितोषिक मिळालं होतं; ज्यांचा उल्लेख स्टिफन हॉकिंग यांनीही केलेला त्या रिचर्ड फेनमॅन यांचंच पुस्तक वाचायला मिळालं. From horse’s mouth म्हणतात तसं. 

रिचर्ड फेनमॅन यांनी या विषयावर एक चार सत्रांची एक व्याख्यानमाला सादर केली होती. ती या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे. श्रोता विज्ञानातला खूप मोठा जाणकार नसेल पण विज्ञानाबद्दल गोडी असणारी सामान्यव्यक्ती असेल या भूमिकेतून हा विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. मुद्दा समजावून सांगणाऱ्या आकृत्या आहेत. फेनमॅन यांची वक्तृत्त्वशैली पण खुसखुशीत, हलकेफुलके विनोद करणारी आहे. गहन विषयाची मांडणी करताना श्रोता जागा आणि ताजातवाना राहील अशी तजवीज करत ते बोलतात. त्यामुळे त्यांचं पुस्तक वाचताना आपणही कंटाळून जात नाही.

क्वांटम इलेक्ट्रोडायनामिक्स म्हणजे इलेक्ट्रोन, फोटॉन (प्रकाशकण) यांची हालचाल आणी त्यांची स्थिती यांची शक्यता (probability) यांचा विचार करणे. एक इलेक्ट्रॉन एक फोटॉन प्रसारित किंवा संश्लेषित करेल याची शक्यता यांचा यांचा विचार करणे. या शक्यतांना बीजगणितात, बाणांच्या रूपाने आकृतीत बसवून निष्कर्ष काढणे. असं ढोबळमानाने म्हणू शकतो.

याच क्रियांमधून प्रकाश परावर्तन, अपवर्तन, मृगजळ, भिंगामधून प्रकाशाचं एकत्रीकरण, मृगजळ इ. नेहमी येणाऱ्या अनुभवांच्या मागचं कारण शोधून काढता येतं हे सप्रमाण सिद्ध केलं आहे. आपण शाळा-कॉलेजात शिकलेल्या बऱ्याच संकल्पनेलाही लेखक छेद देतो. “प्रकाशलहरी” असा शब्द आपण वापरतो. पण प्रकाश काहीवेळा लहरींसारखा तर काही वेळा कणांसारखे वागतो. प्रकाश फॉटोन्स (प्रकाशकणांचा) बनलेला आहे. प्रकाश सरळ रेषेत जातो असं आपण म्हणतो पण प्रत्यक्षात तसं काही नाही पण प्रकाशकण सगळ्या दिशांना पसरतात. पण एका बिंदूवर दिसणारे कण सरळ रेषेत येण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपण ढोबळमानाने प्रकाश सरळ रेषेत जातो असं म्हणतो. निसर्ग खूप अनियमिततांनी भरलेला आहे. निसर्गाचीही “अ‍ॅब्सर्डिटी” का आहे हे कळत नाही पण त्याचं प्रारूप – मॉडेल मांडता येतं का याचा ऊहापोह केला आहे. असो! तुम्हाला पुस्तकाची साधारण कल्पना आली असेलच. मी जास्त सांगत नाही. कारण संदर्भरहित आणि थोडक्यात सांगायच्या नादात अर्धवट ज्ञानाने चूक होण्याचीच शक्यता जास्त.

या पुस्तकात शेवटी मूलद्रव्यांच्या आणूची रचना कशी असेल हे QED च्या मॉडेल मध्ये कसं बसतं याचा विचार आहे. कॉलेजमधून पास होईपर्यंत इतकंच शिकलेलो की की अणूचे केंद्र प्रोटॉन आणि न्यूट्रॉननी बनलेलं असतं तर त्याभोवती इलेक्ट्रोन फिरत असतात. या पुस्तकात या पुढची माहिती आहे. प्रोटॉन-न्यूट्रॉन पण अजून लहान कणांचे बनलेले असतात. ज्याला म्हणतात – क्वॉर्क (quark). त्यांचेही दोन प्रकार असतात. या क्वॉर्क मधलं आकर्षण असतं ग्लुऑन्स. त्याचेही कितितरी प्रकार असतात. हे आणि बरंच काही … मी हे वाचताना मला असं वाटत होतं की मी अगदी नव्या शोधाबद्दल वाचत आहे. पण मग लक्षात आलं की हे फेनमॅन यांचं हे पुस्तक १९८५ साली प्रकाशित झालेलं आहे. त्याआधी हे शोध लागलेले आहेत. पण त्यानंतर २० वर्षांनंतर शिकूनही अभ्यासक्रमात याचा उल्लेख नव्हता. इतक्या सूक्ष्म पातळीवर जायचं नव्हतं म्हणून पुस्तक निर्मात्यांनी हा भाग समाविष्ट केला नाही का आपला अभ्यासक्रमच इतका जुनाट आहे, न कळे. पण अभ्यास्क्रमाचा दोष असेल तर मात्र भारत वैज्ञानिक प्रगतीत मागे का याचं एक कारण हे नक्की म्हणता येईल. माझ्या वैज्ञानिक मागासपणाची जाणीव करून देण्याच्या दृष्टिनेही हे पुस्तक मला आवडलं.

हे पुस्तक काही क्वांटम फिजिक्स वरचा अभ्यासग्रंथ नाही. पण या विषयात शिकणऱ्यासाठी विषयप्रवेश म्हणून पुस्तक चांगलं आहे. माझ्यासारखा जो विज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करत नाही त्याला या महत्त्वाच्या वैज्ञानिक संकल्पनेची बऱ्यापैकी तोंडओळख होईल. इतिहास, राजकारण, कथा, कादंबऱ्यात रमणाऱ्यांनी रुचिपालट म्हणून अशी पुस्तकं वाचायला पाहिजेत. “आमच्या वेदांत सगळं काही आहे” हे आत्मविश्वासाने म्हणायचं असेल तर या शोधांचं खंडन-मंडन वेदांच्या ज्ञानाने करता आलं पाहिजे. त्या दृष्टीने परंपरावाद्यांनीही हे पुस्तक वाचलंच पाहिजे.

————————————————————

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )

————————————————————

———————————————————————————

आवा ( आवर्जून वाचा )

जवा ( जमल्यास वाचा )

वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )

नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

———————————————————————————-