पुस्तक : Selected short stories Rabindranth Tagore सिलेक्टेड शॉर्ट स्टोरीज : रवींद्रनाथ टागोर
लेखक : Rabindranth Tagore (रवींद्रनाथ टागोर )
भाषा : English (इंग्रजी)
मूळ भाषा : Bengali (बंगाली)
अनुवादक : Wiliam Radice ( विल्यम रॅडिस )
ISBN : 978-0-140-18854-7
अनुक्रमणिका :
रवींद्रनाथ टागोरांच्या ३० लघुकथांच्या इंग्रजी भाषांतरचा हा संग्रह आहे. या कथा टगोरांनी १८९० च्या दशकात लिहिलेल्या आहेत.
मला असं वाटलेलं की रवींद्रनाथ टागोरांच्या कथा – “गुरुदेवांच्या” कथा – म्हणजे खूप भव्यदिव्य, तत्त्वज्ञानपूर्ण असं काहितरी असेल. राजेरजवाडे, देवदानव, शाप-उःशाप यांच्या गोष्टी असतील. पल्लेदार वाक्ये आणि पात्रांच्या तोंडच्या मोठमोठ्या संवादातून वैश्विक सत्य वगैरेंचे खंडन-मंडन असणार, तेही इंग्लिशमधून; म्हणजे हे पुस्तक चांगलंच विद्वत्जड असणार या समजुतीने काहिसं घाबरतच मी हे पुस्तक वाचायला घेतलं. पण पुस्तक वाचायला सुरुवात केली, थोडं चाळलं आणि लक्षात आलं की पुस्तक अजिबात “जड” नाही. कुठलीही गोष्ट पौराणिक, काल्पनिक, दिव्यलोकातली नाही. तुमच्या आमच्या सारख्या साध्या माणसांच्या साध्या सोप्या गोष्टी आहेत. जमीनदार, पोस्टमास्तर, डॉक्टर, मजूर, फेरिवाला, प्रौढ गृहिणी, बालविवाह झालेल्या नववधू, पौगंडवस्थेतली मुलं अशी वेगवेगळी माणसं त्यांच्या कथांची मुख्य पात्रं आहेत. पल्लेदार वाक्ये, ताव च्या ताव संवाद इथे नाहीत.
प्रत्येक कथेचा विषय वेगवेगळा आहे. सर्व गोष्टी गंभीर आहेत. बऱ्याच शोकांतिका आहेत. दुःख, वेदना, फसवणूक, गरीबीमुळे आलेले दैन्य, परिस्थितीमुळे झालेला प्रियजनांची ताटातूट, अनोळखी व्यक्तींची भेट आणि विरह, कुणाच्या पुत्रप्रेमातिरेकाचे दुष्परिणाम तर कुणाच्या अतिरेकी काटकसरींचे मुलांवर होणारे परिणाम असे वेगवेगळे विषय यात आहे.
काही गोष्टींचा शेवट नाट्यमयरीतीने किंवा ठोस झाला आहे असं वाटलं नाही. तर काही गोष्टींत “मग पुढे काय झालं सांगा न” असं वाटतं. काही गोष्टी आणि त्यांचे विषय अगदी साधे आहेत की इतपत कथा हल्लीचे नवोदित लेखकही लिहितात असं वाटतं. पण १८९० साली म्हणजे सुमारे १२० वर्षांपूर्वी जेव्हा नवीन मध्यमवर्ग उदयास येत होता, कथांचे विषय जेव्हा पौराणिकच जास्त होते तेव्हा त्यांनी या कथा लिहिल्या आहेत. आत्ता त्या साध्या वाटल्या तरी तेव्हा त्या खासच होत्या. त्यांच्या सारख्या तत्कालीन साहित्यिकांनीच हा साहित्याचा नवीन रस्ता उघडला आणि “सोपी केली पायवाट”.
२ कथा सोडल्या तर सगळ्या गोष्टींना ग्रामीण बंगलची पार्श्वभूमी आहे. बंगालचा पाऊस, पाण्याने दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नदी-कालवे-तलाव यातून होणारी जलवाहतूक, आषाढ, श्रावण, चैत्र, कार्तिक या महिन्यांतील निसर्ग इ. आपल्याला जागोजागी दिसते. रवींद्रनाथांमधला चित्रकारही वाचताना जाणवतो. त्यांची वर्णनाची चित्रमय शैली आशी आहे की तुम्ही खूप वेळ जर गोष्टी वाचल्यात आणि डोळे मिटलेत तर तुमच्या डोळ्यासमोरही चित्रे उभी राहतील. बंकिमचंद्रांच्या वंदे मातरम् मधला “सुजलाम सुफलाम सस्यशामलाम” बंगाल इथे आपल्याला भरपूर भेटतो. बालविवाह, हुंडाप्रथा आणि त्याचे परिणाम गोष्टीत डोकावतात. त्या काळी आयुष्यमानता फार कमी होती वाटतं. गोष्टींमध्ये व्यक्ती कमी वयात मरण पावताना दिसतात; थोड्या आजारानेही माणसं मरतात. तेव्हा माणसं फार हळवीही होती वाटतं. या गोष्टींमधली माणसं मानसिक त्रास झाला की दुःखातिरेकाने जीव सोडतात – “सुटतात”.
गोष्टींचं भाषांतर उत्तमच. इतकं सहज सुंदर भाषांतर की रवींद्रनाथांनी कथा इंग्रजीतच लिहिल्या असाव्यात असं वाटतं. योगायोगाने दुर्गाबाई भागवतांचं एक पुस्तक पण वाचतोय त्यातही या पुस्तकातल्या एका गोष्टीचं मराठी भाषांतर आहे. तरीही मला इंग्रजी भाषांतरच जास्त सहज वाटलं. योग्य तिथे बंगाली शब्द वापरले आहेत आणि संदर्भात(ग्लोसरीत) त्यांचे अर्थ स्पष्ट केले आहेत.
३० पानी प्रस्तावनेत टागोरांची ओळख, त्यांच्या साहित्याचे टप्पे, कथालेखनाची पार्श्वभूमी, त्यांच्या जमीनदारीचा अनुभव आणि त्याचा कथालेखनावर झालेला परीणाम, या संग्रहासाठी १८९० च्या दशकातील कथाच का निवडल्या याचं कारण, त्यांच्या साहित्याचं थोडं समीक्षण असा माहितीपूर्ण मजकूर आहे. रवींद्रांची निवडक पत्रं, त्यांची वंशवृक्ष, टागोरांची जमीनदारी कुठे होती ते दाखवणारा बंगालचा नकाशा अशी पूरक माहितीही आहे.
सव्वाशे वर्षांनंतरही या गोष्टी वाचताना जुन्या वाटत नाहीत. अव्वल इंग्रजी राज्यात त्यांनी बंगालीत, बंगालच्याच पार्श्वभूमीवर लिहिलं. पण जे लिहिलं ते सगळीकडे आणि सगळ्या काळात सुसंगत वाटेल असं लिहिलं म्हणून ते “ग्लोबल” ठरलं. देशी विदेशी भाषांमध्ये त्याची भाषांतरे झाली. “ग्लोबल” म्हणजे फक्त इंग्रजी; “ग्लोबल” म्हणजे विदेशात घडणारे, देशीविदेशी पात्र असणारे कथानक अशी जर कुणाची समजूत असेल तर त्याला या पुस्तकाच्या वाचनातून “ग्लोबल” चा नवा अर्थ कळेल. कुणाच्याही स्वभाषेत, मातीत किती ताकद असते याचं प्रत्यंतर येईल.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-