पुस्तक – राशा (Rasha)
लेखक – शरद वर्दे (Sharad Varde)
भाषा – मराठी (Marathi)
पाने – २५९
ISBN – दिलेला नाही
एकोणीसशे ऐंशीच्या दशकातला रशिया तुम्ही पाहिला आहे का? त्यावेळी रशियाला जाण्याचा योग तुम्हाला आला असेल तर तुम्ही तिथली पर्यटन स्थळ पाहिली असतील. पण तुम्हाला त्या वेळच्या एखाद्या रशियन कंपनीबरोबर वाटाघाटींसाठी कधी जावं लागलं होतं का? तुम्ही अशा कामासाठी रशियात गेला असता तर कम्युनिस्ट राजवट कशी होती, तिचा लोकांच्या वागण्यावर, विचारांवर रोजच्या जगण्यावर कसा परिणाम झाला होता हे तुमच्या लक्षात आलं असतं. असो ! आता ती संधी मिळाली नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका. कारण शरद वर्दे यांच्या या पुस्तकात आपल्याला ही संधी मिळणार आहे.
पुस्तकात दिलेली लेखकाची माहिती.
रशियन लोक आपल्या मातृभूमीचा जो उच्चार करतात तो आपल्या कानांना र शी या असा ऐकू न येता राशा असा ऐकू येतो म्हणून पुस्तकाचं नाव राशा कंपनीच्या कामानिमित्त लेखकाने रशियाला अनेक वेळा भेट दिली. तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करून आपल्या कंपनीच्या उत्पादनांसाठी ऑर्डर्स मिळवल्या. हे सगळं करताना रशियन बाबूंची खाबूगिरी, त्यांचा परदेशी वस्तूंचा सोस, रशियातले निर्बंध, परदेशी माणसांवर सतत ठेवली जाणारी पाळत अश्या नाना प्रकारच्या अनुभवातून त्यांना जावं लागलं. हे चित्र-विचित्र अनुभव त्यांनी राशा या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. तेही एका डॉक्युमेंटरी सारखे नाहीत तर एखाद्या कादंबरी प्रमाणे प्रसंगांच्या मालिकेतून.
त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगात भेटलेली माणसं आपल्याला पुढच्या प्रकरणात पुन्हा पुन्हा भेटत राहतात आणि गमतीजमती घडवत राहतात. त्या त्या प्रसंगात ते तसे का वागले हे थोडं थोडं स्पष्ट होतं आणि ती एकेक व्यक्तिरेखा म्हणून आपल्यापुढे साकार होऊ लागतात.
लेखकाची प्रसंग आणि माणसांचं वर्णन करायची शैली अफलातून आहे. शाब्दिक कोट्या, स्वतःवरचे विनोद, दोन प्रसंगांची गमतीदार तुलना अशा खुसखुशीत शैलीतून प्रत्येक पान अन् पान आपल्याला हसवतं आणि तरीही त्यावेळच्या परिस्थितीचं गांभीर्य आणि कारुण्य आपल्यापर्यंत थेट पोचतं.पुढे दिलेले प्रातिनिधिक उतारे वाचले की तुम्हाला समजेल मी काय म्हणतोय ते.
परदेशात उतरताना त्या देशाच्या सिस्टिमचा अनुभव पहिल्यांदा येतो तो इमिग्रेशन मध्ये. जरा हा रशियन इमिग्रेशनचा अनुभव बघा. संथ चाललेल्या कारभारात बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले आणि रांगेत नंबर लागल्यावर हे असं झालं..
