पुस्तक : Rich Dad Poor Dad (रिच डॅड पुअर डॅड)

लेखक : Robert T. Kiyosaki (रॉबेर्ट टी. कियोसाकी)

श्रीमंतीचं रहस्य सांगणरे पुस्तक.

आपण श्रीमंत असावं, आपल्याकडे भरपूर पैसा असावा, बंगला, गाडी असावी, भरपूर फिरायला मिळावं असं स्वप्न आपल्यापैकी अनेक जण बघतात. पण हे स्वप्न साकार कसं करावं हे आआपल्याला कळत नाही. काहीतरी घबाड हाती लागेल आणि श्रीमंत होता येईल अशा आशेवर अनेकजण जगतात. तर आजूबाजूची परिस्थिती बघता गैरमार्गानेच श्रीमंत होता येतं असाही समज करून घेऊन अनेक जण निराश होतात.

या कल्पनांना छेद देत पैसा, पैशाचं व्यवस्थापन आय(income)-व्यय(expenses) याबद्दल नव्याने विचार देणारं, विचार करायला लावणारं आणि कृती करायला लावणरं हे पुस्तक आहे.

पुअर डॅड म्हणजे लेखकाचे वडील हे अमेरिकन समाजातील एक मध्यमवर्गीय गृहस्थ. हुशार व  प्राध्यापकीच्या क्षेत्रात यशस्वी. पण पैशाच्या बाबतीत मध्यमवर्गीय धारणा असणारे. जास्त शिका, जास्त कष्ट करून अधिक पगाराची नोकरी करा, पैसे वाचवा, खर्च कमी ठेवा ई. अगदी मध्यमवर्गीय मराठी माणसासारखं म्हणणारे. पण तरीही आयुष्याच्या अखेरीपर्यंत श्रीमंत होऊ न शकलेले.

या उलट रिच डॅड म्हणजे लेखकाच्या मित्राचे वडील. ते कमी शिकलेले पण वेगवेगळे व्यवसाय करणारे. पैशाबद्दल त्यांच्या कल्पना वेगळ्या आहेत. अगदी कायदेशीर आणि नैतिकच आहेत. त्या संकल्पना त्यांनी लेखकाला शिकवल्या. आणि ते “डॅड” तर श्रीमंत होतेच पण त्यांच्या मर्गदर्शनाखाली लेखकही श्रीमंत झाला.

म्हणूनच “रिच डॅड” कशा पद्धतीने पैशाकडे बघतात; “मी पैशासाठी काम करत नाही तर पैशाला मी माझ्यासाठी काम करायला लावतो” असं कसं म्हणू शकतात, संपत्ती(assets)-दायित्त्व(liability) कशाला म्हणतात हे मुळातूनच वाचण्यासारखं आहे.

लेखकाचं असं म्हणणं आहे की मध्यमवर्गीय माणसं कष्ट भरपूर करतात आणि श्रीमंतही; पण मध्यमवर्गीय “हार्डवर्क” करतात तर श्रीमंत होणारी व्यक्ती “स्मार्टवर्क” करते. पैशाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाच्या फरकामुळे, अर्थसाक्षरतेच्या (Financial literacy)अभावामुळे मध्यमवर्गीयांच्या कष्टाचं चीज होत नाही. अधिक काम म्हणजे अधिक पैसा म्हणजे अधिक श्रीमंती असं हा समज चुकीचा आहे. एखाद्याचा पगार किंवा त्याचं उत्पन्न (वकील, डॉक्टर यांचं) भरपूर आहे म्हणून ते श्रीमंत नव्हेत. कारण त्यांनी काम करणं थांबवलं तर येणारं उत्पन्नही बंद होईल. श्रीमंत व्यक्ती मात्र अशा मालमत्ता(assets) जमवतात की काम न करताही त्यांना उत्पन्न मिळत राहतं. आणि मराठीत म्हणतात त्याप्रमाणे ते “बसून खाऊ” शकतात.

लेखकाने दिलेले सल्ले आणि टिप्स यांची उदाहरणं इथे देऊन मी आपली उत्सुकता मारत नाही आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे एका ओळीच्या टिप्स वाचून गैरसमज होण्याची शक्यता अधिक. पूर्ण विवेचन वाचून समजून घेतल्यावरच त्याचा सारांश लक्षात ठेवणं योग्य होईल.

तर हे पुस्तक अवश्य वाचा. तरूणांनी, मध्यमवयीन व्यक्तींनी तर शक्य तितक्या लवकर हे पुस्तक वाचून अंलबजावणी केली पाहिजे.

मी हे इंग्रजी पुस्तक वाचलं असलं तरी याचा मराठी आणि इतर काही भारतीय भाषांमध्ये अनुवाद उपलब्ध आहे.

————————————————————

मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )

————————————————————