रशियामध्ये कम्युनिझम किंवा साम्यवाद असल्यामुळे सर्वांना एकच पगार, सगळ्यांनी एकाच सरकारी दुकानातून एकाच पद्धतीच्या वस्तू विकत घ्यायच्या असा प्रकार त्यामुळे परदेशी मालाबद्दल प्रचंड आकर्षण तयार झालं होतं. मग एखादा परदेशी पाहुणा आपल्याकडे कॉन्टॅक्ट मिळवायला आला की हे सरकारी बाबू दारूसाठी, परदेशी वस्तूंसाठी अगदी चटावलेले असायचे. कंपनीच्या लोकांनी अशा स्वरूपात लाच देणे हे गृहीतच होतं. कोणी नाही दिली तर ते सरळ स्पष्टपणे मागत सुद्धा होते. अशा वस्तू मिळत राहाव्या म्हणून वेळकाढूपणा करत मीटिंग लांबविण्याचे प्रकार व्हायचे तशातला हा एक प्रसंग
लेखक जेव्हा रशियाला पुन्हापुन्हा जायला लागला तेव्हा साहजिकच तिथल्या लोकांशी जवळीक वाढली आणि वरवर दिसणारं हे दिसणारे चित्र असं का याबद्दल लोकांशी बोलणे होऊ लागलं. साम्यवादात लोकांची कशी कुचंबणा होते ते समजू लागलं. उदा. तरुण मुली सतत सुंदर राहण्याचा प्रयत्न करत होत्या ते चांगला परदेशी पाहुणा गटवावा आणि रशियातून एकदाच बाहेर बाहेर पडावं यासाठी.
पुढे रशियाचे विघटन झालं रशियातून छोटे छोटे देश निर्माण झाले साम्यवादी राजवटीचा पगडा कमी झाला इतके दिवस बंदिस्त वातावरणात राहणारे लोक अचानक खुल्या वातावरणात आले. खुलं वारं त्यांना सुरुवातीला आल्हाददायक वाटलं पण त्या वार्याचं हा हा म्हणता वादळात रूपांतर झालं. यंत्राप्रमाणे ठराविक पठडीत काम करणार्या माणसांना स्वातंत्र्य, स्पर्धा यांच्याशी जुळवून घेणं कठीण झालं. त्या स्थित्यंतराचा लेखकाने घेतलेला अनुभव.
पूर्वीची सरकारी मक्तेदारी गेली म्हणून लाचखोरीला चटावलेल्या अधिकाऱ्यांचे साधू झाले नाहीत. भ्रष्टाचाराचे नवीन मार्ग त्यांनी धुंडाळले. लेखकाच्या भागीदाराच्या बोलण्यातून त्याची जाणवलेली झलक.
पुस्तकात रशियाच्या आणि लेखकाला भेटलेल्या व्यक्तींच्या- खरं म्हटलं तर वल्लींच्या- अशा कितीतरी सुरस चमत्कारिक कथा आहे आहेत. ते वाचायला मजा येते. हे पुस्तक विचारप्रवृत्त सुद्धा करतं. समाजात उच्च-नीच, गरीब-श्रीमंत असा भेदभाव आहे; श्रमाला प्रतिष्ठा नाही असं आपल्याला दिसतं. पण म्हणून सगळ्यांना सारखं काम, सारखा पगार, सारखा मान असं द्यावं, तरी समाजाचं समाधान होत नाहीच. लोकांची झटून काम करण्याची वृत्ती जाते. नवं काही करायची उमेदच जणू नाहीशी होते. आणि “समानांमध्ये जास्त समान” असा वर्ग तयार होतो. त्याउलट भांडवलशाहीत काळाबरोबर पावलं न टाकणाऱ्याची असहाय्य फरफट होते. या दोन्हीचा तोल साधणारी समाजव्यवस्था कशी असेल, ती कशी येईल आणि कशी टिकेल यावर समाजशास्त्रज्ञ विचार करतच आलेत. आपल्याही मनात तो विचार सुरू होईल. शरद वर्दे यांचं हे पुस्तक म्हणून नक्की वाचा त्यांची मी आधी वाचलेली दोन पुस्तकही नक्की वाचावी अशीच आहेत. त्यांची परीक्षण इथे वाचू शकाल.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-